News Flash

व्वाऽऽ हेल्पलाइन : सत्य कदा बोलावे!

त्यांच्या तळमळीच्या प्रश्नावर वत्सलाबाईंचा सवाल मोठा रंजक होता- ‘‘तुम्हाला कुठलं सत्य हवंय? खरं की खोटं?’’

‘सत्य सदा बोलावे’च्या मार्गावर चालत आलेल्या आणि हे सुभाषित दुसऱ्यांना ऐकवण्याची मोठी हौस असलेल्या मेजरसाहेबांना हल्ली सत्याला कुणीच वाली कसा नाही, हे बघून मोठं आश्चर्य वाटे.

मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

‘सत्य सदा बोलावे’च्या मार्गावर चालत आलेल्या आणि हे सुभाषित दुसऱ्यांना ऐकवण्याची मोठी हौस असलेल्या मेजरसाहेबांना हल्ली सत्याला कुणीच वाली कसा नाही, हे बघून मोठं आश्चर्य वाटे. सगळ्या जगानंच सध्या ‘सत्य कदा बोलावे’ची शिकवण अंगीकारलीय की काय, असं वाटून असह्य़ झालं तेव्हा मेजरसाहेबांनी वत्सलावहिनींच्या ‘व्वा हेल्पलाइन’ला फोन लावला. त्यांच्या तळमळीच्या प्रश्नावर वत्सलाबाईंचा सवाल मोठा रंजक होता- ‘‘तुम्हाला कुठलं सत्य हवंय? खरं की खोटं?’’

दिवसाच्या अखेरीस तीन-चार महागडय़ा गाडय़ांमधून काही धट्टीकट्टी माणसं आणि एक कुत्रा एवढा ऐवज गोंगाट करत सोसायटीत शिरला तेव्हा आवारात बाकावर गप्पा छाटत बसलेल्या ज्येष्ठ सभासदांच्यात नेत्रपल्लवी झाली. नाराजी उमटली. ‘आली टोळधाड!’, ‘आता ते कुत्रं केकाटून डोकं उठवणार..’, ‘पुढचे दोन दिवस आपलं काही खरं नाही!’, वगैरे मूकाभिनय झाला. व्यवस्थित तिरक्या रेषा मारून वाहन पार्क करण्याची दिशा दाखवणाऱ्या जागेवर खुशाल आडव्या, फतकल मारून बसल्यासारख्या गाडय़ा लावून मंडळी लिफ्टजवळ गेली तेव्हा एक जण करवादले, ‘‘यांच्यानंतर येणाऱ्यांनी मुकाटपणे आपापल्या गाडय़ा रस्त्यावर लावाव्यात आता. यांच्या पांढऱ्या म्हशी बसल्यात रस्त्यात फतकल मारून बसल्यागत. सगळा ट्रॅफिक अडवून..’’

‘‘अरे?.. मग त्यांना स्पष्ट सांगत का नाही तसं? की बुवा या तुमच्या असल्या पार्किंगपायी आमच्या म्हशींची, आपलं, गाडय़ांची गैरसोय होत्ये.’’ मेजरसाहेब ‘ट्रथ इज द शॉर्टेस्ट कट’ या आपल्या आवडत्या तत्त्वज्ञानाला जागून सवयीनं म्हणाले; पण वाक्य पूर्ण व्हायच्या आत दोघातिघांनी त्यांना रोखलं.

‘‘मेजरसाहेब.. तुमची ती आर्मीतली हडेलहप्पी इथे नको हं! इथे सगळं सांभाळून बोलायचं. किती झालं तरी ते आहेत आपल्या इथल्या बिल्डरचे पित्ते. अजून सोसायटी बांधून वर्ष होत आलं तरी त्यानं ‘कन्व्हेअन्स डीड’ केलं नाहीये आपलं. उद्या ‘नाहीच करत जा’ म्हणाला तर आपण लटकलो ना? वरचा सबंध मजला ‘पेंट हाऊस’ म्हणून स्वत:कडे पाडून ठेवण्याइतकी मोठी पार्टी ती.’’

हे सगळं मेजरसाहेबांनाही माहीत होतंच. ‘पेंट हाऊस’ म्हणजे ‘रंग उधळण्याची’, ‘हौस भागवण्याची’ हक्काची जागा, हेही दिसत होतंच; पण त्या नादात त्यांनी इतरांच्या रंगाचा किती बेरंग करावा याला काही सीमा?

गाडीत राहिलेलं सामान घ्यायला त्यातले दोन भिडू खाली आले तेव्हा या लोकांकडे पाहून त्यांनी स्मित टाकलं आणि इथला एक जण मोठय़ांदा ‘वेलकम’ ओरडला तेव्हा मेजरसाहेबांना तिथे थांबू नयेसं झालं. रोजच्यापेक्षा ते बरेच लवकर घरी जायला निघाले.

घरी आले तर बायकोची मुद्रा त्रस्त. कुरकुरत म्हणाली, ‘‘त्यांना म्हणावं, या खेपेला फ्लॅट सोडून जाताना नेहमीसारखे नळ उघडे सोडून जाऊ नका. वरती तुमच्याकडे महापूर आणि खाली दुष्काळ अशी वेळ आमच्यावर आणू नका म्हणावं.’’

‘‘मी का म्हणावं? तू जाऊन सांग सरळ. एरवी एवढी गाडाभर बोलतेस. दोन खरी वाक्यं बोलायला काय लागतंय?’’ मेजरसाहेब.

‘‘तुम्ही उगाच वाढवू नका हो. ते पडले धट्टेकट्टे जवान. आपण वयानं बऱ्यापैकी मोडकळीला आलेलो. सत्याचे प्रयोग झेपले पाहिजेत ना आपल्याला?’’ बायकोनं सफाईनं अंग काढून घेतलं. त्या पाहुण्यांचा नोकर फ्रिजमधला बर्फ मागायला आला तेव्हा बायकोनं उत्साहानं तो काढून दिला. ‘‘आणखी काहीही लागलं तर खुशाल घेऊन जा,’’ असंही तोंडभरून सांगितलं. जिच्याबरोबर जन्म काढला तिच्यात एवढे अभिनयगुण ठासून भरल्याचं आपल्याला आजवर कळू नये या कल्पनेनं मेजरसाहेब उदास, गप्पगप्प झाले.

रात्र चढत गेली तसा ‘पेंट हाऊस’चा रंग गडद होत गेला. ‘ढय़ाण् ढय़ाण्’ गाणी, त्यांच्यावर नाचणं, लिफ्टची दारं धडाधड आपटणं, खालून एकमेकांना मोठमोठय़ांदा हाका मारणं, फोनच्या वेगवेगळ्या रिंगटोन्स, असे आवाज वातावरणात घुमत राहिले. पुरुषांची ‘मंगळागौर’ एवढी गाजल्यावर सकाळी त्या सगळ्यांची चांगली ‘आरती’ करणं मेजरसाहेबांना अटळच वाटलं. ते तरातरा त्या मजल्यावर पोचले तो ‘पेंट हाऊस’मधून बाहेर येणारा सोसायटीचा रखवालदार त्यांना दिसला. त्याच्या दोन्ही हातांत भरगच्च पिशव्या होत्या. त्यातून गुलछबू पेयांचे डबे, बिर्याणीची पाकिटं डोकावत होती. सोबत शिळ्या मसाल्याचा, कांदा-लिंबाचा परिमळही होता.

‘‘काय रे, रात्रभर सोसायटीत या लोकांची ये-जा, फाटकाची उघडमीट चालू होती. सोसायटीचे काही नियम, कायदे आहेत की नाही?’’ मेजरसाहेब गरजले.

‘‘आहेत ना साहेब. रातभर डोळा मिटला नाही आपला; पण ‘अ‍ॅवॉर्ड’ची पार्टीपण होती ना..’’ झोपेजल्या डोळ्यांनी मेजरसाहेबांकडे बघत सुस्त आवाजात उत्तर आलं. ‘‘म्हणून काय सगळे नियम धाब्यावर बसवायचे?.. बघीन-बघीन नाही तर एक दिवस..’’

‘‘शू.. हल्लू बोलना साब. कॉपरेरेटर का बेटा है. उसको मूजिक का अ‍ॅवॉर्ड मिलेला है. अब कॉपरेरेटर बोले तो उपर क्या बोलेगा?..’’

प्रत्येक वेळेस ‘कॉपरेरेटर’ हा शब्द उच्चारताना रखवालदार अपार भक्तिभावानं (किंवा अनावर झोपेनं) डोळे एवढय़ा वेळ मिटत होता, की वाटावं, पुन्हा उघडतो की नाही.. एकूण त्याच्या रागरंगावरून तो पिशव्यांमधल्या उरल्यासुरल्या अन्नाला जागणार आहे, आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल एक अक्षरही बोलणार नाही हे स्पष्टच होतं. आता आपणच या सर्वाच्या वतीनं आवाज उठवावा, घरी जाऊन सोसायटीच्या सेक्रेटरीला तातडीचा दीर्घ मेसेज पाठवावा या निग्रहानं मेजरसाहेब घरी आले. थोडा वाईटपणा आला तरी चालेल, खरा प्रकार स्पष्ट सांगायचा, काळाला सोकावू द्यायचं नाही, यावर ते ठाम होते.

पण मेसेज लिहिण्याएवढय़ा अवधीही मिळाला नाही. या दोघांच्या बोलचालीत, उघडय़ा राहिलेल्या दाराचा फायदा घेऊन त्या ‘समर्थाच्या घरचं श्वान’ कधी सटकलं ते कळलंच नाही. सोसायटीच्या आवारामध्ये ते श्वान धावतंय, मागे त्याला आवरणारा धावतोय, त्यामागे त्याला (- म्हणजे माणसाला, श्वानाला नव्हे) हौशी सल्ले देणारी माणसं धावताहेत, कुणी-कुणी हाताला लागेल ते दगड, काठय़ा मारताहेत, अशा धुमश्चक्रीत इमारतीखाली नुकतीच लावलेली शोभेची झाडं ‘कुत्ते की मौत’ मेली! हा ‘कुत्ताचार’ असह्य़ झाल्यानं मेजरसाहेबांनी सेक्रेटरी साहेबांना फोन लावला. ते कामात असतील, व्यत्यय आल्यानं त्रासतील, हे समजूनही थेट बोलणंच पत्करलं. झाला प्रकार कथन करून गळ घातली- ‘‘आता सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून तुम्हीच काही तरी अ‍ॅक्शन घ्या बुवा या बाबतीत..’’

‘‘मी काय अ‍ॅक्शन घेणार? फार तर ‘मॅनेजिंग कमिटी’समोर मांडीन. कमिटी मेंबर्स बहुमतानं ठरवू देत, की बुवा आपल्याच लेव्हलवर ‘डिसिजन’ घ्यायचा, की ‘ए.जी.एम.’समोर ‘अजेंडय़ा’त टाकायचा हा मुद्दा.’’ सेक्रेटरी म्हणाले.

‘‘अच्छा?.. म्हणजे आपण सोसायटीतली सगळी रोपं मरण्याची, पुरतं वाळवंट होण्याची वाट बघायचीये. डोळ्यासमोर उघडउघड जे दिसतंय ते नाही बघायचं, त्यावर नाही बोलायचं.’’ मेजरसाहेब.

‘‘वाकडं बोलणं मलाही येतं बरं का; पण उगाच वाकडय़ात शिरायची घाई कशाला करायची? जमाना बदललाय मेजरसाहेब. कधी कुठल्या दगडासमोर नाक घासावं लागेल सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा समोर येईल त्या दगडाला शेंदराचं बोट लावत बसणं बरं. वाया जात नाही तेवढा शेंदूर.’’

‘‘अ‍ॅट द कॉस्ट ऑफ ट्रथ?.. सत्याची किंमत मोजून..’’ मेजरसाहेब.

‘‘हे काय असतं?’’ सेक्रेटरी हे इतक्या कोऱ्या, निर्मम आवाजात म्हणाले, की मेजरसाहेबांची पुढे बोलण्याची इच्छाच संपली. एकूण हा पठ्ठय़ाही इतरांशी फक्त ‘मम’ म्हणणार आहे, आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल कुणीही काहीही खरं बोलणार नाही. फार तर आपापसात कुजबुजतील; पण आमनेसामने रोखठोक व्हायला जाणार नाहीत, हे त्यांना कळून चुकलं.

आता आपणच आपल्या बाजूनं काही ठोस कृती करायला हवी. काय करावं बरं, अशा विचारात ते असताना त्या ‘पेंट हाऊस’च्या पाठीवर शेवटची काडी पडली. दुपारी दीड-दोनच्या सुमारास तिथून एक तरुण-तरुणीची जोडी खाली उतरली. त्यांची खरी ‘उतरल्या’ची लक्षणं दिसत नव्हती. तरुणीचे केस, कपडे, एकूण देहबोली अंमळ संशयास्पदच वाटत होती. तशी अंधार पडल्यावर, सोसायटीच्या आसपासच्या गल्ल्यांमधून फिरायची वेळ आली तर ‘तरुण-तरुणींची निल्र्लज कुजबुज’ ऐकण्याची मेजरसाहेबांवर वेळ यायचीच. डोळे असून आंधळं असल्यासारखं त्यांच्या समोरून जाण्याचं वळण त्यांनी स्वत:ला लावून घेतलंही होतं; पण हे प्रकरण दिवसाढवळ्या एखाद्याच्या मुलीबाबत घडत असेल तर.. मेजरसाहेबांच्या डोळ्यांच्या, कानामनाच्या सगळ्या ‘अ‍ॅण्टिना’ उगाचच ताठ उभ्या राहिल्या.

आधुनिक फॅशननुसार तरुणीचा ‘बटामंडित’ चेहरा पुष्कळ वेळ केसाआड दडलेला होता. आपल्याला तिचा चेहरा दिसत नाही यापेक्षा तिला त्या केसांच्या जंजाळातून बाहेरचं दृश्य कसं दिसत असेल, असा विचार ते करत असतानाच अचानक काही क्षण तिनं दोन्ही हातांनी सगळे केस डोक्यावरती उंच धरले आणि मेजरसाहेबांना जाणवलं, ही आपल्या मुलाची वर्गमैत्रीण दिसत्येय. छे छे! हे सत्य तर संबंधितांना लवकरात लवकर कळायलाच हवं. त्यांनी बंगळूरुमध्ये मोठय़ा कंपनीत नोकरी करणाऱ्या चिरंजीवांना फोन लावला. सगळा वृत्तांत सांगून शेवटी सुचवलं, ‘‘तुला ती मुलगी, त्यांचं घरदार सगळं माहितीये. म्हणून म्हटलं आपण वेळीच वॉर्न करावं त्यांना..’’

‘‘काही गरज नाही अप्पा. लहान मुलगी आहे का ती?’’ चिरंजीव म्हणाले.

‘‘तरुणी आहे ना.. जन्माचा प्रश्न येऊ शकतो.’’

‘‘अहो अप्पा.. हात जोडून विनवतो. तिच्या वडिलांनीच मला ही पोस्ट मिळायला मदत केलीये. त्यांना दुखवायचं नाही.’’

‘‘न दुखवता कसं सांगायचं हे बघ की!’’

‘‘नो वे.. फॉर गॉडस् सेक..’’

‘‘विचार कर. लहानपणापासून ‘सत्य सदा बोलावे’, ‘बरे सत्य बोला’ वगैरे शिकणारे, शिकवणारे लोक आहोत आपण..’’

‘‘ते नीतिपाठ शिकवण्यापुरतेच असतात अप्पा. आता सुखरूप जगण्याच्या रीती पाठ करण्यात खरं शहाणपण आहे आणि प्लीजच हं.. आता कुठे माझी जरा घडी बसत्येय करिअरची.. त्यात तुमचं सत्य कालवू नका.’’

मेजरसाहेबांना जराश्यानं बायकोनंही हेच सुनावलं तेव्हा ते दिङ्मूढ झाले. अरे चाललंय काय? कुणीच, कुठेच, काहीच खरं बोलायचं नाही का यापुढे? ‘सत्य कदा बोलावे?’ हा प्रश्न झेलत राहायचं का?..

शेवटी त्यांनी थेट ‘वत्सलावहिनींचा आधुनिक अ‍ॅडव्हाइस’ घेण्यासाठी त्यांच्या हेल्पलाइनला फोन के ला आणि वत्सलावहिनींना हेच तळमळीनं विचारलं. त्या करकरीत, कंटाळवाण्या आवाजात म्हणाल्या, ‘‘तुम्हाला कुठलं सत्य हवंय सर? खरं सत्य की खोटं सत्य?’’

‘‘तुम्हाला कुठलं कडधान्य घ्यायचंय- ‘गावरान’ की ‘हायब्रिड’? असं आमचा वाणी विचारतो. त्याच चालीवर बोलताय की तुम्ही.’’

‘‘ठीक आहे. चाल बदलून बोलते. सत्याचा ठेका आपणच घेतलाय, गांधीजींनंतर आपणच, असं तुम्ही मानता का?’’ वत्सलावहिनी.

‘‘नाही हो; पण जे माझ्यासमोर घडतंय.. उघडउघड चुकतंय.. ते तरी..’’

‘‘एवढी सुभाषितं म्हणताय, तर ‘अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ:’- अप्रिय हितकर सत्य कधीच कुणाला नको असतं, हे कानावरून गेलं असेल तुमच्या..’’

‘‘गेलंय. तरीही प्रेमाचा, सत्तेचा, हितसंबंधांचा अधिकार वापरून तरी खरं बोलायला धजायची माणसं पूर्वी. आता म्हणजे चौफेर नुसता गोडवाच. शब्दांना मुंग्या येतील की काय असं वाटतं एकेकदा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे हेच.’’

‘‘दिल्लीचं नावच काढू नका हो खरेपणाबाबत. आपण आपल्यासारख्या मर्त्य माणसांबद्दल ठरवू. यापुढे सत्य फार तर स्वत:च्या मनासज्जनाला सांगायचं आणि बाहेर आभासी सत्याचे गोडवे गायचे. असं केलं तरच निभाव लागेल.’’ वत्सलावहिनी.

‘‘कुणाचा निभाव?’’

‘‘अर्थात आपलाच. ज्या सत्याला भाव नाही त्याचा निभाव लागला, न लागला, तरी काय फरक पडतो?  माझं ऐका, उगाच त्रास करून घेऊ नका. तुमचं जे काय खरंखुरं सत्य आहे

ते स्वत:शी ठेवा. बाहेर आभासी सत्यानं करमणूक करून घ्या. एवढी मोफतची करमणूक दुसरं कोण देणारे आजच्या दिवसांमध्ये? खरं की नाही?’’

वत्सलावहिनींनी भलताच कातडीबचाऊ सल्ला दिला. मेजरसाहेबांना खरं म्हणजे तो पटला नाही; पण लवकरच त्याचा प्रत्यय आला. दुसऱ्या दिवशी ‘पेंटहाऊस’वाल्यांनी फेसबुकवर आपल्या त्या ‘म्युझिक लाँच’ पार्टीचे शेकडो फोटो टाकले. त्यावर हजारो प्रतिक्रिया आल्या. विशेष म्हणजे सोसायटीतल्या अनेकांनी त्यांना अंगठे उंचावून, टाळ्या वाजवून, पुष्पगुच्छ देऊन- अर्थात हे सर्व

‘इमोजी’ वापरून दाद दिली. ‘पुन्हा या!’, ‘तुमच्यामुळे सोसायटीला चार चाँद लागतात’, वगैरे शाब्दिक गोडवाही उधळला. ‘तुमचा कुत्रा क्यूट आहे,’ असं पाच-सात जणांनी म्हटलं. ‘तुमचा कुत्रा रामरक्षा छान म्हणतो,’ एवढंच म्हणणं बाकी राहिलं. त्या ‘क्यूट’नं मेजरसाहेब तेवढे ‘म्यूट’ झाले!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 2:49 am

Web Title: speak truth waa helpline dd70
Next Stories
1 अपयशाला भिडताना : नावात काय आहे?
2 निरामय घरटं : नियोजित पूर्वतयारी
3 एक कोपरा मैत्रीचा!
Just Now!
X