News Flash

करिअरमंत्र : आवडीचे करिअर कसे निवडू?

सर्वप्रथम एमबीए केल्यानेच यशस्वी उद्योजक होता येते, हा विचार मनातून काढून टाका.

करिअरमंत्र : आवडीचे करिअर कसे निवडू?

मी सध्या इलेक्ट्रॉनिक्स विषयातील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांला आहे. दहावी, बारावीमध्ये चांगले गुण होते. पालकांनी सांगितल्यामुळे  मी अभियांत्रिकीची शाखा निवडली. मला कॉम्प्युटरमध्ये आवड होती. पण बाबांचे ऐकून इलेक्ट्रॉनिक्स घेतले. मला त्यात अजिबात आवड नाही. मला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जायचे नाही. माझे व्यक्तिमत्त्व आणि आवड लक्षात घेता मला एमबीए-एचआर करावेसे वाटते. मी यामध्ये करिअर करू का, यात किती संधी आहे ? -विदुला झांजे

तुला तुझ्या अंगभूत गुणांची उत्तम जाण आहे आणि ती स्पष्टपणे विदित केल्याबद्दल अभिनंदन. ज्या विषयात आवड नसेल त्यात मन मारून अभ्यास करण्यात व प्रावीण्य मिळवण्यात फार काही फायदा होत नाही. प्रगतीच्या संधीही खुंटतात. त्यामुळे तू ह्य़ुमन रिसोर्स या विषयात एमबीए करण्यास काहीच हरकत नाही. तथापी हा विषय चांगल्या शासकीय वा खासगी एमबीए महाविद्यालयातून करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रारंभी उत्तम प्लेसमेंट मिळू शकते. त्याचा पुढे फायदा होऊ  शकतो.

मी सध्या बी.टेक. करत आहे. मला शासकीय नोकरी हवी आहे. तसेच रेल्वे, र्मचट नेव्हीमध्येही मला आवड आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
– विशाल गिरी

अभियांत्रिकी क्षेत्रातील नोकरी तुम्ही पुढील पद्धतीने मिळवू शकता.

गेट (GATE) परीक्षेत उत्तम गुण मिळवल्यास अनेक कंपन्या मुलाखतीसाठी बोलावू शकतात. त्यात चांगली कामगिरी केल्यास संबंधित कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते.

इंडियन इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिस – यूपीएससीमार्फत केवळ अभियंत्यांसाठी घेतली जाणारी ही परीक्षा आहे. ही परीक्षा देऊन अल्पावधीतच वरच्या श्रेणीचे शासकीय पद मिळू शकते. यामध्ये रेल्वेमधील पदे असतात.

बीएसएनएल वा एमटीएनएलमधील कनिष्ठ अभियंत्यांची पदे स्वतंत्र जाहिराती देऊन भरली जातात. रेल्वेमधीलही काही पदे अशाच प्रकारच्या जाहिराती देऊन भरली जातात. त्यासाठी अशा जाहिरातींकडे लक्ष ठेवावे.

मी बी. कॉम.च्या तिसऱ्या वर्गात शिकत आहे. माझं माध्यम मराठी आहे. पुढे मला पुण्याला शिकायला जायचंय. मी एम.कॉम. करू की एमबीए ? -धनश्री शेटे, उजनी,

एमबीएची पदवी प्राप्त करणे ही सध्या विशेष अशी कठीण बाब राहिलेली नाही. मात्र नामवंत आणि दर्जेदार महाविद्यालयांमध्येच चांगल्या कंपन्या प्लेसमेंटसाठी जातात. त्यामुळे अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुला एमबीए/एमएमएस प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेत किमान ९७ टक्के पर्सेटाइल किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळायला हवेत. फायनान्स, मार्केटिंग, सेल्स, ह्य़ुमन रिसोर्स या विषयांपैकी ज्यामध्ये तुला सध्या आवड वा रस वाटत असेल त्या विषयाचे स्पेशलायझेशन दर्जेदार महाविद्यालयांमधून केल्यास करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात. एम.कॉम.चा पर्याय आहेच.  त्यातील काही विषयांमध्ये चांगले प्रभुत्व, लेखन आणि संवाद कौशल्य तसंच संगणकीय कौशल्य प्राप्त केल्यासही उत्तम संधी मिळू शकतात.

मी बी.कॉम. केले आहे. मला यशस्वी उद्योजक व्हायचे आहे. त्यासाठी मी एमबीए सीईटी २०१७ देणार आहे. कृपया मार्गदर्शन करा. 
– एक वाचक

सर्वप्रथम एमबीए केल्यानेच यशस्वी उद्योजक होता येते, हा विचार मनातून काढून टाका. उद्योजक होण्यासाठी आपल्या संकल्पना स्पष्ट हव्यात. मुळात उद्योग करण्याची आस हवी. त्या अनुषंगाने प्रारंभिक भांडवल व इतर संसाधने उपलब्ध करून घेण्याची क्षमता हवी. उद्योजक होण्यासाठी प्रचंड मेहनत आणि सहनशीलता हवी. एमबीए  केल्याने व्यापार, व्यवसाय, वित्त, मनुष्यबळ, विक्री, विपणन या बाबींचे ज्ञान प्राप्त होते. कोणताही उद्योग यशस्वी करण्यासाठी या बाबी उपयुक्त ठरू शकतात.

मी बी.कॉमच्या अंतिम वर्षांला आहे. मला सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरची परीक्षा द्यायची इच्छा आहे. तर मी ही परीक्षा देऊ  शकतो का? त्यासाठी मला कशी तयारी करावी लागेल ? -प्रसाद नवले

तू सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरची परीक्षा देऊ  शकतोस. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरची परीक्षा प्राथमिक आणि मुख्य अशी दोनस्तरीय असते. प्राथमिक परीक्षेत १०० गुणांचा एक तासाचा बहुपर्यायी  वस्तुनिष्ठ पद्धतीचा पेपर असतो. या पेपरचा दर्जा पदवी परीक्षेचा असतो. या पेपरमध्ये पुढील विषयांवर प्रश्न विचारले जातात- बुद्धिमापन चाचणी व अंकगणित, सामान्य विज्ञान (भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र/ प्राणीशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ आरोग्यशास्त्र),अर्थव्यवस्था-(शासकीय अर्थव्यवस्था-अर्थसंकल्प/ लेखा/ लेखा परीक्षण/ भारतीय अर्थव्यवस्था- शेती, उद्योग, राष्ट्रीय उत्पन्न, लोकसंख्या, परकीय व्यापार, बँकिंग, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती,),भूगोल- विशेष भर महाराष्ट्राचा भूगोल, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान ,अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इतिहास-आधुनिक भारत/ विशेष भर महाराष्ट्र ,नागरिकशास्त्र- ग्राम प्रशासन/ व्यवस्थापन, राज्य प्रशासन, भारतीय राज्य घटनेचा प्राथमिक अभ्यास, चालू घडामोडी- भारत आणि जग.

मुख्य परीक्षेत दोन पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये इंग्रजी भाषेवर ४० गुणांचे ४० प्रश्न आणि मराठी भाषेवर ६० गुणांचे ६० प्रश्न विचारले जातात. इंग्रजी भाषेच्या प्रश्नांचा स्तर पदवीस्तरीय आणि मराठी भाषेच्या प्रश्नांचा स्तर १२वीचा असतो. या पेपरचा कालावधी एक तास. दुसऱ्या पेपरमध्ये १०० गुणांचे १०० प्रश्न विचारले जातात. या पेपरचा कालावधी एक तासाचा असतो. हे दोन्ही पेपर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचे असतात.

पेपर क्रमांक एकमध्ये मराठी व इंग्रजी भाषेवर आधारित प्रश्न विचारले जातात. मराठी विषयाच्या प्रश्नांमध्ये वाक्यरचना, वाक्प्रचार आणि म्हणी, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, उताऱ्यावरील प्रश्न, सामान्य शब्दसंग्रह, व्याकरण यांचा समावेश असतो.

इंग्रजी विषयाच्या प्रश्नांमध्ये शब्दसंग्रह, वाक्प्रचार आणि म्हणी, वाक्यरचना, उताऱ्यावरील प्रश्न, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, व्याकरण, शब्दांचा उपयोग यांचा समावेश असतो.

पेपर क्रमांक दोनमध्ये (सामान्य अध्ययन) साधारणत: सार्वजनिक वित्त व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, आर्थिक सुधारणा आणि कायदे, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, नियोजन, संगणक व माहिती तंत्रज्ञान, माहिती अधिकार अधिनियम- २००५, भारतीय राज्य घटना, महाराष्ट्राचा इतिहास व भारताचा भूगोल, बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी-(भारत आणि जागतिक) या विषयांवर प्रश्न विचारले जातात.

मी एमबीएच्या शेवटच्या वर्षांला आहे. माझी उंची कमी आहे तर मला एमपीएससीच्या कोणत्या परीक्षा देता येतील ? -महेश मिस्त्री

पोलीस भरती / वन विभागातील भरती सोडल्यास एमपीएससीच्या परीक्षांसाठी उंची हा महत्त्वाचा निकष ठरत नाही. तू राज्य सेवा परीक्षा, विक्रीकर निरीक्षक, साहाय्यक या परीक्षा देऊ  शकतोस.

बीसीए/एमसीएसाठी भविष्यात कोणत्या नोकऱ्या आहेत ?  – राजेंद्र विसपुते

बीसीए/एमसीए अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डिझाइन, सिस्टीम्स मॅनेजमेंट, टेक्निकल रायटर, सॉफ्टवेअर आर्किटेक्ट्स, डिझाइन इंजिनीअर, जावा डेव्हलपर, क्वालिटी अ‍ॅशुरन्स इंजिनीअर, बिझिनेस डाटा प्रोसेसिंग, सिस्टीम अ‍ॅनलिस्ट, मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम आदी क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी मिळू शकतात. मात्र यासाठी संबंधित उमेदवाराने कौशल्य प्राप्त करणे आवश्यक ठरते. जेवढी तुमची गुणवत्ता जास्त तेवढय़ा संधी जास्त.

मी बी.ए.ला आहे. मला एमपीएससीची तयारी करायची आहे. त्यासाठी मी भूगोल, इतिहास, अर्थशास्त्राशी संबंधित कोणती पुस्तके वाचू? कोणते लर्निग अ‍ॅप्स महत्त्वाचे ठरतील? कोणत्या वेबसाइट्स महत्त्वाच्या ठरतील? कृपया मार्गदर्शन करावे.  – प्रिया दुर्गे    

विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी जी अधिकृत पुस्तके आहेत, त्याचा संपूर्ण समजून उमजून अभ्यास करायला हवा. त्याशिवाय एनसीईआरटी (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग)ची १२वीपर्यंतची संबंधित विषयाची पुस्तके काळजीपूर्वक वाचली तर या विषयांचा पाया मजबूत होऊ  शकतो. कोणत्याही अ‍ॅप अथवा संकेतस्थळावरील अभ्यास साहित्याची गुणवत्ता आणि दर्जा सिद्ध करणे कठीण आहे. त्यामुळे अशा ऑनलाइन साधनांचा काळजीपूर्वकच वापर करायला हवा.

मी अनुसूचित जाती संवर्गातील असून मला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे. माझ्याकडे जास्त भांडवल नाही. इतर छोटा व्यवसायही नाही. मला स्टँड अप इंडिया आणि मुद्रा बँकेबद्दल माहीत आहे. इतर कोणती सरकारी योजना आहे का ज्याद्वारे मी कर्ज घेऊन स्वत:चा व्यवसाय करू शकतो? – गौतम बाविस्कर, मालेगाव नाशिक

पंतप्रधान रोजगार योजनेद्वारे आपणास कर्ज मिळू शकते. ही योजना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवली जाते. प्रत्येक जिल्ह्य़ाच्या मुख्यालयात हे कार्यालय असते. या कार्यालयात आपण संपर्क साधावा.

काही अटी व शर्ती- वयोमर्यादा- खुला संवर्ग १८ ते ४० वर्षे. अनुसूचित जाती-जमाती संवर्गास दहा वर्षांची सूट.

शैक्षणिक अर्हता- किमान आठवी उत्तीर्ण. शासकीय अथवा शासनमान्य शिक्षण संस्थेत उदा.आयटीआयमध्ये किमान सहा महिने एखाद्या विषयाचे प्रशिक्षण घेतल्यास प्राधान्य.

उत्पन्न मर्यादा- वार्षिक ४० हजार. उमेदवार संबंधित क्षेत्रात किमान ३ वर्षांचा रहिवासी असावा. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा थकबाकीदार नसावा. प्रकल्पाची किंमत व्यवसायासाठी १ लाख रु. आणि इतर उद्योगासाठी २ लाख असावी. अनूसुचित जाती/जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी २२.५ टक्के राखीव. http://laghu-udyog.gov.in/publications/

ग्रामीण विकासविषयक पदविका अभ्यासक्रम

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड पंचायती राज, हैद्राबाद येथे उपलब्ध असणाऱ्या ग्रामीण विकास व्यवस्थापन या विशेष पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या २०१७ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी खालीलप्रमाणे प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभ्यासक्रमाचा कालावधी व आवश्यक शैक्षणिक पात्रता- एक वर्ष कालावधीच्या या अभ्यासक्रमासाठी कुठल्याही विषयातील पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षांला असलेला विद्यार्थी अर्ज करू शकेल.

निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर निवडक परीक्षा केंद्रांवर ६ नोव्हेंबर २०१६ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे केंद्राचा समावेश असेल. पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व लेखी निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे  अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह पाठवायचे शुल्क-  सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी २०० रु.चा (राखीव वर्गगटातील उमेदवारांनी १०० रु. चा) ‘एनआयआरडी- पीजीडीआरएम’ यांच्या नावे असणारा व हैद्राबाद येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रूरल डेव्हल्पमेंट अ‍ॅण्ड पंचायती राज, हैद्राबादच्या दूरध्वनी क्र. ०४०- २४००८५२२ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.nird.org.in/ pgdrdm.aspx या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख-

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कंट्रोलर (अ‍ॅडमिशंस) सेंटर फॉर पीजी स्टडीज अ‍ॅण्ड डिस्टन्स एज्युकेशन, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड पंचायती राज, राजेंद्रनगर, हैद्राबाद ५०० ०३० या पत्त्यावर २६ आक्टोबर २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2016 1:30 am

Web Title: how to choose a favorite career
Next Stories
1 देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : ब्रिटनमध्ये करा पीएचडी
2 नोकरीची संधी
3 यूपीएससीची तयारी : नतिक वैचारिक प्रणाली
Just Now!
X