– पीटीआय, नवी दिल्ली
देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादन वाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) सरलेल्या सप्टेंबरमध्ये ५.८ टक्क्यांपुढे मजल मारल्याचे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. हा देशाच्या उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जातो.
गेल्या वर्षीच्या तुलनेत औद्योगिक उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच सप्टेंबर २०२२ मध्ये ३.३ टक्के वाढ नोंदवली गेली होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन दरात मोठी घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात तो १०.३ टक्के नोंदवला गेला होता.
हेही वाचा – प्रत्यक्ष कर संकलन २२ टक्क्यांनी वाढून १०.६० लाख कोटींवर
हेही वाचा – अभिनेता रणवीर सिंगने मुंबईतील दोन अपार्टमेंट विकल्या; ‘इतक्या’ कोटींमध्ये झाला सौदा
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या निर्देशांकातील महत्त्वाचा घटक म्हणजे निर्मिती क्षेत्राने सप्टेंबर महिन्यात ४.५ टक्के वाढ नोंदवली आहे. खाणकाम तसेच वीजनिर्मिती क्षेत्राने अनुक्रमे ११.५ आणि ९.९ टक्के दराने वाढ साधली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत, औद्योगिक उत्पादनातील वाढ ६ टक्के आहे, जी एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीतील ७.१ टक्क्यांवरून खाली आली आहे. औद्योगिक निर्देशांकाला कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत विशेष महत्त्व असते. ते देशाच्या अर्थव्यवस्थेत औद्योगिक विकास कोणत्या वेगाने होत आहे, याचे निदर्शक असते.