पीटीआय, नवी दिल्ली : जागतिक पतमानांकन संस्था फिच रेटिंग्जने चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवरून ६.९ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सरलेल्या जून तिमाहीतील अर्थव्यवस्थेची मजबूत वाढ आणि देशांतर्गत वाढलेल्या मागणीचा हवाला देत हा वाढीव अंदाज तिने व्यक्त केला.

अमेरिकेच्या व्यापार शुल्काबाबतच्या अनिश्चिततेमुळे या वर्षाच्या सुरुवातीला विविध पतमानांकन संस्थांच्या खालावलेल्या अंदाजांनंतर ‘फिच’ ही पहिली जागतिक पतमानांकन संस्था आहे जिने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा ‘जीडीपी’ वाढीचा अंदाज सुधारून तो उंचावत नेला आहे. तिने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक’नुसार, चालू आर्थिक वर्षाच्या मार्च आणि जून तिमाहीत आर्थिक क्रियाकलापांचा वेग झपाट्याने वाढला आहे. एप्रिल-जूनमध्ये वास्तविक जीडीपी वाढ ७.८ टक्क्यांपर्यंत विस्तारली आहे.

याआधी फिचने एप्रिल-जून तिमाहीसाठी ६.७ टक्के वाढीचा अंदाज वर्तविला होता. मात्र एप्रिल-जून तिमाहीतील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर, फिचने मार्च २०२६ अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठीचा अंदाज ६.५ टक्क्यांवरून ६.९ टक्के केला आहे.

अलिकडच्या काही महिन्यांत भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार तणाव वाढला आहे, अमेरिकेने भारतातून आयातीवर २५ टक्के अतिरिक्त कर लादला आहे. परिणामी २७ ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर ५० टक्के कर आकारणी अमेरिकेकडून सुरू झाली आहे. मात्र आगामी काळात व्यापार शुल्क कमी होण्याची शक्यता असली तरी व्यापार संबंधांभोवतीची अनिश्चितता कायम असून व्यावसायिक भावना आणि संभाव्य गुंतवणूक कमी होण्याची भीती आहे. मात्र देशांतर्गत आघाडीवर सरकारने २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) सुधारणा लागू होणार आहे. परिणामी पुढील आर्थिक वर्षात ग्राहक खर्चात थोडीशी वाढ होईल, असे फिचने म्हटले आहे.

देशांतर्गत मागणी ही विकासदराची प्रमुख चालक असेल. वास्तविक उत्पन्नात वाढीच्या शक्यतेने ग्राहक खर्चात गतिशीलतेची शक्यता आहे. मात्र फिचला आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत (ऑक्टोबर-मार्च) वाढ मंदावण्याची अपेक्षा आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी (२०२६-२७) फिचने ६.३ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे, जो आर्थिक वर्ष २०२७-२८ मध्ये ६.२ टक्क्यांपर्यंत खालावेल.

इतर संस्थांचा विकासदर अंदाज काय?

चालू आर्थिक वर्षासाठीचा जीडीपी वाढीचा ‘फिच’चा अंदाज इतर पतमानांकन संस्थांपेक्षा अधिक आहे. आर्थिक पाहणी अहवालात चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर ६.३-६.८ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक, आशियाई विकास बँक (एडीबी) आणि एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज यांनी भारताचा जीडीपी ६.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. मूडीज रेटिंग्जचा २०२५ या कॅलेंडर वर्षात जीडीपी ६.३ टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेने जीडीपी वाढीचा अंदाज अनुक्रमे ६.४ टक्के आणि ६.३ टक्के असा राखला आहे.