जय आणि मल्हारची परीक्षा संपल्याबरोबर राजूमामाने त्यांना  कोकणात बोलावले होते. त्या दोघांबरोबर त्यांचा मित्र सार्थकही प्रथमच कोकण पाहायला निघाला होता. तिथे गेल्यावर त्यांना पाहून त्यांच्याच वयाच्या bal-lस्वर आणि रिया या मामाच्या मुलांनाही खूप आनंद झाला. राजूमामा प्रचंड हौशी असल्याने त्याने या सर्व मुलांसाठी भरगच्च कार्यक्रम आखून ठेवला होता. सार्थक प्रथमच कोकणात गेल्याने तिथली हिरवीगार झाडी, त्यात उठून दिसणारे मामाचे ऐसपस घर, विहिरीवरचा पंप, गोबर गॅस प्लांट, भलामोठा झोपाळा, या साऱ्याचे त्याला भलतेच अप्रूप वाटत होते. दुसऱ्या दिवसापासून मामा-मामीने त्यांना देवगडजवळच्या पवनचक्क्या, विजयदुर्गचा किल्ला दाखवला. कुणकेश्वराचे मंदिर आणि त्यासमोरील रुपेरी वाळूच्या समुद्र किनाऱ्यावर खेळताना सारी मुले तहानभूक विसरून गेली. संध्याकाळी दमून भागून घरी आल्यावर सर्वानी ‘एलिझाबेथ एकादशी’ सिनेमा पाहिला. त्यातील घरावर संकट आल्यावर आईला मदत करण्यासाठी शक्कल लढवून प्रामाणिकपणे पसे उभे करणाऱ्या छोटय़ा मुलांचे प्रयत्न बघून सगळेजण भारावून गेले. तीच संधी साधून राजूमामाने मुलांना विचारले, ‘‘बच्चेलोक आवडली ना तुम्हाला ही मेहनती मुले? तुम्हालाही या मुलांसारखे काही करायला जमेल का? सिनेमातल्या आईसारखीच माझ्या पुढय़ात एक वेगळीच अडचण उभी राहिलीय. तुम्ही मला मदत करू शकाल का?’’
‘‘हो.’’ मुलांचे कोरसमधे उत्तर.
‘‘पण नक्की काय करायचे आम्ही?’’ जयने गोंधळून विचारले. bal07‘‘सांगतो. असं बघा, आपल्या बागेतील आंबे झाडावरून उतरवून खोक्यात भरण्यापर्यंतची कामे करायला आपल्याकडे काही माणसे रोजंदारीवर येतात. पण मगाशीच मला त्यांचा निरोप आलाय की त्यांच्या घरात मोठी दुर्घटना घडलीय, म्हणून ते उद्या या कामासाठी येऊ शकणार नाहीत. पण मुंबईकडे आंबे भरलेले खोके नेणारा ट्रक मात्र नेमका उद्या संध्याकाळी येणार आहे. तसे दोनजण कामावर आहेत. पण त्यांच्याने इतके सारे काम होणार नाही. शिवाय, या मोसमात ऐनवेळी माणसेही मिळत नाहीत. तेव्हा उद्या इथेतिथे फिरायला न जाता तुम्ही सर्वानी मला मदत केलीत तर?’’
‘‘हो.. आम्ही तयार आहोत. फक्त आम्ही काय करायचे ते तू सांग मामा.’’ मुलांचा उत्साही स्वर.
दुसऱ्या दिवशी सकाळी ग्लासभर दूध आणि कोळाचे पोहे खाऊन सर्व वानरसेना मोठय़ा हौसेने मामाच्या सुमो गाडीत बसली. आमराईशी पोचल्यावर तिथली आंब्याची झाडे आणि त्यावर लटकलेल्या हिरव्यागार कैऱ्या पाहून साऱ्यांचेच डोळे विस्फारले. मामाने मांगराशी म्हणजे वाडीतील जुजबी सोय असलेल्या छोटय़ा घराशी गाडी थांबवली आणि कामाच्या सूचना द्यायला सुरुवात केली.
‘‘आज ज्या झाडावरचे आंबे उतरवायचे आहेत तिथे जय आणि सार्थक केशवमामांबरोबर जातील. रिया, स्वर आणि मल्हार गणेशमामांबरोबर आंबे उतरवायला जातील. हे दोन्ही मामा झाडावर चढून आंबे काढून गळातून खाली सोडतील. त्या आंब्यांवरचा चिक तुम्ही फडक्याने स्वच्छ पुसायचा आणि क्रेटमधे ठेवायचे. मग आपण ते या पडवीत आणूया आणि नंतर आपल्याला ते खोक्यात भरायचेत. या सर्व कामात मी तुमच्याबरोबरच आहे. मध्ये मध्ये तुम्हाला भूक लागली तर मामीने भरपूर खाऊ दिलाच आहे, पण तुम्हाला इथेतिथे चिंचा, रातांबे किवा जांभळे दिसली तर तो कोकणी मेवाही तोंडात टाकायला हरकत नाही. तेव्हा करायची सुरुवात?’’ मुले तर कधीचीच सिग्नलची वाट पाहत होती.
हा हा म्हणता अक्षरश: शेकडय़ांनी कैऱ्यांचा ढीग मांगरात जमा होऊ लागला. सेतू बांधायला निघालेल्या रामाच्या वानरसेनेसारखी सारी मुले झपाटल्यासारखी काम करत होती. दुपापर्यंत आंबे उतरवायचे काम झाल्यावर चिंचा, रायवळ आंबे गोळा करणाऱ्या मुलांना मामाने शिट्टी वाजवून दुपारच्या जेवणासाठी बोलावले. मामीने पाठवलेल्या गरमागरम चविष्ट जेवणावर सर्वानी ताव मारला. थोडय़ाशा विश्रांतीनंतर खोके भरायच्या कामाला सुरुवात झाली. मामा स्वत: जातीने कैरी हातात घेऊन वजनाचा अंदाज घेई आणि कमीजास्ती वजनानुसार वर्गवारी करून देई. आंबा कमी वजनाचा असल्यास खोक्यात ५ ते अगदी ६ डझनसुद्धा भरले जात. पण वजनदार असेल तर फक्त ४ डझनात खोका भरून जाई. हळूहळू मुले अगदी सराईतपणे योग्य तितका पेंढा खोक्यात ठेवून त्यात  स्वच्छ पुसलेले आंबे झरझर भरू लागली. खोक्यांच्या पॅकिंगचे काम मामाने केले की त्यावर रिया आणि मल्हार मार्कर पेनाने सुंदर ठळक अक्षरात नाव आणि पत्ता लिहू लागले. पाहता पाहता पडवीतल्या कैऱ्यांचा ढीग खोक्यांमध्ये गायब झाला.    
‘‘आता येऊ दे त्या ट्रकवाल्याला केव्हाही,’’ त्या भरलेल्या खोक्यांकडे पाहून मामा जाम खूश होऊन म्हणाला.
‘‘बच्चे कंपनी तुमच्या या मोठ्ठय़ा कामगिरीसाठी बक्षीस म्हणून तुम्हालासुद्धा मी घरी घेऊन जायला आंबे देणार आहे बरं का! तेवढे वजन उचलायची तयारी ठेवा म्हणजे झालं.’’  – मामा.
‘‘पण मामा, बक्षीस कशाला? आम्ही काय एवढे मोठे कष्ट केलेत का?’’ मल्हार म्हणाला.
‘‘हो ना, उलट आम्हाला हे सर्व करताना किती मज्जा वाटली. वेगळाच अनुभव मिळाला.  आजपर्यंत आंबे खाताना त्याच्यामागच्या या साऱ्या मेहनतीची आम्हाला कल्पनाच नव्हती.’’ – जय गंभीरपणे म्हणाला.
‘‘हो ना. आज आम्हाला खूप काही शिकायला  मिळाले.’’ सार्थकने री ओढली.
‘‘बरं बरं.. आता खूप कळकट दिसताय तेव्हा आधी विहिरीवर जाऊन हात-पाय धुताय की.. सरळ पोहाणी करून बाहेर येणार?’’ मामाने विचारले.
‘‘हो, हो. आता थोडा वेळ मस्त पोहून मगच घरी जाऊ या,’’ म्हणत मुलांचा मोर्चा विहिरीकडे वळला.
-अलकनंदा पाध्ये