News Flash

व्हेरिएबल्सची मालिका

व्हेरिएबल (variable) म्हणजे काय

व्हेरिएबल्सची मालिका

व्हेरिएबल (variable) म्हणजे काय व ते आपण प्रोग्राम (program) मध्ये कसं वापरतो ते आता तुम्हाला नीट समजलं आहे. व्हेरिएबलला आपल्या प्रोग्रामनुसार योग्य नाव देऊन त्यात आपण आवश्यक ती किंमत साठवून ठेवतो. मोठमोठय़ा प्रोग्राममध्ये वापरायला लागणाऱ्या वेगवेगळ्या किंमती साठवून ठेवायला प्रत्येकी वेगवेगळी व्हेरिएबल्स वापरली तर व्हेरिएबल्सची संख्या प्रचंड वाढेल व प्रोग्रामिंग खूप किचकट होईल. असं होऊ  नये म्हणून डेटा स्ट्रक्चर्स (data structures) वापरली जातात. आज आपण सर्वात सोप्पं डेटा स्ट्रक्चर्स शिकणार आहोत.

समजा, तुम्हाला शाळेत एकूण पाच विषय आहेत. एका विद्यार्थ्यांचे त्या पाच विषयांतील मार्क्‍स इनपुट (input) केले असता, एकूण मार्क्‍स आउटपुट (output) करणारा प्रोग्राम तुम्हाला लिहायचा आहे. तुम्ही म्हणाल, सोप्पंय, नि पाच विषयांसाठी पाच, नि एकूण मार्कासाठी एक, अशी सहा व्हेरिएबल्स वापरून, खालील प्रकारे आकडेमोड करणारा प्रोग्राम पटकन लिहून टाकाल.

Total = Marks1 + Marks2 + Marks3 + Marks4 + Marks5; समजा, पाच ऐवजी दहा विषय असतील, तर आणखी पाच व्हेरिएबल्स वाढवाल. पण आपण अशी किती व्हेरिएबल्स वाढवत बसणार! त्यापेक्षा, अशा वेळी आपण अ‍ॅरे (array) अथवा लिस्ट (list) वापरतो. यात आपण एकावेळी अनेक किंमती साठवून ठेवू शकतो.

व्हेरिएबलला आपण नाव देतो, तसं या अ‍ॅरे प्रकारच्या व्हेरिएबललाही आपण नाव देतो. व्हेरिएबलच्या डेटा टाइपप्रमाणे, या अ‍ॅरेलाही आपण डेटा टाइप देतो. याखेरीज, अ‍ॅरेसाठी आपल्याला आणखी एक माहिती पुरवावी लागते. ती म्हणजे, त्याची लांबी. व्हेरिएबल डिक्लरेशन करताना कंम्प्युटर त्याच्या मेमरीत जागा राखून ठेवतो, तशी या अ‍ॅरेसाठीही ठेवतो. पण अ‍ॅरेच्या बाबतीत ही जागा जास्त असते. दिलेल्या डेटाटाइपच्या, अ‍ॅरेच्या लांबीइतक्या वेगवेगळ्या किंमती साठवून ठेवता येतील, इतकी मोठी. यातील प्रत्येक किंमत वापरण्यासाठी, या जागेच्या प्रत्येक भागाला अनुक्रमांक दिला जातो. या क्रमांकाला इंडेक्स (index) म्हणतात. काही प्रोग्रामिंग लॅंग्वेजेसमध्ये हा अनुक्रमांक शून्यापासून सुरू  होतो, तर काहींमध्ये एकपासून.

आपल्या मार्काच्या उदाहरणात, पाच विषयांचे मार्क्‍स साठवून ठेवायला, आपण खालील प्रकारचा अ‍ॅरे डिक्लेअर करू.

int Marks[5];

बहुतेक प्रोग्रामिंग लॅंग्वेजेसमध्ये चौकोनी कंस वापरून अ‍ॅरेची लांबी दर्शविली जाते. अ‍ॅरेमध्ये साठवलेल्या किंमतींपैकी ठरावीक अनुक्रमांकाची किंमत दर्शविण्यासाठीसुद्धा चौकोनी कंस वापरला जातो. उदाहरणार्थ, पहिल्या विषयातील मार्क्‍स वापरण्यासाठी, नुसतं Marks हे व्हेरिएबल न वापरता, अनुक्रमांक शून्यापासून सुरू होत असेल तर, Marks[0] असं लिहावं लागतं.

फॉर लूप (for loop) वापरून आपण अ‍ॅरेमध्ये साठवलेल्या सगळ्या किंमती एकेक करून घेऊ  शकतो.

अशा प्रकारे अ‍ॅरे वापरून प्रोग्राम लिहिल्यास, पाचऐवजी दहा विषय झाले, तर आपल्याला व्हेरिएबल्स वाढवायला लागणार नाहीत. अ‍ॅरेची लांबी बदलून चालेल.

– अपर्णा मोडक

sudomu@gmail.com

(या सदरातील उदाहरणं http://www.codingbasics.omsw.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2017 1:48 am

Web Title: computer programming articles in marathi for kids
Next Stories
1 अनोखा वाढदिवस
2 सोनटक्का
3 उंदीरमामा की जय!!
Just Now!
X