फारुक नाईकवाडे
या लेखामध्ये स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर राजकीय इतिहासाचा अभ्यास कसा करावा याबाबत चर्चा करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यपूर्व इतिहास
*ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील सुरुवातीच्या काळातील वखारी, व्यापारी परवानग्या व त्यांचे परिणाम पाहायला हवेत. कंपनीची प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुध्द झालेली युध्दे पुढील मुद्यांच्या आधारे अभ्यासावीत – भारतीय सत्ता, युद्धाचे ठिकाण, प्रमुख नेते, निकाल, असल्यास तहाच्या तरतुदी, एकूणच परिणाम. तैनाती फौज धोरण, खालसा धोरण यांमधील तरतुदी, या धोरणांचा भारतीय राजसत्ता आणि जनता यांवरील परिणाम समजून घ्यावा. १८५७ पर्यंतची ब्रिटिश सत्तेची रचना घटनात्मक विकासाचा अभ्यास करताना नीट लक्षात येईल.
*भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास :
काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या राजकीय संस्थांचा आढावा पार्श्वभूमी, विचार, मागण्या, प्रमुख नेते, योगदान अशा मुद्यांच्या आधारे घेता येईल.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या दोन (मवाळ व जहाल) कालखंडांचा अभ्यास पुढील मुद्यांच्या आधारे करता येईल- सामाजिक, राजकीय, आर्थिक पार्श्वभूमी व त्याबाबतचे सिध्दांत, दोन्ही कालखंडातील नेत्यांच्या मागण्यांची तुलना, दोन्ही कालखंडातील महत्त्वाचे नेते व त्यांचे वैशिष्टय़पूर्ण कार्य, दोन्ही कालखंडातील यशापयश, ब्रिटिशांची प्रतिक्रिया, बंगालची फाळणी, सुरत विभाजन, होमरूल आंदोलन, लखनौ करार.
अभ्यासक्रमामध्ये नमूद महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका अभ्यासताना वैयक्तिक माहिती, शिक्षण, व्यवसाय, व्यावसायिक यशापयश, राष्ट्रवादी विचार, त्यासाठी स्थापन केलेल्या संस्था संघटना, वृत्तपत्रे, अन्य लेखन, सामाजिक सुधारणांमधील भूमिका/योगदान हे मुद्दे लक्षात घ्यावेत.
*ब्रिटिश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव
शेतकरी व आदिवासींचे उठाव, साम्यवादी (डावी) चळवळ, १८५७ चा उठाव, कामगार, संस्थानी जनता इ. च्या चळवळी/बंड यांचा अभ्यास करताना पुढील मुद्दे पाहावेत- कारणे/पार्श्वभूमी, स्वरूप, विस्तार, वैशिष्टय़े, प्रमुख नेते, ठळक घडामोडी, यशापयशाची कारणे, परिणाम, इतिहासकारांच्या /समकालीनांच्या प्रतिक्रिया.
क्रांतिकारी चळवळींचा अभ्यास उदयाची पार्श्वभूमी, स्वरूप, कार्ये, मुख्य ठिकाण, ठळक कारवाया/घडामोडी, महत्त्वाचे नेते व त्यांचे योगदान, ठळक विचार, भारताबाहेरील कार्ये आणि त्याचे स्वरूप, महिलांचा सहभाग, वृत्तपत्रे/मुखपत्रे, साहित्य, खटले अशा मुद्यांच्या आधारे करावा.
आझाद हिंद सेनेची स्थापना, त्यामागची पार्श्वभूमी, राष्ट्रीय लढय़ातील योगदान, महत्त्वाच्या घडामोडी व संघर्ष, यशापयश असे मुद्दे पाहावेत.
*गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ व अस्पृश्यता निर्मूलन –
गांधीयुगातील असहकार, सविनय कायदेभंग, चलेजाव इ. चळवळी अभ्यासताना त्यातील संघर्षांचे स्वरूप व त्यामागील विचारसरणी समजून घेऊन मग महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करणे उपयुक्त ठरेल. या प्रत्येक आंदोलनानंतर ब्रिटिशांच्या प्रतिक्रिया/कायदे, भारतीयांना देऊ करण्यात आलेल्या बाबी, भारतीय नेत्यांच्या प्रतिक्रिया व यशापयश या गोष्टी अभ्यासणे आवश्यक आहे. या चळवळींचा भाग म्हणून किंवा त्यांना समांतरपणे सुरू झालेले वैशिष्टय़पूर्ण संघर्ष (झेंडा सत्याग्रह, जातीय सरकार इ.) यांचा अभ्यास बारकाईने करावा.
गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यता निर्मूलनाबाबतचा दृष्टिकोन आणि भूमिका, विचार, लेखन, कार्य, महत्त्वाचे सत्याग्रह/संघर्ष यांचा आढावा घ्यावा. जाती व्यवस्थेच्या उच्चाटनासाठीच्या चळवळींचा अभ्यास पार्श्वभूमी, कारणे, स्वरूप, प्रमुख नेते, साहित्य, संघर्ष, यशापयशाची कारणे, फलनिष्पत्ती, समकालीनांच्या प्रतिक्रिया अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा.
