धवल कुलकर्णी 

२००८ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात रणशिंग फुंकलं होतं ते महानायक अमिताभ बच्चन यांना टार्गेट करून. मात्र ठाकरे कुटुंबीय आणि अमिताभ यांचा घरोबा फार जुना आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्याच वेळेला, अँम्ब्युलन्सच्या जाळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवसेनेमुळे, बच्चन यांचे प्राण वाचवायला मदत झाली होती, तीसुद्धा अनेकांना ठाऊक नसलेली गोष्ट.

अमिताभ बच्चन यांच्यावर एकेकाळी टीका केलेले राज ठाकरे यांच्या लग्नाला अमिताभ बच्चन हे सहकुटुंब  उपस्थित होते अशी आठवण त्यांचे नातेवाईक सांगतात. राज यांचे लग्न १९९० मध्ये दादरच्या वनिता समाज सभागृहात मोहन वाघ यांच्या कन्या शर्मिला यांच्यासोबत झाले. राज ठाकरेंचे वडील श्रीकांत हे सिने समीक्षक व संगीतकार असल्यामुळे त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतल्या अनेक तारकांनी हजेरी लावली होती.

लग्नाला आलेल्या मंडळींना जेव्हा त्या सोहळ्याला अमिताभ बच्चन येणार आहेत असे कळले वेळेला इतर पाहुणे तिथून निघायलाच तयार नव्हते सगळेजण वाट पाहत होते ही फक्त बच्चन कुटुंबीयांची! हा हा म्हणता गर्दी प्रचंड वाढली, व काहीशा वैतागलेल्या राज यांनी ‘लग्न माझं होतंय पण लोक मात्र अमिताभ की वाट पाहत आहेत’, अशी खंत पण व्यक्त केली!

सिनेमा पाहण्याची प्रचंड आवड असणारे राज (त्यांनी रिचर्ड ऐटेनबरो यांचा गांधी साधारणपणे दीडशे वेळा पाहिला आहे) यांचे अमिताभ हे आवडते नट.

शिवसेना अमिताभ यांना जोडणारा अजून एक दुवा आहे तो म्हणजे बच्चन यांच्या अपघातानंतर शिवसेनेने त्यांना केलेल्या तातडीच्या मदतीचा. जुलै १९८२ मध्ये अमिताभ बच्चन यांचा ‘कुली’  चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या जवळजवळ जीवघेण्या अपघाता नंतर त्यांना रुग्णालयात पोहचवण्यात शिवसेनेचा मोठा वाटा होता.

बँगलोर येथे झालेल्या फाईट सीन चा चित्रीकरणाच्या दरम्यान अमिताभ यांच्या पोटाला जबरदस्त दुखापत होऊन त्यांना विमानाने ट्रीटमेंटसाठी मुंबईत आणावे लागले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्या उंचीमुळे ते मावतील अशी अँब्युलन्स मुंबईत नव्हती.  अमिताभ बच्चन यांचे तत्कालीन पीए शितल जैन यांनी खूप शोध घेतल्यावर तशी अँब्युलन्स ही शिवसेनेच्या डॉक्टर दादासाहेब भडकमकर मार्ग येथील तेव्हाच्या १९ नंबरच्या शाखेवर असल्याचे लक्षात आले, अशी आठवण ज्येष्ठ सिने समीक्षक व लेखक  दिलीप ठाकूर यांनी सांगितली.
मग काय? मुंबई विमानतळावरून याच रुग्णवाहिकेतून अमिताभ यांची रवानगी थेट दक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाली. लाखो लोकांच्या प्रार्थनेनंतर व डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने अमिताभ यांचा जीव वाचला.

पण, कृतज्ञता म्हणून अमिताभ हे २० एप्रिल, १९८३,  मध्ये या शाखेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला रंगभवन येथे उपस्थित राहिले, असे  दिलीप ठाकूर यांनी सांगितले. ठाकूर हे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. स्टेजवर अमिताभ, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, डॉक्टर सुरेश नाडकर्णी, छगन भुजबळ व तत्कालीन नगरसेवक गजाननराव वर्तक, यांनी बसल्याचा एक दुर्मिळ फोटो ठाकूर यांच्या संग्रही आहे.

अर्थात, अमिताभ व बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे संबंध होतेच. अमिताभ हे बोफोर्स प्रकरणात अडचणीत आल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना काही मौलिक सल्ले दिल्याची माहिती त्यांनी (अमिताभ) एका मुलाखतीत दिली होती.

अगदी बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर सुद्धा अमिताभ यांनी शिवसेनाप्रमुखांच्या काही  आठवणी सांगितल्या होत्या. २००८ मध्ये उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव व सध्या युवासेनेचे प्रमुख असलेले आदित्य ठाकरे यांच्या पहिल्या म्युझिक अल्बम उमीद च्या उद्घाटनाला अमिताभ बच्चन आले होते.