औरंगाबाद : शिवसेनेतील बंडाळीनंतर मराठवाडय़ातील शिवसेनेचे खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आहेत. तसेच शिवसेनेतील संघटना बांधणीत काम करणारे  नेतेही या बंडखोरीच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह मराठवाडय़ातील शिवसेनेचे तीन खासदार उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेलेल्या आमदारांच्या विरोधात मंगळवारी औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात निषेध करत आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनाचे नेतृत्व आमदार अंबादास दानवे यांनी केले.

शिवसेनेतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे मंगळवारी मुख्यमंत्री वर्षां बंगल्यावर होते. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, उस्मानाबादचे ओम राजेनिंबाळकर, परभणीचे संजय जाधव ही खासदार मंडळी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत असल्याचे सांगण्यात येते. खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील हे दोघे मुंबई येथे असून हेमंत पाटील यांची व आपली भेट मुंबईत वर्षांवर झाल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

 उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील, परभणीचे डॉ. राहुल पाटील, हिंगोलीचे संतोष बांगर, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे चार आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत होते. तर संजय शिरसाट, संदीपान भुमरे, प्रा. रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, बालाजी कल्याणकर, ज्ञानराज चौगुले, तानाजी सावंत हे आठ आमदार शिंदेगटात सहभागी झाल्याने मराठवाडय़ातील शिवसेना संघटनेची वीण निसटेल असे वरवर दिसणारे चित्र खरे नाही, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.

आमदार संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांच्या गटाचेच असल्याचे पूर्वीही मानले जायचे. नगरविकास विभागाकडून निधी मंजूर करून त्यांनी मतदारसंघात अनेक कामे घेतली होती. त्यांनी नाराज आमदारांना व मंत्र्यांना एकत्र केल्याचे सांगण्यात येत आहे. अब्दुल सत्तार हे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या प्रचाराच्या गाडीत चढले होते. त्यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी असणारी मैत्री सर्वश्रुत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रा. रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल यांच्यासह संदीपान भुमरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील नाराज नेत्यांच्या यादीत भूम- परंडय़ाचे आमदार तानाजी सावंत अग्रस्थानीच होते. शिवसेनेत गळचेपी होत असल्याची भावना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केलेली होती. मराठवाडय़ातील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते.