मुंबई : अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरासंबंधी भूमिकेची प्रतीक्षा गुंतवणूकदार करत असल्याने त्याचे पडसाद जगभरातील भांडवली बाजारांवर उमटले. देशांतर्गत भांडवली बाजारात तेजी-मंदीच्या हिंदोळ्यावर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दिवसअखेर नकारात्मक पातळीवर स्थिरावला.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून झालेली नफावसुली आणि खनिज तेलाच्या किमतीतील वाढीमुळे भांडवली बाजारात निराशेचे वातावरण राहिले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९.०७ अंशांनी घसरून ६६,३५५.७१ पातळीवर बंद झाला. दिवसभरात, त्याने ६६,५५९.२९ ही उच्चांकी तर ६६.१७७.७२ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी मात्र ८.२५ अंशांनी वधारला आणि १९,६८०.६० या सकारात्मक पातळीवर बंद झाला.
‘फेड’च्या व्याजदरासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णयाची वाट पाहात देशांतर्गत भांडवली बाजारात धीम्यागतीने व्यवहार सुरू होते. दुसरीकडे चीनकडून गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये धोरणात्मक बदल करण्याच्या वृत्तीमुळे धातू कंपन्यांचे समभाग तेजीत होते. गेल्या दोन सत्रात भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकांनी उच्चांकी पातळी गाठल्यानांतर, बाजारात गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. वाढता डॉलर निर्देशांक, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्री, खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि काही कंपन्यांची पहिल्या तिमाहीत निराशाजनक कामगिरी यामुळे बाजारात किंचित घसरण झाली, असे निरीक्षण जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. सेन्सेक्समध्ये जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, एनटीपीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर दुसरीकडे, एशियन पेंट्स, आयटीसी, लार्सन अँड टुब्रो आणि स्टेट बँकेच्या समभागात प्रत्येकी ३.९५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
सेन्सेक्स ६६,३५५.७१ – २९.०७ (-०.०४)
निफ्टी १९,६८०.६० ८.२५ ( ०.०४)
डॉलर ८१.८८ ७ पैसे
तेल ८२.५९ ०.१८