विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही लेखात आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी इतिहासाच्या अभ्यासाविषयी माहिती पाहिली आज आपण भूगोलाचा अभ्यास नेमका कसा आणि कोणत्या पद्धतीने करावा यासंदर्भात पाहूयात.

* अभ्यासक्रम

आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी भूगोलाच्या अभ्यासक्रमात ‘महाराष्ट्र, भारत आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक व आíथक भूगोल’ इतक्याच मुद्दय़ांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. याच अभ्यासक्रमाची जर आपण फोड केली तर यामध्ये भारताचा व महाराष्ट्राचा रचनात्मक (Physiographic) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नसíगक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या, लोकसंखेचे स्थलांतर व त्याचे Source व Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे प्रश्न, कृषी परिस्थितिकी, पर्यावरणीय भूगोल या घटकांचा समावेश होतो. त्याचबरोबर जगाच्या भूगोलाच्या संदर्भात विविध आखाते, खाडय़ा, सामुद्रधुनी आणि महासागर, आंतरराष्ट्रीय आपत्ती- तिचे साल; झालेली हानी; ठिकाण, व्यापारी केंद्रे त्यांची टोपण नावे, हवामान, भुरुपे, नद्या, वाळवंटे, पर्वतरांगा, पठारे आणि त्यांची वैशिष्टये या उपघटकांचा समावेश होतो.

*    प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण

गेल्या पाच वर्षांतील आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा जर बारकाईने अभ्यास केला  तर खालीलप्रमाणे प्रश्नांचे विभाजन दिसून येईल.

वरील विश्लेषणावरून खालील मुद्दय़ांकडे विशेष लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते.

१. भारताच्या भूगोलावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा भर थोडा कमी कमी होऊन भौगोलिक संकल्पनांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरील भर वाढत आहे.

२. जगाच्या भूगोलावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या जवळपास स्थिर आहे.

३. महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या मात्र तुलनेने अगदीच

कमी आहे.

*    अभ्यासाची रणनीती

१. चालू घडामोडींशी भूगोलाची सांगड- भूगोल या विषयावर गेल्या चार ते पाच वर्षांत विचारलेले प्रश्न पाहिल्यास लक्षात येते की, प्राकृतिक भूगोल, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल या घटकांचा अभ्यास करताना विचारले जाणारे प्रश्न कोणत्या ना कोणत्या बाजूने चालू घडामोडींशी निगडित आहेत. त्यामुळे भूगोलाच्या अभ्यासाची उजळणी करताना गेल्या वर्षभरातील घडलेल्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण परिषदा, संमेलने, घटना ज्या ठिकाणी घडल्या आहेत त्या ठिकाणांची एक यादी बनवून महाराष्ट्र, भारत व जगाच्या नकाशात ती ठिकाणे कुठे आहेत, हे पाहून तेथील राजकीय व प्राकृतिक भौगोलिक वैशिष्टये लक्षात ठेवावीत.

२. भूगोलाच्या अभ्यासाची वैज्ञानिक पद्धत- सध्याच्या प्रश्नपत्रिकांच्या कलानुसार भौगोलिक संकल्पनांवरील प्रश्नांवरील भर वाढत आहे यासाठी आपण भूगोलाच्या अभ्यासातील काही संकल्पनात्मक मुद्दय़ांचा खालीलप्रमाणे क्रम लावून घेतला पाहिजे.

१. सर्वप्रथम भूगोलाच्या संज्ञा व संकल्पना याची यादी करावी.

२. भूरूप निर्मिती, भूकंप, वादळांची निर्मिती अशा भौगोलिक संकल्पना समजून घ्याव्यात.

३. भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचा आस आणि त्याचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाण वेळ अशा पायाभूत संकल्पनांचा अभ्यास करून त्यावर विचारल्या जाऊ शकणाऱ्या प्रश्नांचा मनामध्ये आराखडा तयार करून त्याप्रमाणे त्याची टिपणे काढून ठेवावीत.

एकूणच भूगोल हा घटक ठराविक मुद्दय़ांच्या पाठांतरापुरता मर्यादित नाही तर त्याची नाळ पर्यावरण, विज्ञान, अर्थशास्त्र व चालू घडामोडी या इतर महत्त्वाच्या विषयांशीसुद्धा जुळली आहे. या विषयाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासाच्या घोकंपट्टीची सवय बाजूला ठेवून परीक्षाभिमुख स्मार्ट स्टडीची पद्धत आत्मसात केली पाहिजे. यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे आपण काही ठोकताळे बांधू शकतो. पुढील लेखात आपण आत्तापर्यंत विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे मुद्दे आणि ते सोडविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यास पद्धतींची चर्चा करूयात.