• एखादा गुन्हा घडल्यास, एखादी वस्तू हरविल्यास किंवा चोरी झाल्यास पोलीस स्थानकात तक्रार दाखल करावी लागते. ही तक्रार कशी दाखल करावी याची माहिती असल्यास तुम्हाला तक्रार दाखल करणे सोपे जाईल.
  • तुम्हाला तक्रार कोणत्याही पोलीस स्थानकात नोंदवता येते. एखाद्या हद्दीत गुन्हा घडल्यास त्याच हद्दीतील पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा, अशी सक्ती पोलीस तुम्हाला करू शकत नाहीत. तक्रार नोंदवून ती योग्य त्या पोलीस स्थानकात वर्ग करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.
  • तुम्ही तक्रार दाखल करायला गेल्यावर लिखित स्वरूपातही आपली तक्रार मांडू शकता. अदखलपात्र गुन्ह्यांची तक्रार मुंबई पोलिसांच्या वेबसाइटवर करता येते. मात्र, दखलपात्र गुन्हा असो अथवा अदखलपात्र एफआयआर किंवा एनसीची पावती तक्रारदाराला तातडीने देणे पोलिसांना बंधनकारक असते.
  • दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्ह्य़ांमध्ये फरक काय?

१) दखलपात्र गुन्हे आणि अदखलपात्र गुन्हे असे गुन्ह्यांचे वर्गीकरण केले जाते. चोरी, घरफोडी, मोटारवाहन चोरी, अपघात, सोनसाखळी चोरी, हल्ला, बलात्कार, हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी हे गुन्हे दखलपात्र आहेत.

२) यासाठी पोलीस स्थानकातच गुन्हा दाखल करावा लागतो.

३) दखलपात्र गुन्ह्य़ाची फिर्याद नोंदविल्यानंतर एफआयआरची प्रत विनाशुल्क फिर्यादीस देण्यात येते.

४) किरकोळ गुन्हे अदखलपात्र प्रकारात मोडतात. त्याची नोंद पोलिसांच्या संकेतस्थळावरही करता येते.

५)अदखलपात्र गुन्ह्य़ात पोलीस न्यायालयाच्या आदेशाशिवाय तपास करू शकत नाहीत.

  • महिला तक्रारदारांसाठी

१) तक्रारदार जर महिला असल्यास त्याची त्वरित दखल घेऊन त्याची चौकशी व तपास करून आरोपीस तात्काळ अटक करणे पोलिसांना बंधनकारक आहे.

२) महिला तक्रारदारांना रात्रीच्या वेळी पोलीस स्थानकात फोनवरून तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. अशा वेळी पोलीस महिला पोलिसाच्या उपस्थितीत तक्रार नोंदवून घेऊ शकतात.

३) चौकशी व जबाब नोंदविताना महिलांना अपमानास्पद वाटेल, लाज वाटेल अथवा त्यांच्या चारित्र्यावर संशय निर्माण होईल, त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण होईल, असे प्रश्न पोलिसांना विचारता येत नाहीत.