डॉ. शुभदा राठी लोहिया shubhada.lohiya@gmail.com

१५ वर्षांनी पहिल्यांदाच मनोहर काका बाऽ बाऽ सोडून दुसरे काहीतरी बोलले होते. आम्ही हा आनंदाचा प्रसंग साजरा केला. काकांनी मला शिकविले की संवाद साधण्यासाठी फक्त शब्दांची गरज असते असे नाही, तर त्यासाठी आपली मने जुळण्याची आवश्यकता आहे. गरज असते ती संवाद साधण्याच्या इच्छेची, मनोबलाची आणि एका भक्कम व प्रेमळ सोबतीची.

‘मऽनोऽहर ताऽऽत्याऽराव पाऽटील’ ६५ वर्षांच्या काकांनी त्यांचे नाव स्पष्टपणे पण हळूहळू उच्चारत मला सांगितले अन् मी आणि ते दोघेही खळखळून हसलो. आश्चर्य वाटले ना ऐकून? पण जवळजवळ गेल्या १५ वर्षांत बा बा ऽबा किंवा बाऽऽ बाबाबा यापेक्षा वेगळे कोणतेही शब्द त्यांना बोलता आले नव्हते आणि आज त्यांनी स्वत:चं नाव संपूर्णपणे म्हणून दाखवले होते. म्हणूनच आजच्या या संभाषणाचा आनंद आम्ही टाळी वाजवत हसत मनसोक्त साजरा केला.

पाटील काका एका उच्च पदावर नोकरी करत होते. अतिशय कर्तव्यदक्ष व हुशार अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. १५ वर्षांपूर्वी एक दिवस अचानक त्यांना उलटी झाली, उजवा हात आणि उजवा पाय बधिर झाला होता. हात व पाय हलवता येत नव्हता. त्यांना अर्धागवायूचा झटका आला होता. दोन दिवसांनी जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा हळूहळू त्यांना हात पाय हलवता येऊ लागले, ते एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळू लागले. आणखी दोन दिवस गेले आणि मला त्यांना सांगावे लागले की, त्यांची वाचा कायमची गेली आहे. ते अतिशय खिन्न झाले. बोललेले सगळे त्यांना कळत होते, पण उत्तर देण्यासाठी  शब्द तोंडून यायचे नाहीत. चार-आठ दिवसांत बाऽ ऽबा असे उच्चार करता येऊ लागले. पण इतरांशी संवाद साधायला हे पुरेसे नव्हते. पहिले काही दिवस ते बोलेनासेच झाले. अचानक या स्थितीत लोकांसमोर जायचे, त्यांच्याशी बोलायचे हे त्यांना झेपत नव्हते. लोक काय म्हणतील, कीव करतील असे वाटू लागले. ते त्यांना नको होते.

पण पाटील काका मूळचे अतिशय संयमी आणि जिद्दी. त्यांनी हळूहळू ही परिस्थिती स्वीकारली. रोज आपले हात आणि पाय यांचा व्यायाम ते करू लागले. एका महिन्यात काका स्वत:चे स्वत: चालू लागले. आता तर ते या आजाराचा आनंद घेऊ लागले. रोज फिरायला जाणे, प्राणायाम करणे, वेळेवर औषधे घेणे हे अगदी छान चालले होते. काकांसोबत काकूंचीही परीक्षा चालू होती. पण दोघांच्याच या टीमने हार मानली नाही. काका पूर्वीसारखे नॉर्मल झाले. फक्त बोलण्यात फारसा फरक पडत नव्हता. नियमित तपासणीसाठी दोघेही दवाखान्यात येऊ लागले. व्यायामाने बरीच सुधारणा होत होती. काका आणि काकू दोघांचाही चेहरा इतका प्रसन्न की त्यांच्याकडे बघून काका फक्त बा-बा या एकाच अक्षराने सगळा संवाद साधतात हे नवीन व्यक्तीला कळणेही शक्य नव्हते.

काका दवाखान्यात आल्यावर त्यांचा हात दुखत असेल तर हात पुढे करून सांगायचे, ‘‘बाऽबा बाबा ऽऽ’’ मग मी ते ओळखून त्यांना औषधे द्यायची व कशी घ्यायची ते सांगायची. काका पुन्हा मान डोलवत म्हणायचे, ‘‘बाऽबा’’ म्हणजे ‘हो’. या सगळ्या प्रसंगी काकूंची साथ अत्यंत महत्त्वाची होती. त्यांच्या सोबत असण्याने त्यांना लाज वाटत नसे. अशा रीतीने आमच्या अतिशय छान गप्पा होत असत. बा-बा या दोन शब्दात त्यांचे जग सामावलेले होते. मुलाकडे करमत नाही, औषधाची चव खराब आहे, ते खूश आहेत हे सगळे संवाद बा-बाने आम्ही करत होतो. काकांच्या भेटीने मलाही मस्त वाटायचे. त्यांच्या या भाषेचा गप्पा मारण्यासाठी आम्हाला कधी अडथळा झाला नाही. त्यांना काय सांगायचे आहे ते अगदी योग्य पद्धतीने ते माझ्यापर्यंत पोहोचवायचे.

परवा १५ वर्षांनी पहिल्यांदाच ते बाऽ बाऽ सोडून दुसरे काहीतरी बोलले होते. आम्ही हा आनंदाचा प्रसंग साजरा केला. काकांनी मला शिकविले की संवाद साधण्यासाठी फक्त शब्दांची गरज असते असे नाही तर त्यासाठी आपली मने जुळण्याची आवश्यकता आहे. मने जुळली तर मनाचे भाव शब्दांशिवायही कळतात. गरज असते ती संवाद साधण्याच्या इच्छेची, मनोबलाची आणि एका भक्कम व प्रेमळ सोबतीची. काकांचे उदाहरण प्रेरणा देणारेच आहे. माझ्या कित्येक रुग्णांना मी काकांचे उदाहरण देऊन आजारावर मात करण्यासाठी प्रेरित केले आहे. काकांनी रुग्णांनाच नाही तर मलाही खूप मोठी शिकवण दिली. काकांमुळेच व्यक्त होणे म्हणजे काय हे मला कळले.

माझे आणखी एक नातेवाईक होते. १६ वर्षांपूर्वी त्यांनाही अर्धागवायूचा झटका आला. सगळे घरदार हादरले. प्रयत्न करूनही त्यांना चालता फिरता आले नाही. पण जागच्या जागेवर हालचाल करणे शक्य होऊ लागले. मी फोनवरूनच त्यांच्या उपचारांबद्दल चर्चा करीत असे. एकदा मी परभणीला गेले तेव्हा त्यांना भेटायला गेले. आत्तापर्यंतचा सगळा संवाद हा नातेवाइकांच्या माध्यमानेच चालू होता. त्यांना प्रत्यक्ष पाहिले अन् लक्षात आले की खूप उशीर झाला आहे. यापूर्वीच फिजिओथेरेपी द्यायला हवी होती.

मी त्यांना काही प्रश्न विचारले. हातवारे करून त्यांनी उत्तरे देखील दिली. खरे तर त्यांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. परंतु ते पलंग ते खुर्ची एवढेच अंतर पार करू शकत होते. मेंदूतील बोलण्यासाठीचे जे केंद्र असते ते जवळपास संपूर्ण निकामी झाले होते. आपल्या अवतीभवतीच्या लोकांशी संवाद न करता जगणे यासारखी मोठी दुसरी काहीच शिक्षा असू शकत नाही. विशेष म्हणजे जेव्हा बाकी सगळा मेंदू चांगल्या स्थितीत असतो तेव्हा. त्यांना सण वार, पाहुणे, जेवण सर्व काही समजत होते, फक्त बोलता येत नव्हते. खूप काही बोलावेसे वाटत होते. त्यांची स्थिती फारच वाईट झाली होती.

पण मनोहर काकांचं वेगळंच. सगळे धडधाकट असतानादेखील बायको घरी नसेल तर आपण पाहुण्यांचा पाहुणचार टाळायचा प्रयत्न करतो. चहा देखील विचारताना अडखळतो. पण मनोहर काकांचे त्याही परिस्थितीत आदरातिथ्य अगत्याने चालूच होते. बोलता येत नसलं तरी त्यांना थांबायचं नव्हतंच. त्यांनी घरच्यांना बाराखडीचे पुस्तक आणायला लावले. त्यावर ‘पो’ वर पहिले बोट ठेवले. ‘हे’ वर दुसरे बोट ठेवले व आम्हाला पोहे खाण्याचा आग्रह केला. मन भरून आले. डोळेही पाणावले, पण त्यांना आमच्या डोळ्यातील पाणी दिसू न देता त्यांच्या आग्रहाचा मान राखला.

या दोघांनीही संवाद साधण्याची कला मला शिकविली. परिस्थिती कशीही असली, तरी शब्दांशिवायही लोकांशी संवाद साधता येतो व जीवनातले नराश्य घालवून आनंद मिळविता येतो हे मला मनोहर काकांनी शिकविले. मूकबधिर रुग्ण असोत, नराश्याचे रुग्ण असोत, तोंडातील आजारामुळे नीट बोलता न येणारे रुग्ण असोत, जीभ किंवा तोंडाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे नीट बोलता न येणारे रुग्ण असोत, या सगळ्यांशी संवाद साधण्याच्या भाषेचे जणू प्रशिक्षणच त्यांनी मला दिले.

chaturang@expressindia.com