आधुनिक तंत्रज्ञान, त्याचे डिझाइन ही केवळ एक कल्पनारम्य निर्मिती न उरता ते तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या व्यक्तींना तसेच निरनिराळ्या उद्योगांना उपयुक्त ठरणे, ही येत्या काळाची गरज आहे.  यासाठी तंत्रज्ञानाची उपयोगशील रचना खूप महत्त्वाची ठरणार आहे.
तुम्हांला एखाद्या वेबसाइटवर हवी ती माहिती पटकन मिळत नाही का? मोबाइल फोनमध्ये विविध गोष्टी वापरताना गोंधळ होतो का? एखादी कार्यप्रणाली (Software)) वापरणं कठीण वाटतं का? इंटरनेटद्वारे बँकेचे व्यवहार करताना अडचणी येत आहेत का? एटीएम मशीन वापरताना अडचणी येत आहेत का? या प्रश्नांचे उत्तर ‘हो’ असे असेल तर तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनांची ‘उपयोगशीलता’ (Usability) वापरणाऱ्यांसाठी (Users) योग्य नाही किंवा या उत्पादनांची रचना (Design) व्यवस्थित नाही. कोणतेही उत्पादन केवळ आधुनिक आणि सुंदर असून चालत नाही तर ते लोकांना वापरण्यासाठी सोयीचे, उपयुक्त असावे लागते. या शास्त्रालाच उत्पादनाचा वापर करणाऱ्याच्या ‘सुलभ अनुभवाची रचना’ (User Experience Design) किवा ‘मानव- तंत्रज्ञान- सुसंवाद’ (Human Computer Interaction) किंवा वापरकर्त्यांला केंद्रस्थानी ठेवून केलेली रचना (User Centered Design) म्हणतात. आधुनिक जगातील प्रत्येक उत्पादन किंवा सेवा यांच्या उपयुक्ततेसाठी आणि गुणवत्तेसाठी हे शास्त्र अत्यंत आवश्यक ठरले आहे.
 आज जगाच्या सात अब्ज लोकसंख्येपकी ३४ % लोक इंटरनेट वापरतात, इंटरनेटवर ६० कोटींपेक्षा जास्त संकेतस्थळं उपलब्ध आहेत, दरवर्षी पाच कोटी नवीन संकेतस्थळं तयार होतात, जगातील २ अब्जपेक्षा जास्त लोक ई-मेल सुविधा वापरतात, दररोज गुगल सर्चद्वारे १८१ देशांतील लोक १४६ भाषा वापरून एकूण १ अब्ज प्रश्नांची उत्तरे शोधतात. जगातील ८७ % लोक मोबाइल फोन वापरतात. (भारतात लोकसंख्येच्या ७० टक्के लोक मोबाइल फोन वापरतात), साधारणत: २ अब्ज संगणक नियमितपणे वापरले जातात. अब्जावधी लोक आणि शेकडो कंपन्या लाखो सॉफ्टवेअर वापरतात. जगभर साधारणत: २२ लाख एटीएम मशिन्स वापरल्या जातात.. ही आकडेवारी पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की, तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने/सेवा किती प्रचंड प्रमाणात उपयोगात आणल्या जातात. अशी उत्पादने/सेवा केवळ आखीवरेखीव व सुंदर असून चालत नाहीत तर त्या उपयोगशील (Usable) सुद्धा असाव्या लागतात. त्यामागे एक उपयुक्त कल्पना किंवा विचार असावा लागतो. शिवाय जागतिक बाजारपेठेत असणाऱ्या गळेकापू, वेगवान स्पध्रेत टिकून यशस्वी व्हायचे असेल तर उत्पादनाच्या गुणवत्तेबरोबरच उपयुक्तता आणि आकर्षक असणेही  महत्त्वाचे ठरत आहे.
 युजर एक्सपिरिअन्स डिझाइन (User Experience Design) प्रक्रिया सोप्या भाषेत सांगायची झाल्यास असं म्हणता येईल की, लोकांना (किंवा संभाव्य वापरकर्त्यांना) उत्पादनाकडून किंवा सेवेकडून काय अपेक्षा आहेत? त्यांच्या सध्याच्या अडचणी काय आहेत? त्यांची आवड-नावड काय आहे? त्यांच्या गरजा काय आहेत? त्यांच्या मर्यादा काय आहेत? त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या संधी आहेत? अशा गोष्टींचा अभ्यास लोकांना भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन केला जातो. या माहितीच्या आधारे उत्पादनाची संकल्पना तयार केली जाते. ही संकल्पना पुन्हा लोकांना दाखवली जाते आणि त्यांची प्रतिक्रिया लक्षात घेऊन उत्पादनाची अंतिम रचना- डिझाइन तयार केले जाते. याचं अगदी आपल्याशी संबंधित उदाहरण द्यायचं झालं तर आज आपण जे मोबाइल फोन वापरतो, ते फोन तयार करणारे या सर्व प्रमुख कंपन्या संभाव्य वापरकर्त्यांचा परिपूर्ण अभ्यास करतात आणि मगच फोनचे नवीन मॉडेल तयार करतात. आणखी एक उदाहरण म्हणजे पूर्वी याहू किवा रेडिफ ई-मेल सुविधा वापरणारे बहुतांश लोक आता गुगलची जीमेल ही ईमेलप्रणाली वापरतात, कारण जीमेल खूप उपयुक्त, सोयीचे आणि आकर्षक दिसणारे संकेतस्थळ वाटते. याचं श्रेय गुगल कंपनीच्या उपयोगशीलता-तज्ज्ञांना, रचनाकारांना आणि युजरइंटरफेस डिजाइनर यांना जातं. गुगलने लोकांच्या आवडीनिवडीचा अभ्यास करूनच अशी यशस्वी उत्पादने जागतिक बाजारपेठेत आणली. हीच प्रक्रिया कमी-जास्त प्रमाणात जगातील प्रसिद्ध संकेतस्थळे, कंपन्या, सॉफ्टवेअर-हार्डवेअर कंपन्या, बँका, विमा कंपन्या वापरतात. जेवढे उत्पादन उपयुक्त, वेगवान आणि आकर्षक तेवढा कंपनीचा नफा जास्त या सूत्रामुळे आजच्या तीव्र स्पध्रेच्या युगात प्रत्येक कंपनीला या क्षेत्रातील लोकांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक उत्पादन किंवा सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना या विषयातील तज्ज्ञ माणसे लागतात. लोकांचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्रातील तज्ज्ञ लागतात. उपयोगशीलता तपासणारे उपयोगशीलता- विश्लेषक (Usability Analyst), लोकांना सोयीचे असे उत्पादन तयार करण्यासाठी उत्पादन-अभिकल्पकार (Product Designer) लागतात, युजरइंटरफेसचा आराखडा आणि संकल्पना तयार करण्यासाठी रचनाकार (User Experience Designer), ग्राफिक डिझायनर, व्हिज्युअल डिझायनर लागतात. तयार केलेले डिझाइन तांत्रिकदृष्टय़ा अमलात आणण्यासाठी प्रोग्रामर, डेव्हलपर लागतात.
तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातील संवाद कसा उपयुक्त होईल, याविषयीचे संशोधन दुसऱ्या महायुद्धापासून चालू होते. पण डोनाल्ड नॉर्मन यांनी १९९३ च्या सुमारास User Experience Design ही संकल्पना पहिल्यांदाच ठाशीवपणे मांडली. त्यामुळे तंत्रज्ञानाची निर्मिती करताना वापरकर्त्यांचा (User) विचार केला पाहिजे, ही भावना प्रबळ झाली. त्यावेळेस डोनाल्ड नॉर्मन हे अ‍ॅपल या जगप्रसिद्ध कंपनीत काम करत होते. खरंतर ‘सॉफ्टवेअर’ ही संकल्पना उदयाला येण्याआधी तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने सरळसोट, कमी गुंतागुंतीची असत. त्यामुळे उत्पादनाच्या डिझाइनबरोबरच उपयुक्तता- तंत्रज्ञान- सुसंवादाचा फार तीव्रतेने विचार केला गेला नव्हता. पण सॉफ्टवेअर ही संकल्पना उदयाला आली आणि त्याबरोबरीनेच गुंतागुंतीची उत्पादने निर्माण होऊ लागली. त्यातूनच ही गुंतागुंतीची उत्पादने लोकांना सोपी, सोयीची आणि आकर्षक कशी होतील याचा विचार झाला. १९५०च्या दशकाच्या उत्तरार्धात कार्यप्रणाली म्हणजेच सॉफ्टवेअर ही संकल्पना पहिल्यांदाच मांडण्यात आली. १९६८ आणि १९६९ या वर्षांमध्ये सॉफ्टवेअर या विषयाला वाहिलेल्या दोन परिषदा आयोजित करण्यात आल्या आणि त्याबरोबरच सॉफ्टवेअर तंत्रज्ञान अधिकृत उद्योग म्हणून उदयाला आला. पुढील काळात आयबीएम, अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या संगणकनिर्मिती करणाऱ्या कंपन्या उदयाला आल्या आणि उद्योगजगाला तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनाची उपयुक्त आणि आकर्षक रचना (Design) करणाऱ्या डिझायनरची गरज भासू लागली. त्याकाळात अमेरिकेतील कॅलिफोíनया राज्यातील सिलिकॉन व्हॅली परिसरात अनेक झपाटलेले तरुण नवनवीन तंत्रज्ञानाचे संशोधन आणि निर्मिती करण्यासाठी धडपडत होते. पुढे १९९० च्या दशकात इंटरनेट आणि संकेतस्थळ (Website या तंत्रज्ञानाचा झपाटय़ाने विकास झाला. त्याकाळी वेबसाइटचे डिझाइन करण्यासाठी ग्राफिक डिझायनर नेमले जात. परंतु, वेबसाइटच्या संभाव्य वापरकर्त्यांचा किंवा वेबसाइटच्या उपयोगशीलतेचा फारसा विचार केला जात नसे. त्यामुळे वेबसाइटचे डिझाइन करणारे ग्राफिक डिझायनर महत्त्वाचे की वेबसाइटला उपयुक्त बनवणारे उपयोगशीलता-तज्ज्ञ महत्त्वाचे असा गमतीशीर वाद निर्माण झाला. पुढे २०००च्या दशकाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेमध्ये डिझाइन आणि उपयोगशीलता दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत, असा विचार पुढे आला आणि हा वाद संपुष्टात आला. पुढे मोबाइल फोन, टॅब्लेट यांच्या उत्पादनवाढीनंतर या शास्त्राची गरज आणखी व्यापक होत गेली.
हे शास्त्र जरी पाश्चात्य देशात उदयाला आले असले तरी आज या विषयाची जाणीव, प्रयोग आणि काम आपल्या देशातसुद्धा होत आहे. भारतातील उत्पादन कंपन्या आपल्या संभाव्य वापरकर्त्यांचा अभ्यास करून प्रोडक्ट डिझाइन करत आहेत. माहिती-तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर क्षेत्रातील सेवा किंवा उत्पादन पुरवणाऱ्या प्रत्येक कंपनीमध्ये या विषयातील तज्ज्ञ माणसे लागतात. पाश्चिमात्य उद्योगांना या क्षेत्राचं महत्त्व माहिती असल्यामुळे आणि स्पध्रेत टिकून राहण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची गरज असल्यामुळे आज भारतीय डिझायनर्सना खूप मोठी मागणी आणि संधी आहे. गेल्या तीनचार दशकांपासून माहिती-तंत्रज्ञान उद्योगभारतात वाढत आहे. अमेरिका-युरोप येथील बँका, तंत्रज्ञान कंपन्या, टेलिकॉम कंपन्या, आरोग्य- विमा क्षेत्रातील कंपन्या, विमान-उद्योग कंपन्या कुशल मनुष्यबळाअभावी आणि कमी खर्चात काम करून घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर सॉफ्टवेअरनिर्मितीचे काम भारतात देतात. ही सॉफ्टवेअर उत्पादने आणि सेवा उपयुक्त आणि आकर्षक असणे हीसुद्धा स्पध्रेची एक मोठी गरज आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये हे काम करणारे स्वतंत्र विभाग निर्माण झाले. या विभागांमध्ये उपयोगशीलता तपासणारे उपयोगशीलता-विश्लेषक (Usability Analyst), लोकांना सोयीचे असे उत्पादन तयार करण्यासाठी प्रॉडक्ट डिझायनर, ग्राफिकल युजर इंटरफेसची संकल्पना तयार करण्यासाठी रचनाकार (User Experience Designer), ग्राफिक डिझायनर, व्हिज्युअल डिझायनर यांची मोठी गरज निर्माण झाली. त्यामुळे भारतातील कल्पक, कुशल युवावर्गाला या क्षेत्रात खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतातील आयआयटी, एनआयडी, सिम्बॉयसिस यांसारख्या प्रख्यात शैक्षणिक संस्थांमध्ये याविषयाचे दर्जेदार शिक्षणसुद्धा उपलब्ध आहे.
User Experience Design  हे क्षेत्र केवळ पाश्चात्य उद्योग किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांपुरते मर्यादित न राहता सामान्य भारतीय लोकांना विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना उपयोगी पडेल, असे मूलभूत संशोधनसुद्धा या विषयात होत आहे. आयआयटी, सी-डॅक यांसारख्या संस्थांमध्ये अनेक संशोधन-प्रकल्प चालतात. आज ई-गव्हर्नन्स ही संकल्पना अनेक देशांत प्रभावीपणे रुजू पाहते आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, शहरे, गावे आणि खेडय़ांतील ग्रामपंचायत तंत्रज्ञानाने जोडली जाऊन त्याचा चांगल्या प्रशासनासाठी उपयोग होण्यास सुरुवात झाली आहे. अशा ई-गव्हर्नन्स व्यवस्थेत तंत्रज्ञान, डिझाइन लोकांना उपयुक्त आणि अनुरूप असणे गरजेचे आहे. त्यामुळे तिथेही हे क्षेत्र खूप उपयोगी पडणार आहे. आज माहिती-तंत्रज्ञान भारतातल्या प्रत्येक क्षेत्रात, शहरापासून खेडय़ांपर्यंत पोहोचत आहे. बँका, सरकारी कचेऱ्या, रेल्वे-यंत्रणा, टपाल खाते, मोठी दुकाने, शाळा, महाविद्यालये संगणकीकृत होत आहेत. तंत्रज्ञान सर्वदूर पोचत आहे. हे सारे तंत्रज्ञान लोकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि सोयीचे असणे खूप महत्त्वाचे झाले आहे. ते लोकांच्या प्रादेशिक भाषेत उपलब्ध असणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाची उपयुक्त रचना (Usable Design) खूप आवश्यक बनली आहे.
तंत्रज्ञान दिवसेंदिवस आधुनिक होत असतानाच त्याची रचना, डिझाइन लोकांसाठी सोपी, उपयुक्त असावे यासाठीदेखील संशोधन चालू आहे. User Experience Design या विषयावर जगभर दरवर्षी शेकडो परिषदा आयोजित करण्यात येतात. विविध देशांतील संशोधक, गणितज्ज्ञ, डिझायनर, प्रोग्रामर एकत्र येऊन विविध प्रयोगांवरील प्रबंध सादर करतात. त्यातून सगळ्यांनाच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.
या क्षेत्रातील भारतातील व्यावसायिकांनी आणि संशोधकांनी एकत्र येऊन संघटना (HCI Professionals Association of India) स्थापन केली आणि ही संघटना दरवर्षी IndiaHCI या नावाने या क्षेत्रातील भारतीय पलूंवर आधारित परिषद आयोजित करते. भारतातील आणि जगभरातील व्यावसायिक, संशोधक, विद्यार्थी आणि शिक्षक या परिषदांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. २०१० मध्ये आयआयटी मुंबई येथे भरलेल्या IndiaHCI २०१० परिषदेमध्ये Human Computer Interaction हे शास्त्र भारतीय अर्थव्यवस्थेतील उदयोन्मुख उद्योगांसाठी कसे वापरता येईल, भारतातील सामाजिक आणि आíथक विकासासाठी हे शास्त्र कसे वापरता येईल, डिझाइनचा वापर अशिक्षित किंवा अर्धशिक्षित लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी कसा करता येईल अशा विविध पलूंवर प्रबंध सादर करण्यात आले. सप्टेंबर २०१३ मध्ये बंगळुरू येथे भरलेल्या परिषदेमध्ये या क्षेत्राचा उपयोग नवनवीन अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रप्रणाली यांच्यासाठी कसा होऊ शकेल, शिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी डिझाइन कसे वापरता येईल, अपंग आणि वृद्ध लोकांसाठी तंत्रज्ञानाची रचना करताना डिझाइन कसे वापरता येईल अशा व्यापक पलूंवर प्रबंध सादर करण्यात आले.
या क्षेत्राचा भारताच्या बाबतीत विचार केला असता असे लक्षात येईल कीइंटरनेट, मोबाइल फोन, संगणक, एटीएम या सुविधा शहरी भागाबरोबरच निम्नशहरी आणि ग्रामीण भागांत पोचण्यास सुरुवात झाली आहे. येत्या १० ते २० वर्षांत निम्नशहरी आणि ग्रामीण भागांतील खूप मोठी लोकसंख्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने वापरण्यास सुरुवात करणार आहे. शिक्षण आणि प्रशासकीय व्यवस्थांसाठी मोठय़ा प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. या पाश्र्वभूमीवर हे तंत्रज्ञान लोकांना वापरण्यासाठी उपयुक्त, सोपे आणि प्रादेशिक भाषेत उपलब्ध असणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
थोडक्यात आधुनिक तंत्रज्ञान, त्याचे डिजाइन हे केवळ एक कल्पनारम्य निर्मिती न राहता ते सर्व प्रकारच्या लोकांना, उद्योगांना उपयुक्त आणि कार्यक्षम असणेही येत्या काळाची गरज आहे. यासाठी तंत्रज्ञानाची ‘उपयोगशील’ रचना खूप महत्त्वाची ठरणार आहे.
nikwel@gmail.com
फ्रीमाँट, कॅलिफोíनया
(लेखक सॉफ्टवेअर कंपनीत वरिष्ठ यूजर एक्सपिरिअन्स डिझायनर आहेत.)

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी