सागर भस्मे

Indian Geography In Marathi : मागील लेखातून आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाविषयी माहिती घेतली. या लेखामधून आपण भारतीय बेटे, निर्मिती आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबाबत जाणून घेऊया.

भारतीय क्षेत्रात भारताच्या मुख्य भूमीशिवाय बेटांच्या दोन समुहाचा समावेश होतो. ते अनुक्रमे अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे आणि बंगालचा उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे ही आहेत. भारताच्या मुख्य भूमिपासून दूरवर असलेल्या या दोन्ही बेटांच्या समुहाची प्राकृतिक वैशिष्य आतिशय भिन्न असून दोन्ही समुहाची स्थाने उष्ण कटिबंधीय सागरामध्ये आहेत. या दोन्ही महासागरात मिळून ६१५ बेटे अस्तित्वात आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या, निर्मिती आणि विस्तार

अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे

लक्षद्वीप या शब्दाचा अर्थ ‘एक लाख बेटे’ असा असला तरी लक्षद्वीप बेट समुहामध्ये फक्त २७ बेटं असून त्यापैकी केवळ १० ते ११ बेटांवरच मानवी वसाहत आहे. लक्षद्वीप बेट समुहाची निर्मिती सागरी प्रवाळाच्या संचनामुळे झालेली असून या बेटांचे क्षेत्रफळ फक्त ३२ चौ.की.मी. आहे. १९७३ साली भारत सरकारने लखदीव, मिनीकॉय आणि अमीनदिवी या बेटाचे लक्षव्दीप असे नामकरण केले.

लक्षदीप बेट समूह ८° चॅनलमुळे मालदीव पासून तर ९° चॅनलमुळे मिनीकॉयपासून वेगळे झाले आहेत. लक्षद्वीप बेटातील मिनीकॉय बेट सर्वात मोठे असून त्याचे क्षेत्रफळ ४.५३ किमी आहे. लक्षव्दीप बेटाची उंची समुद्रसपाटीपासून पाच मीटर पेक्षाही कमी असून या बेटावर पर्वश्रेणी किंवा नदी यांचे अस्तित्व नाही. बेटावरील एकमेव विमानतळ म्हणजे अगादि विमानतळ. लक्षव्दीप बेटावर चालणाऱ्या स्कूबा डायव्हिंग, विंडसर्फींग, वॉटरस्किइंग इत्यादी जलक्रिडांमुळे हा परिसर पर्यटकांचे आकर्षण बनला आहे.

बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटसमूह

अंदमान आणि निकोबार बेटसमूह हा भारताच्या आग्नेयस असलेला एक केंद्रशासित प्रदेश आहे. पोर्ट ब्लेयर ही अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी आहे. ही बेटे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने ‘राखीन योमा’ या समुद्रात बुडालेल्या पर्वतरांगांची पाण्यावर दिसणारी शिखरे आहेत.

अंदमान आणि निकोबार बेट समुहामध्ये एकूण बेटांची संख्या ५७२ असून फक्त त्यापैकी ३८ बेटावर मानवी वस्ती आहे. या बेटांचे भारताच्या मुख्य भुमिपासून अंतर म्हणजे कोलकत्यापासून १२५५ किमी, तर चेन्नईपासून १९९० किमी आहे. या बेटांना सामान्यताः जरी अंदमान-निकोबार-निकोबार बेटे म्हणत असले तरी ही दोन वेगळी समूह आहेत आणि ते एका खाडीने विभागले गेले आहेत, याला १०° चॅनल खाडी असे म्हणतात.

अंदमान बेटसमूह

अंदमान आणि निकोबारमध्ये अंदमान बेट समूह व निकोबार बेट समूह अशी दोन गटांमध्ये विभागणी केली जाते. यापैकी अंदमान समुहामध्ये ३२५ बेटे असून ‘सॅडल’ हे सर्वोच्च शिखर याच समुहात आहे. तसेच अंदमान निकोबारची राजधानी सुद्धा या समुहामध्ये आहे. अंदमान समुहातील मध्य अदमान हे सर्वात मोठे बेट असून रॉस बेट हे सर्वात लहान बेट आहे. या समुहामध्ये बॅरेन आणि नारकोडे हे दोन ज्वालामुखीची बेटे आहेत. या समुहामध्ये प्रामुख्याने वाळूचा खडक चुनखडी आणि शेल आढळते.

२०१८ मध्ये आझाद हिंद सेनेला स्थापन होऊन ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारत सरकारने अंदमानमधीन तीन बेटांचे नामकरण केले. त्यामध्ये राज आयलॅडला ‘नेताजी सुभाषचंद्र बोस व्दीप’, नील बेटाला ‘शहीद व्दीप’ आणि हॅवलॉक बेटाला ‘स्वराज व्दीप’ असे नाव देण्यात आले.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतीय भूगोल : उत्तर भारतीय मैदानी प्रदेश

निकोबार बेटसमूह

निकोबार बेट समुहामध्ये २४७ बेटे असून ही प्रामुख्याने प्रवाळ खडकापासून बनलेली आहेत. निकोबार बेटांमध्ये कार निकोबार, छोटे निकोबार, मोठे निकोबार, नानकवरी कोमोती, काचाल इत्यादी प्रमुख बेटे आहेत. मोठे निकोबार हे सर्वात मोठे असून ते दक्षिणेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंदमान-निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअर येथे वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एकमेव विमानतळ आहे. अंदमान निकोबारमध्ये लक्षद्वीपच्या तुलनेत पर्यटन क्षेत्र पोर्ट ब्लेअर व त्याच्या जवळच्या काही बेटांपुरतेच मर्यादित आहे. या समुहामध्ये अंदमानिज, ओंगे, जारवा, सेंटिनलिज, निकोबार जमाती आणि शोमपेन या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.