*ब्रिटिश प्रशासनाधीन घटनात्मक विकास आणि सत्तेचे हस्तांतर-
ब्रिटिशांच्या कायद्यांचा व स्वातंत्र्याच्या योजनांचा कालानुक्रमे अभ्यास महत्त्वाचा आहे. या कायद्यांची पार्श्वभूमी, तरतुदी, परिणाम, भारतीयांच्या प्रतिक्रिया, संबंधित व्हाइसरॉय, भारतमंत्री इ. मुद्दे एकत्रित अभ्यासता येतील.
*सांप्रदायिकतेचा विकास व फाळणी –
मुस्लीम राजकारण आणि हिंदू महासभेचे राजकारण मध्यवर्ती ठेवून सांप्रदायिकतेच्या उदय आणि विकासात महत्त्वाच्या ठरलेल्या घडामोडी, इतर पार्श्वभूमी, नेते, वैचारिक भूमिका, त्यामागची कारणे, सांप्रदायिक राजकारणाचे सामाजिक आणि राजकीय परिणाम, स्वातंत्र्य चळवळीमधील या विचारधारांचे योगदान आणि त्यांचा स्वातंत्र्य चळवळींवर झालेला परिणाम, फाळणी हे मुद्दे समजून घ्यायला हवेत.
स्वातंत्र्योत्तर इतिहास
*अंतर्गत राजकारण
स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात फाळणीची कारणे, त्यातील गुंतागुंत, परिणाम/स्वरूप आणि संस्थानांचे विलीनीकरण विशेषत: जुनागढ, हैदराबाद व काश्मीरच्या बाबतीत परिपूर्णपणे अभ्यासायला हवे. उशिरा विलीन झालेल्या संस्थानांबाबत महत्त्वाच्या घडामोडी लक्षात घ्यावात.
भाषावार प्रांतरचनेची मागणी, त्यासाठीचे आयोग व शिफारसी, संघर्ष, विशेषत: संयुक्त महाराष्ट्राबाबतच्या शिफारसी हा भाग काळजीपूर्वक अभ्यासायला हवा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास महत्त्वाचे नेते, विविध विचारप्रवाह, राजकीय पक्ष व त्यांच्या भूमिका, महत्त्वाच्या घडामोडी अशा मुद्दय़ांच्या आधारे करता येईल.
इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रादेशिक राजकीय चळवळी उदा. जयप्रकाश नारायण यांचे विद्यार्थी आंदोलन, आनंदपूर साहिब प्रस्ताव, भाषावार प्रांत रचनेबाबतचे संघर्ष अशा मुद्दय़ांचा अभ्यास आवश्यक आहे. या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमधील महत्त्वाचे नेते, त्यांचे महत्त्वाचे व प्रभावी समर्थक, पार्श्वभूमी, स्वरूप, घोषणा, कारणे, परिणाम, यशापयशाची कारणे, इतिहासकारांची मते अशा मुद्दय़ांच्या आधारे त्यांचा अभ्यास करावा. आणीबाणी कालखंडातील महत्त्वाच्या घडमोडी, नेते, त्यांचे कार्य, विचार यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
काश्मीर, पंजाब व आसाममधील आतंकवाद, नक्षलवाद व माओवाद या समस्यांच्या उदयामागची सामाजिक, राजकीय व आर्थिक पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी. त्यांचे स्वरूप, प्रभावाचे क्षेत्र, महत्त्वाचे नेते व समर्थक सामाजिक वर्ग, वैचारिक भूमिका, संघर्षांचे स्वरूप, मागण्या, परिणाम, यशापयशाची कारणे अशा मुद्दय़ांचा अभ्यास करावा.
कृषी, उद्योगधंदे, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान यांमधील प्रगती याबाबतची धोरणे, योजना, स्थापन केलेल्या संस्था यांचा आढावा घ्यावा. पहिल्या सहा पंचवार्षिक योजनांचा अभ्यास या पेपरमध्येही मदतगार ठरणार आहे. या आधारे नक्षलवाद, माओवाद, विकासाचा असमतोल इ. बाबींचा संकल्पनात्मक अभ्यास शक्य होईल.
*आंतरराष्ट्रीय राजकारण
भारताच्या परराष्ट्र धोरणाची आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी, धोरणाची राष्ट्रीय गरज, कारणे, धोरणाचे नेमके स्वरूप, तत्त्वे, कालपरत्वे त्यामध्ये झालेले बदल व त्यांची कारणे, धोरणाची अंमलबजावणी करताना घडलेल्या ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी, धोरणाचे परिणाम व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया आणि मूल्यमापन असे मुद्दे विचारात घ्यावेत.
शेजारील देशांशी भारताचे संबंध हे ऐतिहासिक पार्श्वभूमी, सहकार्य आणि संघर्षांची कारणे, स्वरूप, परिणाम, ठळक करार/निर्णयांचे परिणाम व त्यांमधील नेत्यांची भूमिका अशा मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासावेत.