News Flash

‘प्रयोग’ शाळा : रंजक विज्ञानसफर 

वाईकर सरांनी विज्ञानाला विद्यार्थ्यांचा शत्रू नाहीतर मित्र बनवले आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

विज्ञान का शिकायला हवे? या प्रश्नाची उत्तरे देणाऱ्या अनेक व्यक्ती सापडतात. पण ते कसे शिकवायला हवे? हा प्रश्न मात्र भल्याभल्यांना पेचात टाकतो. त्यामुळेच विज्ञान हा विषय शिकवणे, शिक्षकांना कायमच एक आव्हान वाटत आलेले आहे. नागेश वाईकर या शिक्षकांने मात्र ते आव्हान हसतहसत स्वीकारले आहे.

‘विज्ञान  फक्त पुस्तकात शिकायचा नव्हे तर प्रयोगांनी सिद्ध करून पाहायचा विषय आहे ’ ही शिकवण प्रत्यक्षात आणत आहेत, हिंगोली जिल्ह्य़ातील जवळा बाजार येथील शिवनेरी माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षक नागेश वाईकर. गेल्या चौदा वर्षांपासून ‘करा, शोधा आणि शिका’ या त्रिसूत्रीचा वापर करून ते विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करू पाहत आहेत.

‘करा, शोधा आणि शिका’ हे तत्त्व मानणाऱ्या वाईकर सरांनी विज्ञानाला विद्यार्थ्यांचा शत्रू नाहीतर मित्र बनवले आहे. साधारणत: आपल्या घरातल्या प्लास्टिकच्या बाटल्या, स्ट्रॉ, इंजेक्शनच्या सिरिंज, फुगे, खिळे अशा वस्तू भंगारची धन होतात, पण वाईकर सरांच्या शाळेत याचा उपयोग विज्ञानाच्या तासाला होतो. त्यांनी विद्यार्थ्यांना सोबतीला घेऊन चक्क अशा टाकाऊ वस्तूंपासून एक धम्माल विज्ञान शोधिका बनवली आहे. या शोधिकेमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी पचन संस्था, मानवी डोळा, मानवी मेंदू, अणुसंरचना अशी मॉडेल्स तयार केली आहेत. या शोधिकेसाठी त्यांना शाळेचे मुख्याध्यापक बळवंतराव चव्हाण यांनी पूर्ण सहकार्य केले. शिवाय गरज असेल तिथे योग्य मार्गदर्शनही केले. प्रयोगशाळेतल्या काचेच्या वस्तूंची, तिथल्या चंचूपात्रांची एकूणच वातावरणाची विद्यार्थ्यांना काहीशी भीती वाटते. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तर जास्तच. पण विज्ञान शोधिकेमधल्या उपकरणांशी विद्यार्थ्यांची चांगली मैत्री झाली आहे, कारण ती त्यांनीच तयार केली आहेत. तीही आपल्याच आसपासच्या वस्तूंपासून.  विज्ञान शोधिकेसोबतच या आश्रमशाळेत आणखीन एक महत्त्वाचा आणि वेगळा उपक्रम राबवला जातो. तो म्हणजे ‘दिवसा उजेडीचे खगोलशास्त्र’ ही कार्यशाळा. नवनिर्मिती संस्थेच्या सहयोगातून आणि वाईकर सरांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन केले जाते. सूर्याची प्रतिमा चेंडू आणि आरशाच्या आधारे पाहणे, दोन काठय़ांच्या साहाय्याने सावल्यांची लांबी व उंचीचे गुणोत्तर घेणे, इमारतीवर न चढता तिची उंची मोजणे अशा प्रकारचे प्रयोग विद्यार्थी या कार्यशाळेत करत असतात. यातूनच प्रेरणा घेऊन आता वाईकर सर आता शाळेत चक्क टेलिस्कोप बनवण्याची कार्यशाळा घेतात. त्यासाठी टाकाऊ पुठ्ठे, सूक्ष्मदर्शीची नेत्रिका,

३० सेंमी नाभीय अंतराचे भिंग, चेंडू आणि लेस इतक्या साध्या गोष्टींचा वापर होतो. या टेलिस्कोपमधून विद्यार्थी चंद्राचे निरीक्षण, त्यावरील खड्डे, सूर्याची कागदावरील प्रतिमा घेणे, सूर्य डाग पाहणे इ. गोष्टींचा अभ्यास करतात. इथल्या विद्यार्थ्यांना सोबत घेत नागेश वाईकर सरांनी नॅनो सूर्यमालासुद्धा बनवली आहे. ती बनवण्यासाठीसुद्धा आपल्या रोजच्या वापरातले मणी, गोटय़ा, प्लास्टिक बॉल्स, बेअरिंग याचा वापर केला जातो. खऱ्या सूर्यमालेतील ग्रहांचा व्यास एक अब्ज पटीने कमी करून ही नॅनो सूर्यमाला बनवली जाते.

या सगळ्याबरोबरच शाळेमध्ये इतरही अनेक चांगले उपक्रम चालतात. उदा. शाळेच्या शौचालयापासून बायोगॅस निर्मिती, जलसंधारणासाठी जलदिंडी, वॉटर ऑडीट, पर्यावरणपूरक होळी, फटाके मुक्त दिवाळी इ. या सर्व उपक्रमांमागची शास्त्रीय कारण समजावून देण्यास नागेश सर कायमच तयार असतात. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी शाळेत एक खास कार्यक्रम असतो. हा कार्यक्रम सादर करतात, शाळेतीलच काही विद्यार्थी. दाब, बल, भिंग, प्रकाश, विद्युतधारा अशी एक संकल्पना नक्की केली जाते. त्यावर आधारित प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थी करतात. त्यासाठीची तयारी, त्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य, मुख्यत तो प्रयोग डिझाइन करणे, या सगळ्या गोष्टी विद्यार्थी स्वत करतात. त्यासाठी अर्थातच त्यांना वाईकर सरांचे संपूर्ण सहकार्य लाभते. या शाळेत शिक्षण तर चांगल्याप्रकारे देण्याचा प्रयत्न होतोच; पण आपण घेत असलेल्या शिक्षणाचा पुढील आयुष्यात काय उपयोग आहे? नेमके काय प्रयोजन आहे? हेसुद्धा विद्यार्थ्यांना माहिती करून दिले जाते. त्यासाठी असतो गप्पांचा तास. या गप्पांच्या तासाला डॉक्टर, इंजिनीअर, कृषी तज्ज्ञ, उद्योजक यांना शाळेत निमंत्रित केले जाते. विद्यार्थीच त्यांची मुलाखत घेतात आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात. या गप्पांतून, प्रश्नांतून आणि पाहुण्यांनी आणलेल्या स्लाइड्समधून विद्यार्थ्यांना त्या त्या क्षेत्राची ओळख होते. तिथे प्रत्यक्ष काम कसे चालते, याची कल्पना येते.

एकूणच पुस्तक आणि प्रयोगशाळेतच विज्ञानासा बंदिस्त न ठेवता थेट विद्यार्थ्यांच्या मनात आणि डोक्यात त्याचे स्थान पक्के करण्याचे काम नागेश वाईकर करत आहेत. ते म्हणतात, आपल्या सभोवतालच्या गोष्टींतले, तर्कसंगत निरीक्षण आणि विश्लेषण विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या अधिक जवळ आणते. आपल्या आसपासच्या लहानसहान गोष्टीत विज्ञान कशाप्रकारे आहे, हे समजल्यावर त्यांची या विषयाची गोडी वाढते.

इथल्या विद्यार्थ्यांना सोबत घेत नागेश वाईकर सरांनी नॅनो सूर्यमालासुद्धा बनवली आहे. ती बनवण्यासाठीसुद्धा आपल्या रोजच्या वापरातले मणी, गोटय़ा, प्लास्टिक बॉल्स, बेअरिंग याचा वापर केला जातो. खऱ्या सूर्यमालेतील ग्रहांचा व्यास एक अब्ज पटीने कमी करून ही नॅनो सूर्यमाला बनवली जाते.

संकलन -स्वाती केतकर-पंडित

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 5:10 am

Web Title: teacher nagesh waikar accept challenge to teach science topic
Next Stories
1 यूपीएससीची  तयारी : वर्तन बदलाचे परिणाम
2 विद्यापीठ विश्व : पुण्यनगरीतील शिक्षणकेंद्र
3 करिअर कथा : स्वरकटय़ार
Just Now!
X