लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
पुणे: भारतात २०२४ पासून नवनिर्मितीक्षम कृत्रिम प्रज्ञेचा (जनरेटिव्ह एआय) स्वीकार वाढला आहे. देशातील ८३ टक्के कंपन्यांनी स्वतंत्रपणे मुख्य कृत्रिम प्रज्ञा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. उरलेल्या १५ टक्के कंपन्यांकडून २०२६ पर्यंत हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे, असे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने ॲक्सेस पार्टनरशिपच्या साथीने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
या अभ्यासात देशातील वित्तीय सेवा, माहिती व संवाद तंत्रज्ञान, उत्पादन व उत्पादन प्रक्रिया, तसेच किरकोळ क्षेत्रांतील ४१५ वरिष्ठ धोरणकर्त्यांचा समावेश होता. त्याआधारे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने ‘कृत्रिम प्रज्ञा स्वीकार निर्देशांक’ अशा शीर्षकाचा हा अभ्यास जाहीर केला आहे. त्यानुसार, भारताची वाटचाल प्रायोगिक पातळीवर नवनिर्मितीक्षम कृत्रिम प्रज्ञेचा स्वीकार ते त्याच्या व्यापक अंमलबजावणी या दिशेने सुरू आहे. नवनिर्मितीक्षम कृत्रिम प्रज्ञाआधारित नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नेतृत्व सध्या मुख्याधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी करीत आहेत. मात्र, आता या रचनेत बदल होऊन नवनिर्मितीक्षम कृत्रिम प्रज्ञेसाठी स्वतंत्र मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती केली जात आहे. कंपन्यांकडून कृत्रिम प्रज्ञेसाठी आर्थिक तरतूद ६४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्यानंतर सुरक्षिततेवर २१ टक्के आणि संगणकीय क्षमतेत वाढीवर १० टक्के तरतूद केली जात आहे.
नवनिर्मितीक्षम कृत्रिम प्रज्ञेमुळे भविष्यात घडणाऱ्या बदलांचा सामना करण्यासाठी देशातील ७५ टक्के कंपन्यांकडे व्यवस्थापनातील बदलाची व्यूहरचना आजच्या घडीला नाही. हे प्रमाण पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत ९ टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. कामकाजाच्या प्रक्रियेमध्ये नवनिर्मितीक्षम कृत्रिम प्रज्ञेचे पूर्णपणे एकत्रीकरण ४३ टक्के कंपन्यांनी केले आहे. त्यातून भारतात नवनिर्मितीक्षम कृत्रिम प्रज्ञाधारित स्थित्यंतराचा वेग समोर येतो. देशातील कृत्रिम प्रज्ञेचा स्वीकाराचे प्रमाण हे जागतिक पातळीएवढे आहे. नवनिर्मितीक्षम कृत्रिम प्रज्ञा साधनाचा वापर करणाऱ्या कंपन्यांची संख्या ९८ टक्के आहे. याचवेळी ९५ टक्के कंपन्या नव्या गोष्टींसाठी नवनिर्मितीक्षम कृत्रिम प्रज्ञेचा प्रयोगात्मक वापर करीत आहेत. या प्रयोगांपैकी ४९ टक्के प्रयोग २०२५ मध्ये प्रत्यक्ष उत्पादनाच्या टप्प्यावर पोहोचणे अपेक्षित आहे, असे हा अहवाल सांगतो.
भविष्यात संधी वाढणार!
देशातील ८१ टक्के कंपन्यांनी नवनिर्मितीक्षम कृत्रिम प्रज्ञा प्रशिक्षण योजना तयार केल्या आहेत. तर या वर्षाच्या अखेरीस अशा योजना आणखी ११ टक्के कंपन्या तयार करतील. यातून या नव-तंत्रज्ञानाचा वापर करणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. सध्या कर्मचाऱ्यांमध्ये या कौशल्यांची वानवा आहे. नवनिर्मितीक्षम कृत्रिम प्रज्ञेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतही अनिश्चिचता आहे. हे चित्र बदलत असून, ९९ टक्के कंपन्या नवनिर्मितीक्षम कृत्रिम प्रज्ञा कुशल मनुष्यबळाची भरती करण्यास प्राधान्य देतील, असेही अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे.