News Flash

मूल्यमापन व्हायलाच हवे..

बारकोडमुळे मुलांची नावे कळणार नाहीत. गुणांची यादी तिथूनच शिक्षण मंडळात जावी.

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याचे शासनाने जाहीर के ल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापन कसे करावे, हा प्रश्न निर्माण झाला आणि अकरावी प्रवेशाचा गुंता वाढू लागला. तो सोडवण्यासाठी उपाय सुचवण्याचे आवाहन ‘चतुरंग’च्या माध्यमातून वाचकांना करण्यात आले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून वेगवेगळ्या मूल्यमापन पद्धती विचारात घेणारे उपाय वाचकांनी मांडले आहेत. अकरावी प्रवेशावर अद्याप तोडगा निघालेला नसताना या उपायांच्या माध्यमातून कदाचित नवी वाट सापडू शकेल. वाचकांच्या निवडक पत्रांचे हे संकलन..

बोर्डामार्फ त शाळास्तरावर परीक्षा घ्यावी

शिक्षण मंडळाकडे सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार आहेत. त्या वापरून, परीक्षा कालावधी कमी करून शाळास्तरावर लेखी परीक्षा घ्यावी. उत्तरपत्रिका त्याच शाळेत तपासण्यात येऊन गुणांची यादी आणि सर्व तपासलेल्या उत्तरपत्रिका शिक्षण मंडळात जमा कराव्यात. आवश्यक वाटेल तेथे ‘रॅण्डम चेकिं ग’ करावे आणि निकाल जाहीर करावेत.

फेरतपासणीचे (रीचेकिं ग) अर्ज आल्यास ते बोर्डाच्या स्तरावर करावे.

दुसरा पर्याय असा, की परीक्षा वरीलप्रकारे घ्याव्यात, पण तपासणी त्याच माध्यमाच्या अन्य स्थानिक शाळेत करावी. बारकोडमुळे मुलांची नावे कळणार नाहीत. गुणांची यादी तिथूनच शिक्षण मंडळात जावी.

– अतुल पंडित

अंतर्गत मूल्यमापन व्हावे

ज्या शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा घेण्यात आली आहे, त्या विद्यार्थ्यांना ती पूर्वपरीक्षा व अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधारावर गुण द्यावेत. ज्या शाळांमध्ये दहावीची पूर्वपरीक्षा घेण्यात आलेली नाही, त्यांच्यासाठी ‘इंटर्नल असाइनमेंट’ हा मार्ग खुला ठेवावा. यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे शाळेत मूल्यमापन झालेले आहे त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, तसेच ज्यांचे मूल्यमापन लेखी स्वरूपात झालेले नाही त्यांच्यासाठी ‘इंटर्नल असाइनमेंट’ हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

– ऋग्वेद जुवेकर

स्पर्धा परीक्षेसारखी प्रवेश परीक्षा घ्यावी

– अकरावीसाठी प्रवेश परीक्षा अनिवार्यच.

– प्रवेश परीक्षेला स्तर असावा, जसे की राज्य बोर्ड आणि केंद्रीय बोर्ड.

– परदेशस्थ आणि भारतीय पालक मानसिकतेचा सर्वागाने विचार व्हावा.

– सर्वाचा अभ्यास ऑनलाइन पूर्ण झालेला आहे,असे गृहीत धरूनच प्रवेश परीक्षा असावी.

– विद्यार्थी वर्षभर शाळेत आणि अनेक खासगी शिकवण्यांचा आधार घेऊन तीन तासांची

परीक्षा देत आहेत. या पद्धतीनेच प्रवेश परीक्षेचा स्तर असावा.

– परीक्षा मंडळाची स्वायतत्ता अबाधित राहील, त्यांच्या नियमावलीत हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी सरकारने आणि पालकांनी घ्यावी.

– परीक्षा पातळी नक्कीच काठिण्याची असावी आणि ती बहुपर्यायी असावी, जशा स्पर्धा परीक्षा होतात. कारण दहावी हा पाया असून त्यानुसारच शाखावार प्रवेश ठरणार आहे.

– ही सर्व तयारी तत्परतेने होणे गरजेचे आहे. आधीच आपल्याकडून अक्षम्य चुका झाल्या आहेत.

– राजेंद्र पाटील

दुहेरी उपाय हवा

दहावीची परीक्षा रद्द होण्यावर असा मार्ग काढता येईल –

– विद्यार्थ्यांनी त्यांच्या ८वी आणि ९वीच्या चाचणी आणि तिमाही, सहामाही व वार्षिक परीक्षांच्या प्रगती पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती काढून योग्य संदर्भासह ही कागदपत्रे शिक्षण मंडळाला ‘ई-मेल’द्वारे पाठवावीत. या आकडेवारीवरून शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांची टक्केवारी ठरवावी.

–  १५ जून वा जूनअखेर २०२१ पर्यंत ५० प्रश्नांची गणित, शास्त्र, इंग्रजी व सामान्य ज्ञान अशी बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा एकाच दिवशी घ्यावी व मूल्यांकन करावे.

– आठवी व नववीच्या प्रगतीपुस्तकांवरून काढलेली टक्केवारी व वर दिलेली बहुपर्यायी परीक्षा यांचे मूल्यांकन त्यावरून अंतिम

सरासरी गुणांकन ठरवावे.

– अकरावी प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांची मूळ प्रगतीपुस्तके तपासून पाहावीत.

– दत्तात्रय गुर्जर

स्पर्धेपेक्षा शिक्षण महत्त्वाचे

– सद्य:परिस्थितीत मूल्यमापनापेक्षा विविध शाखांचे ‘मूलभूत शिक्षण’ उपलब्ध माध्यमांतून सूत्रबद्धपणे देणे समयसूचक ठरेल. म्हणजे अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळकाढू असली तरी शिक्षण थांबणार नाही.

– विद्यार्थ्यांकरिता कल चाचण्यांचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करणे, त्याचबरोबर अभ्यासक्रम निवडीबाबत समुपदेशन उपयुक्त ठरेल.

– अकरावी प्रवेशासंदर्भात वेगवेगळ्या शाखांसाठी आवश्यक विषयाधारित प्रवेश परीक्षा ऑनलाइन बहुपर्यायी पद्धतीने विविध के ंद्रांवर अथवा घरूनही (उपलब्धतेनुसार) घेता येऊ शकते.

– भविष्यातसुद्धा खरंच दहावीच्या बोर्ड परीक्षेची गरज राहील का? तर यापुढेही सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच मापदंड लागू होऊ शकेल. शेवटी महत्त्वाचे काय? शिक्षण की गुणांची स्पर्धा?

 – प्रसन्न हाटकर

शाळास्तरावर मूल्यमापनात भेदभाव शक्य

शालेय स्तरावरच मुलांना गुण देण्यास सांगण्यात आले तर त्यात विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होण्याची अथवा पैसे घेऊन गुण वाढवले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे शासन कसे रोखू शके ल? अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी इंग्लिश, विज्ञान व गणित विषयांवर आधारित १०० गुणांची बहुपर्यायी परीक्षा घेता येऊ शके ल. आणखी एक पर्याय म्हणजे,  दहावीला गुण न देता श्रेणी (ग्रेड) द्यावी, नाहीतर काही खासगी शाळा गुणांचा बाजार मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

– संतोष थोरात

अकरावी प्रवेशाचा गुंता कायमचा सोडवावा

दहावी परीक्षेच्या भविष्यकाळातील उपयुक्ततेचे मूल्यांकन करावयाची वेळ आली आहे. सध्या तरी शालान्त परीक्षेतील गुण हे फक्त अकरावीच्या प्रवेशापुरतेच उपयोगी पडतात असा अनुभव आहे. त्यानंतर या गुणपत्रिकेची किंमत व्यवहारात शून्य असते. अकरावीसाठी प्रवेश परीक्षा हाच या वर्षीचा प्रश्न सोडवण्याचा राजमार्ग दिसतो. पण दर वर्षीचा हा गुंता कायमचा सोडवायची गरज आहे. अकरावीच्या प्रवेशाचे कठीण गणित हे चर्चा, राजकीय इच्छाशक्ती आणि वेळ आली तर न्यायालय या पातळीवर यथावकाश नक्की सुटेल. मात्र बुद्धिनिष्ठ विचार व तर्कशास्त्र यांवर आधारित कठीण निर्णय घेण्याची वेळ आली आहे. उच्च माध्यमिक वर्ग माध्यमिक शाळांशी कालांतराने जोडून घेणे, हाच तो कठीण निर्णय असणार आहे. सुदैवाने आपल्या नवीन शैक्षणिक कायद्यात त्याची सोय केली आहे.

– सुरेंद्र दिघे

नऊऐवजी सहा विषयांची परीक्षा घ्या

आज कित्येक वर्ष चालत आलेली प्रथा बदलून काही वेगळेच मूल्यमापन करणे हे जवळजवळ अशक्य आहे, कारण तुम्ही कोणतीही पद्धत शोधून काढा, त्यामध्ये कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणारच आहे. मुलांच्या परीक्षा थोडय़ा वेगळ्या प्रकारे घेता येतील. आपले पेपर आहेत नऊ. या विषयांना एकत्रित करून सहा दिवसांची परीक्षा ठेवता येईल. जसे,

१) भाषा १ (८० गुण + २० शाळाअंतर्गत मूल्यमापन)

२) भाषा २ (८० गुण + २० शाळाअंतर्गत मूल्यमापन)

३) भाषा ३ (८० गुण + २० शाळाअंतर्गत मूल्यमापन)

४) गणित (येथे बीजगणित व भूमिती दोन्ही एकत्रित करावे) (८० गुण+ २० शाळाअंतर्गत मूल्यमापन)

५) सायन्स (येथे सायन्स १ व २ दोन्ही एकत्रित करावे ) (८० गुण + २० शाळाअंतर्गत मूल्यमापन)

६) समाजशास्त्र  (येथे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र एकत्रित करावे) (८० गुण + २० शाळाअंतर्गत मूल्यमापन)

हे पेपर मध्ये वेळ न देता एका आठवडय़ात- म्हणजेच सोमवार ते शनिवार सलग त्यांच्याच शाळेत घेऊन परीक्षा घेऊनच निकाल जाहीर करणे सोयीस्कर ठरेल. (यात प्रश्नपत्रिका शिक्षण मंडळाकडून येतील.) आता प्रश्न राहातो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा. यासाठी प्रत्येक शाळेत पालकांसह एक निरीक्षक गट तयार करावा. या कालावधीमध्ये पालक गट, शिक्षक गट आणि पालिका अधिकाऱ्यांसह समिती नेमून आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करता येतील.

– रुचा गुळेकर

‘ओपन बुक टेस्ट’ असावी

सामायिक प्रवेश परीक्षेशिवाय पर्याय नाही. ती ऑनलाइनच असावी. ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय व्यवस्थित आहे त्यांना घरून परीक्षा देण्याची परवानगी द्यावी. ज्यांना इंटरनेटबद्दल खात्री नाही त्यांची जवळच्या केंद्रावर सोय करावी. ‘आय.पी.एल. क्रिके ट’सारखी जैव सुरक्षा व्यवस्थेची त्यांना खात्री द्यावी. हा एकाच दिवसाचा प्रश्न असेल. त्यांच्या जाण्यायेण्याचीही व्यवस्था करावी. हा निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे. या परीक्षेस प्रवेश शुल्क नसावे, कारण विद्यार्थ्यांनी दहावी परिक्षेचे शुल्क भरलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कॉपीची शंका नव्हे, खात्रीच असल्याने ही तीन तासांची ‘ओपन बुक टेस्ट’ असावी व काठिण्यपातळी मध्यम असावी. पूर्वतयारीसाठी किमान महिनाभराचा वेळ देणे आवश्यक.

कला, वाणिज्य, विज्ञान शाखा, पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा) व इतर ‘आय.टी.आय.’सारखे व्यवसाय अभ्यासक्रम असे पर्याय प्रवेश परीक्षेचा अर्ज ऑनलाइन भरतानाच अनिवार्य करावेत. हा निर्णय पूर्णपणे अराजकीय असावा. म्हणजे शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञांची मते ग्राह्य़ धरावीत.

– डी. एस. कुलकर्णी

दोन प्रवेश परीक्षा घेणे शक्य

दहावीच्या मूल्यमापनात प्रत्येक विषयासाठी २० गुण अंतर्गत असावेत. शक्य झाल्यास राज्य शिक्षण मंडळाची अथवा शाळेची प्रत्येक विषयासाठी ३० प्रश्न याप्रमाणे सहा विषयांसाठी १८० प्रश्नांची वस्तुनिष्ठ परीक्षा घेता येईल. यात प्रत्येक विषयासाठी सर्वात शेवटी किमान पाच प्रश्न उच्च काठिण्यपातळीचे असावेत. एकूण ५० पैकी गुणांची दुप्पट करून विषयानुरूप गुणपत्रिका तयार करता येईल. अकरावीसाठी कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा हे काही विद्यार्थ्यांचे आधीच ठरलेले असल्याने अकरावी प्रवेशासाठी दोन प्रवेश परीक्षा (वस्तुनिष्ठ) असाव्यात. यात विज्ञान, गणित, प्रथम व द्वितीय भाषा यावरील प्रवेशपरीक्षेद्वारे विज्ञान व वाणिज्य शाखेत, तसेच अपवादात्मक  स्थितीत कलाशाखेत प्रवेश देता येईल. तर समाजशास्त्रे, गणित व भाषा यांवरील प्रवेश परीक्षेद्वारे वाणिज्य व कला शाखेत प्रवेश देता येईल. दोन वेगवेगळ्या दिवशी परीक्षा ठेवल्यास केंद्रांवर गर्दी कमी होईल (‘सीबीएसई’ आणि ‘आयसीएसई’ चे प्रवेशेच्छुक विद्यार्थी गृहीत धरून.). वाटल्यास विद्यार्थी दोन्हीही परीक्षा देऊ शकतील. गुणपत्रिका एकत्रित असावी.

दीपा कदम

दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात अडचण काय?

दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या तणावपूर्ण वर्षांचा दाह कमी करण्यासाठी परीक्षेमध्ये स्मरणशक्ती व पाठांतराच्या चाचणीपेक्षा त्यांच्या मूलभूत कौशल्याच्या मूल्यमापनावर जास्त भर द्यावा लागेल. काही विषयांच्या परीक्षा पद्धतीत लघुत्तरी आणि दीघरेत्तरी संश्लेषण आवश्यक वाटते. पाचवी ते दहावीतील परीक्षांच्या माध्यमातून आलेल्या मूल्यांकनाशिवाय त्यांचा सहभाग असलेले प्रकल्प, स्पर्धा, ऑनलाइन स्पर्धा, विविध ऑलिम्पियाड यांचा आढावा प्रत्येक वर्षी घेणे व त्याचे माहिती संकलन करणे आवश्यक आहे. बारावीच्या परीक्षा रद्द न करता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, मग दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात काय अडचण आहे याचे आकलन होत नाही. दहावीच्या परीक्षा रद्द केल्याने अकरावी प्रवेशासाठी सामायिक अभ्यासक्रम ठरवून प्रवेश परीक्षा घेता येऊ शकते. शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अध्यापनात इंटरनेट, ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा यांचा सारासारविचार होणे आवश्यक आहे, कारण आर्थिक आणि सामाजिक न्याय हे शिक्षण व्यवस्थेतील प्रमुख उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न करता पुढच्या वर्गात प्रवेश देणे हे अन्यायकारक वाटते. राज्य शिक्षण प्रशिक्षण व संशोधन संस्था सक्षम बनवण्यासाठी अभ्यासक्रम, पाठय़पुस्तके, प्रश्नपत्रिका, मूल्यांकन या बाबतीत सातत्याने संशोधन अपेक्षित आहे. अन्यथा परीक्षा, टक्केवारी, घोकंपट्टी या चक्रात आपली शिक्षणव्यवस्था गुरफटून राहील.

– अरविंद बेलवलकर

ठरावीक काळात सवडीने प्रवेश परीक्षा देता यावी

जेव्हा अचानक परीक्षा रद्द कराव्या लागतात अशा वेळी त्या वर्षांतल्या विद्यार्थ्यांनी कोणती गुणवत्ता प्राप्त केली हे तपासण्यासाठीच्या उपायांपैकी एक भाग म्हणजे विद्यार्थ्यांची कलचाचणी घेणे. विद्याशाखेकडे असलेल्या कलाप्रमाणे त्यांना त्या-त्या विभागात प्रवेश करण्यासाठी प्राधान्य देता येईल. दुसरा भाग ‘एनीटाइम एक्झ्ॉमिनेशन’- म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्या सवडीच्या वेळात जाऊन विशिष्ट केंद्रांवर परीक्षा देता येईल. या ऑनलाइन परीक्षेसाठी वर्षांचा सर्वच अभ्यासक्रम असेल. त्यामध्ये प्रत्येक विषयाचे २०-२० बहुपर्यायी प्रश्न विचारले जावेत. ठरावीक वेळात ही परीक्षा घेतली जावी. या परीक्षेसाठी शिक्षण महामंडळाकडे प्रश्नपेढी आहे तिचा वापर केला जावा. त्या प्रश्नपेढीत प्रत्येक विषयाचे विविध काठिण्यपातळीचे किमान ५०० वा अधिक प्रश्न असतील तर उत्तम. प्रश्नपेढी अपुरी असेल तर संबंधित शिक्षकांची मदत घ्यावी. प्रश्नपेढीतील कोणतेही २० प्रश्न एका विद्यार्थ्यांला पडतील. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांला अनन्य प्रश्नपत्रिका मिळेल. शितावरून भाताची परीक्षा होईल. २० प्रश्नांत ठरावीक संख्येने सोपे, साधारण, मध्यम, उच्च पातळीचे प्रश्न असावेत. या प्रश्नांची सरमिसळ करून कोणत्याही विषयांचे प्रश्न कोणत्याही क्रमाने देता येतील. चार पर्याय असतील तर तेही क्रम बदलून देता येतील. परीक्षार्थीला अवघड वाटत असणारे प्रश्न सोडून देण्याची मुभा असावी. बरोबर उत्तराला प्रश्नाच्या काठिण्यपातळीप्रमाणे एक, दोन वा तीन गुण असावेत तर चुकीच्या उत्तराला ऋण एक गुण असावेत. नापास कोणीच नाही. पुन्हा परीक्षा द्यावी वाटली, तर आधीचा निकाल रद्द करावा.

परीक्षांची प्रक्रिया विशिष्ट दिवसाआधी पूर्ण करावी. परीक्षा झाल्या झाल्या निकाल छापून हातात. विषयवार, पातळीवार गुणांची तुलना आणि कलचाचणी यावरून अकरावीची प्रवेशनिश्चिती करता येईल.

– विनय र. र.

विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखणारी स्पर्धा परीक्षा हवी

मुलांच्या सरासरी शालेय गुणांनुसार त्याचे ढोबळमानाने वर्गीकरण करता येईल. परंतु एवढे पुरेसे नसून याचा विचार दोन प्रकारे करता येईल असे वाटते. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन लवचीक पद्धतीने करणारी एखादी स्पर्धा परीक्षा घेता येईल. यातील प्रश्नांचे स्वरूप फक्त दहावीच्या अभ्यासाशी निगडित न ठेवता विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण आणि क्षमता ओळखणारे असावे. जेणेकरून विद्यार्थ्यांचा एखाद्या विषयाकडील कल आणि त्यासाठी असणारी क्षमता, याचे मोजमाप करणे सुलभ जाईल. दुसऱ्या पद्धतीत ऑनलाइन पद्धतीने वरीलप्रमाणे प्रश्नमंजूषा सामूहिक चर्चेला आयत्या वेळी देण्यात यावी. विद्यार्थी ज्या प्रकारे सर्वागीण विचार करून आपले मुद्दे मांडतील, त्यानुसार त्यांचे मूल्यमापन करावे.

सीमा मुकादम

ऑनलाइन तोंडी परीक्षा घ्यावी

दहावीच्या विद्यार्थ्यांची त्यांच्या अभ्यासक्रमानुसार ऑनलाइन तोंडी परीक्षा (ओरल) घेतल्यास फायदा होईल. के ंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीप्रमाणे सहा विषयांचे  शिक्षक व एक विद्यार्थी या स्वरूपात शिक्षकांनीच शाळेतील दहावीच्या विद्यार्थी संख्येनुसार सर्व विषयांची प्रत्येक विद्यार्थ्यांस स्वतंत्र प्रश्नावली तयार करून ऑनलाइन एक तासाची तोंडी परीक्षा घ्यावी. त्या विद्यार्थ्यांचे मागील दोन वर्षांतील सर्व परीक्षेतील गुण एकत्रित करून मूल्यमापन करून श्रेणी देणे शक्य होईल. त्या श्रेणीनुसार विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेणे सुलभ होईल.

कविता पाटणकर

पाचवी ते आठवीचे गुण तपासा

पाचवी ते आठवी या चार वर्षांतील गुणांची सरासरी काढून त्यात ३५ टक्के गुण मिळवावेत. याप्रमाणे दहावीचा निकाल लावू शकतो. यामुळे कोणताही विद्यार्थी नापास होणार नाही. या पद्धतीची संपूर्ण जबाबदारी शाळेने घ्यावी. तसेच निकालाचा तपशील नियोजित शिक्षण मंडळाकडे पाठवावा. अकरावी प्रवेशासाठी प्रत्येक महाविद्यालयात गुणांनुसार प्रवेश प्रक्रियेचा अवलंब करावा. विद्यार्थ्यांनी जिल्हानिहाय महाविद्यालय निवडावे. वरील सर्व प्रक्रिया ऑनलाइन करणेही शक्य आहे.

संदीप सातपुते

घरी सोडवण्यासाठी प्रश्नपत्रिका द्यावी 

विद्यार्थ्यांना घरी सोडवण्यासाठी १०० गुणांऐवजी २०० गुणांची प्रश्नपत्रिका असावी. या अधिक प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील सर्व घटकांची चांगली ओळख होईल. त्यांचे वर्षभरातील चाचणीचे गुण आणि या परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुण किंवा श्रेणी द्यावी. यामुळे विद्यार्थ्यांनाही परीक्षा दिल्याचे समाधान वाटेल व सामाजिक अंतर नियमाचे उल्लंघन होणार नाही. व्हॉटसअ‍ॅपद्वारे प्रश्नपत्रिका देणे शक्य आहे. यामुळे परीक्षा, शाळा, गुरूजन यांच्याविषयी वाटणारी आदरयुक्त भीती कायम राहील.

प्रा. मधुसूदन ऊर्फ राजन चिकोडे

एका दिवसात  परीक्षा

सर्व विषयांचा अभ्यासक्रम २५ टक्के  ठेवावा व एका दिवसात परीक्षा घ्यावी. एका वर्गात १६ मुले असावी. समान दर्जाचे चार  पेपरसेट काढावे. ‘एम१’, ‘एम२’ व ‘एस१’, ‘एस२’ प्रत्येकी २५ गुणांची परीक्षा. तो १०० गुणांचा एक पेपर  व त्याला वेळ तीन तास. समाजशास्त्र ४० गुण आणि तीन भाषा प्रत्येकी २० गुण असा १०० गुणांचा दुसरा पेपर तीन तासांचा करता येईल. या पेपर्समध्ये दोन तासांची सुट्टी असावी.   प्रश्नपत्रिके त ५० टक्के गुणांचे दीघरेत्तरी प्रश्न व ५० टक्के गुणांचे लघुत्तरी/ बहुपर्यायी (ऑब्जेक्टिव्ह) प्रश्न असावे.

या गुणांचे रूपांतर ८० टक्क्यांमध्ये करावे व २० टक्के गुण अंतर्गत मूल्यमापनाला द्यावे. परीक्षा ३० जूनला घेऊन १५  ते २० जुलैच्या सुमारास निकाल लावावा.

प्रा. नरेंद्र सिधये, वासंती सिधये

 लोकसेवा आयोगाप्रमाणे परीक्षेचे आयोजन हवे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाच्या विषयांवर आधारित एकच १०० गुणांची, दोन तासांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करावी. इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांना समान भारांश देऊन एकाच प्रश्नसंचाची निर्मिती करावी. परीक्षेचे आयोजन दोन किंवा अधिक टप्प्यांत करता येऊ शकेल. ज्या प्रकारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांचे आयोजन करते त्या पद्धतीने आयोजन करण्यात यावे. त्याच्या बैठक व्यवस्थेत करोना प्रतिबंधक वातावरणाची दक्षता घेणे आवश्यक आहे. परीक्षार्थी केवळ दोन घडय़ाळी तासिकेत परीक्षा देऊन आपली गुणवत्ता सिद्ध करु शकतो. यामुळे विद्यार्थामधील सध्या असणारी अस्वस्थता कमी होईल. दहावी हा मुलांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याने परीक्षा न देता पास करणे मुलांच्या मानसिकतेच्या दृष्टीने योग्य होणार नाही असे वाटते. परीक्षा झाल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांस न्याय मिळेल.

– नवनाथ धुमाळ, सेवानिवृत्त वरिष्ठ अधिव्याख्याता,  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद.

(पुढील वाचकांकडूनही या विषयावर पर्याय सुचवणारी पत्रे प्राप्त झाली आहेत- डॉ. उमेश प्रधान, मंजूषा जाधव, विशाखा खरोटे चव्हाण, वृषाली चवाथे, निखिल वैद्य, माधुरी भोगले, स्मिता भोसले, श. द. गोमकाळे, संदीप घोरपडे, ध्वनित मिसे, डॉ. आर. जी. तायडे, आमीन चौहान, डॉ. इब्राहिम नदाफ, सुषमा पाटील, संगीता पाखले, पुरुषोत्तम आठलेकर, अमोल पंडित, डॉ. राजेंद्र कांकरिया, जयंत पाणबुडे, जगदीश काबरे, शैलेश पिंपळे, अक्षय खराडे, अनंत पाटील, जगन्नाथ आंधळे, आसावरी सावंत, संपदा ठोसर, ईशा वेलदे, अनघा मोहिले, अनंत कांबळे, रमेश जोशी, सूर्यकांत भोसले, सचिन चव्हाण, अर्चना सागवेकर, हेमंत पराडकर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2021 1:08 am

Web Title: reader view on decision on ssc evaluation policy zws 70
Next Stories
1 ज्येष्ठांचे लिव्ह इन : अधुरी एक कहाणी..
2 व्यर्थ चिंता नको रे : दिसतं तसं नसतं, म्हणूनच..
3 मी, रोहिणी.. : दुहेरी भूमिकांचं आव्हान
Just Now!
X