पुंडलिक पै

पै फ्रेंड्स लायब्ररी गेली ३४ वर्षे वाचनाचा प्रचार व प्रसार करीत आहे.१९८६ पासून आज पर्यंत विविध उपक्रमाद्वारे वाचन संस्कृती जोपासण्याचे काम करीत आहे. यामध्ये डोंबिवली तसेच मुंबई आणि पुण्यातील मोठा वाचक वर्ग, फ्रेंड्स कट्ट्यावरील सभासद, लेखक, संपादक, माझे नातेवाईक, मित्र आणि सर्वात महत्वाचा कर्मचारी वर्ग यांचं प्रोत्साहन होत. या सर्वांमुळे वाचनालयाचा पसारा वाढवत आलो. एकेकाळी सर्वात जास्त वाचनलाय असलेल्या डोंबिवली नगरीत एक एक वाचनालये बंद पडायला लागले. त्यात पै फ्रेंड्स लायब्ररी नवीन शाखा उघडण्यात यशस्वी झाली.

आदान प्रदान प्रदर्शन, लेखक बाल वाचक महोत्सव, एक लक्ष, शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तक प्रदर्शन, दिवाळी अंक पूजा, पुस्तक प्रकाशन, फ्रेंड्स कट्टा आशा विविध उपक्रमांनी नवीन वाचक वर्ग निर्माण केले. मार्च महिन्यापर्यंत सर्व सुरळीत चाललं होतं. अचानक कोरोनाच संकट उभे राहिले. मला वाटलं काही दिवसात यावर आपण मात करून परत जोमाने सुरुवात करू. भविष्य आपल्या हातात नसतं. लॉकडाउन वाढवत गेल्यामुळे आणि करोनाच्या भीतीने वाचक वर्ग दुरावला.

पै फ्रेंड्स लायब्ररी च्या डोंबिवलीत सहा शाखा आहेत एक घरपोच सेवेचं ऑफिस आणि दोन अभ्यासिका आहेत. टिळक नगर मधील एक जागा सोडली तर सर्व जागा भाड्याच्या तत्वावर चालत आहेत. मार्चपर्यंत सर्व भाडे वेळेवर देत आलो. पण मार्च नंतर सर्व शाखा बंद असल्याने भाडं देऊ शकलो नाही.

प्रशासनाने लॉकडाउनचा कालावधी वाढवला.लायब्ररी बंद असली तरी खर्च होताच लाईटबिल, कर्मचारी यांचा पगार इंटरनेट खर्च वगैरे.
बरेचसे मालक समजूतदार आहेत पण डोंबिवली पश्चिमेला जोंधळे शाळे समोरील जागा मला सोडायला लागतेय. ते पण जुलै ३१ पर्यंत. एवढ्यात दुसरी जागा मिळणं कठीण आहे.नवीन जागेसाठी माझा प्रयत्न सुरू आहे .त्या शाखेमध्ये निदान ३० हजाराच्या आसपास पुस्तके आहेत.पुस्तकं ठेवण्यासाठी बनवलेली लाकडी फर्निचर व इतर वस्तू आहेत.हे सर्व हलवणं कठीण वाटतंय. मालक त्यांच्या जागी बरोबर आहेत शेवटी त्यांची जागा आहे. गेले दहा वर्षे मी ठरलेलं भाडं न चुकता वेळेवर देत आलो.

लॉकडाउन आणि करोना संपल्यावर परत सर्व शाखा जोमाने सुरू होतील यात शंका नाही पण आत्ताची जी परिस्थिती आहे याला जबाबदार कोण ?

– पुंडलिक पै (पै फ्रेंड्स लायब्ररी संचालक)