फारुक नाईकवाडे

देशातील सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या महाराष्ट्रामध्ये या साथीवरील उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत सर्वाधिक प्रयत्नही करण्यात येत आहेत. किंबहुना कोविडविरोधातील प्रयत्नांमध्ये महाराष्ट्र अग्रगण्य आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महाराष्ट्रात प्रोजेक्ट प्लॅटिनाची सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २८ जून रोजी करण्यात आले. हा रक्तद्रव उपचार पद्धतीचा (Plasma Therapy) जगातील सर्वात मोठा प्रयोग समजला जात आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने या प्रकल्पाला आणि त्याच्याशी संबंधित मुद्दय़ांना खूप जास्त महत्त्व असणार आहे. या लेखामध्ये याबाबतच्या परीक्षोपयोगी मुद्दय़ांची चर्चा करण्यात येत आहे.

प्रोजेक्ट प्लॅटिना

कोविड विषाणूबाधित रुग्णांवर कॉनवॅलेसन्ट प्लाझ्मा थेरपी [Convalescent Plasma Therapy (CPT)] ही उपचार पद्धती यामध्ये वापरण्यात येत आहे. रक्तद्रवाच्या माध्यमातून रोगप्रतिकारक पिंडे रुग्णाच्या शरीरात सोडून त्याची कोविड विषाणूशी प्रतिकार करण्याची क्षमता वाढविणे असे या उपचार पद्धतीचे स्वरूप आहे.

*      या उपचारांनी बरे होणाऱ्या रुग्णांची माहिती संकलित करून त्याचा कोविड विषाणूवरील उपचार आणि प्रतिबंधात्मक लस शोधण्यासाठी वापर करणे हासुद्धा या प्रकल्पाचा हेतू आहे.

*      राज्यातील पालिका रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये मिळून एकूण २३ ठिकाणी रक्तद्रव उपचार पद्धतीचा वापर करण्यास केंद्र शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी १७ ठिकाणी ही उपचार पद्धती या प्रकल्पामध्ये सुरू करण्यात आली आहे.

*      कोविड विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील रक्तद्रव (blood plasma) वेगळा करून तो संसर्ग झालेल्या रुग्णांना दिला जातो. या रक्तद्रवाच्या माध्यमातून कोविड विषाणूशी सामना करणारी प्रतिपिंडे (antibodies) रुग्णाच्या शरीरात प्रवेश करून विषाणू नष्ट करतात. ज्या ठिकाणी रक्तद्रव संकलनाची सुविधा उपलब्ध नाही तेथे असे संकलन यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

*      या प्रकल्पासाठीचा निधी हा मुख्यमंत्री मदत निधीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

*      ही उपचार पद्धत इटली, चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांमध्ये खूप प्रभावी ठरली आहे. या देशांमध्ये विषाणू संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर या उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्र पहिले राज्य आहे जेथे सौम्य तसेच गंभीर रुग्णांवर या माध्यमातून उपचार केले जात आहेत.

*      प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बँक, प्लाझ्मा ट्रायल आणि इमर्जन्सी ऑथरायजेशन या चार सुविधांचाही समावेश या प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे. जेणेकरून या उपचार पद्धतीचा सर्वंकष विकास व वापर करून आणि संकलित होणाऱ्या माहितीच्या विश्लेषणातून कोविड विषाणूचे औषध व लस शोधता येईल.

आनुषंगिक मुद्दे रक्तद्रवदान आणि रक्तदान

*      मानवी रक्तामध्ये रक्तद्रव (plasma), लाल रक्त पेशी (red blood cells), श्वेत रक्तपेशी (white blood cells), रक्तकणिका (platelets) असे घटक असतात. रक्तदानामध्ये या सर्व घटाकांसहित ५००मिली रक्त व्यक्तीच्या शरीरातून घेतले जाते तर रक्तद्रवदानामध्ये केवळ ५००मिली रक्तद्रव बाजूला काढून रक्तातील अन्य घटक रक्तदात्याच्या शरीरामध्ये परत सोडले जातात.

*      रक्तद्रवदान दर १५ दिवसांनी करता येते तर रक्तदान हे तीन महिन्यांतून एकदा करता येते.

रक्तद्रव बँक

*      देशातील पहिली रक्तद्रव बँक ही यकृत आणि पित्त विज्ञान संस्था, नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आली आहे.

*      करोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तद्रवामध्ये ही प्रतिपिंडे जवळपास २८ दिवसांपर्यंत टिकतात. या काळात त्या रुग्णाचा रक्तद्रव दुसऱ्या रुग्णाच्या उपचारासाठी वापरता येऊ शकतो. अशा रुग्णांनी दिलेल्या रक्तद्रवाची साठवणूक रक्तद्रव बँकेत केली जाते आणि आवश्यकतेनुसार त्याचा उपचारांमध्ये वापर करण्यात येतो.

*      रक्तद्रव हा सुमारे एक वर्षांपर्यंत साठवून ठेवता येऊ शकतो. गोठवलेल्या रक्तद्रवामधील प्रतिपिंडे एक वर्षांपर्यंत टिकू शकतात.

*      एका रुग्णाच्या ५०० मिली रक्तद्रवातून दोन रुग्णांवर उपचार करणे शक्य होते.

*      महाराष्ट्रामध्ये एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण  http://www.plasmayoddha.in   या  संकेतस्थळावर आपली नोंद करून रक्तद्रव देण्याची इच्छा व्यक्त करू शकतो.

रक्तद्रव उपचार पद्धती

*      जेव्हा शरीर कोणत्याही रोगकारक गोष्टीच्या संपर्कात येते, तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि प्रतिपिंडे तयार होतात. आणि व्यक्ती आजारातून बरी होते. अशा बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरात प्रतिकारक पिंडे काही काळ टिकून राहतात. या प्रतिपिंडांचा वापर दुसऱ्या रुग्णाच्या उपचारासाठी करण्यात येतो.

*      अशा प्रकारे तयार उपचारासाठी तयार प्रतिपिंडे वापरण्याचा पहिला प्रयोग सन १८९२ मध्ये घटसर्पावर उपचार करताना करण्यात आला.

*      एमिल वॉन बेहरिंग यांना घटसर्पावर रक्तद्रव उपचारांच्या शोधासाठी सन १९०१ मध्ये वैद्यक क्षेत्रातील नोबल पुरस्कार जाहीर झाला. हा वैद्यक क्षेत्रातील पहिला नोबल पुरस्कार होता.

लसीकरण आणि रक्तद्रव उपचार पद्धतीमधील फरक

* लसीकरणातून व्यक्तीमध्ये   active immunity (क्रियाशील प्रतिकारशक्ती) निर्माण होते. म्हणजे लसीच्या माध्यमातून शरीरामध्ये रोगकारक (pathogen) पिंडांची सौम्य लक्षणे antigens  शरीरामध्ये निर्माण करण्यात येतात आणि शरीराला त्याचा प्रतिकार करणारी प्रतिपिंडे बनविण्यासाठी उद्युक्त केले जाते.

* रक्तद्रव उपचारांमध्ये व्यक्तीमध्ये passive immunity (निष्क्रिय प्रतिकारशक्ती) निर्माण होते. म्हणजे शरीराला प्रतिपिंडे बनविण्यासाठी उद्युक्त करण्याऐवजी तयार प्रतिपिंडेच व्यक्तीच्या शरीरामध्ये सोडली जातात. एखादा आजार खूप गंभीर असेल आणि त्यावर खात्रीशीर उपचार माहीत नसतील तर अशा वेळी ही उपचार पद्धत परिणामकारक ठरते.