छत्रपती संभाजीनगर : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मराठवाड्यातील उद्योग सुलभतेवर विभागीय आयुक्तांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये कंपन्यांच्या प्रतिनिधींनी गावगुंडांपासून त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही बैठक घेण्यात आली. पवन ऊर्जा व सौरऊर्जा प्रकल्पांना लागणारी जमीन शेतकऱ्यांकडून खरेदी करताना कंपन्या वेगवेगळे दर देतात. त्यामुळे अनेक गावागावांत दलाल निर्माण झाले असून त्यांचा त्रास वाढला असल्याचे निरीक्षण या बैठकीमध्ये नोंदविण्यात आले. बीड जिल्ह्यातील आवादा कंपनीस खंडणी मागण्याच्या गुन्ह्यातून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व होते.

समस्या निवारणासाठी समिती

सौर व पवन ऊर्जा प्रकल्पातील अडअडचणी सोडविण्यासाठी उपविभागीय पातळीवर एक समिती नेमली असून १५ दिवसांत एकदा तक्रारीचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषत: बीड, धाराशिव व जालना जिल्ह्यातून अनेक तक्रारी उद्याोजकांनी केल्या. गुंतवणूक करूनही प्रदूषण मंडळ आणि महसूल विभागातून वेळेवर काम चालू करण्याची परवानगी मिळत नसल्याचीही तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

‘मद्याची दुकाने कमी करा’

एमआयडीसीत मद्याची दुकाने वाढत आहेत. कार्यसंस्कृतीवर त्याचा परिणाम होत आहे. ही दुकाने किती असावीत याचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली.

खंडणीची समस्या

छत्रपती संभाजीनगरमध्येही उद्योजकांना उद्योग करण्यापेक्षा सर्वाधिक त्रास गावगुंडांचा आहे. अनेक ठिकाणी कंपन्यांमध्ये टोळ्या घुसून चोऱ्या केल्या जातात. त्यामुळे ऑरिक वाळुज उद्याोगात स्वतंत्र पोलीस स्टेशन देण्याची मागणी छत्रपती संभाजीनगरमधल्या उद्याोजकांनी केली आहे. विशेष म्हणजे धाराशीव, बीड आणि लातूरमधल्या सौरऊर्जा आणि पवन ऊर्जा कंपन्यांच्या उद्याोजकांनी त्यांना होणाऱ्या खंडणीच्या त्रासाबद्दलही तक्रारी करण्यात आल्या. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

सौरऊर्जा व पवन ऊर्जा प्रकरणात जमीन खरेदी-विक्री करताना काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागणार आहेत. उद्याोजकांनी व्यक्त केलेल्या सर्व भावना आम्ही शासनापर्यंत कळविणार आहोत. – दिलीप गावडे, विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे बैठक पार पडली. या वेळी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते.