अभियंता असाल तर ऑटोमोबाइल क्षेत्रात उपलब्ध असणारे करिअरचे विविध पर्याय तुम्हाला खुले आहेत. मुंबईत १८९८ मध्ये तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या कारपासून भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्राचा सुरू झालेला प्रवास आज बराच पुढे गेला आहे. ऑटोमोबाइल क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राद्वारे देशातील लाखो व्यक्तींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रोजगार मिळतो. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विस्तारामुळे गेल्या काही वर्षांत जगभरातील दिग्गज ऑटोमोबाइल कंपन्यांनी भारतात प्रवेश केला. या कंपन्या भारताकडे एक गुंतवणूक तसेच उत्पादनासाठीचे ठिकाण या दृष्टिकोनातून पाहतात. हुन्दाई, होन्डा, फोर्ड मोटर्स, टोयोटा, मारुती सुझुकी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, निस्सान आणि जनरल मोटर्स अशा अनेक कंपन्यांचे भारतात उत्पादन प्रकल्पही आहेत. यामुळे ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, टेक्निकल इंजिनीअरिंग अशी शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. वाहनाच्या यांत्रिकीत स्वारस्य असलेल्या युवावर्गाला ऑटोमोबाइल उद्योगक्षेत्रात मोठय़ा संधी
उपलब्ध आहेत.
एखाद्या वाहननिर्मितीत जुळणी, डिझायनिंग, चाचणी, सेवा, मार्केटिंग अशा वेगवेगळ्या उपघटकांचा समावेश असतो आणि त्याकरता मेकॅनिकल इंजिनीअर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर, इलेक्ट्रिकल इंजिनीअर आणि ऑटोमोबाइल इंजिनीअरची गरज भासते. काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग हा वैकल्पिक विषय उपलब्ध असतो.
ऑटोमोबाइल अभियंत्यामध्ये दुरुस्ती, देखभाल, डिझायनिंग आणि कार, ट्रक, बसेस, टेम्पो, मोपेड, मोटारसायकल, स्कूटर आणि ट्रॅक्टरसारख्या वाहनांची निर्मिती करण्याची क्षमता असते. वाहन परिणामकारकरीत्या आणि किफायशीरपणे धावण्याकरता सज्ज ठेवण्याची जबाबदारी त्यांची असते. स्वच्छतेसाठी अथवा दुरुस्तीसाठी वाहनाचे सुटे भाग वेगळे करणे, पुन्हा ते जुळवणे अथवा निकामी झालेला भाग बदलणे अशी कामे ते करतात.
ऑटोमोबाइल मेन्टेनन्स इंजिनीअरवर मेकॅनिक्स आणि वर्कशॉप्स, फॅक्टरी अथवा गॅरेजमधील इतर कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण याची जबाबदारी असते. त्याखेरीज नवी मॉडेल्स बनवणे, त्यांची क्षमता व टिकाऊपणा जोखणे, निर्मिती आणि देखभालीच्या खर्चाचा अंदाज बांधणे, आणि वाहनाची प्रत्यक्ष कामगिरी या वेगवेगळ्या मुद्दय़ांवर तो लक्ष ठेवतो. त्याकरता मागील मॉडेल्सची कामगिरी, नवनव्या कल्पनांची ओळख, नव्याने मोजणी, वाहनाच्या नव्या मॉडेल्सचे ड्रॉइंग बनवणे या विषयांचा त्याचा सविस्तर अभ्यास असावा लागतो. वाहनाच्या मॉडेलची संपूर्ण तपासणी आणि चाचणी झाल्यानंतरच मोठय़ा प्रमाणावरील उत्पादनासाठी अंतिम ड्रॉइंग बनवले जाते.

– गीता देसाई