scorecardresearch

शिक्षण सर्वासाठी : ही मुलं शिकत का नाहीत?

आपल्या आजूबाजूला अनेक मुले शिक्षणाशिवाय हिंडताना दिसतात. त्यांना शिकवावे असे अनेकांना वाटते.

(संग्रहित छायाचित्र)

रजनी परांजपे

आपल्या आजूबाजूला अनेक मुले शिक्षणाशिवाय हिंडताना दिसतात. त्यांना शिकवावे असे अनेकांना वाटते. अनेक गृहिणी आपल्या मदतनीसांच्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात, पण बहुतेकांना त्यातून हवे ते समाधान मिळत नाही.  ‘‘आम्ही पुष्कळ प्रयत्न केला, पण काही झाले नाही. त्या मुलांना रसच नसतो. काही म्हणा अडाणी ते अडाणीच..’’ असं सांगणारेही कमी नाहीत. पण वस्तुस्थिती काय असते? या मुलांच्या वागण्यावरून जो निष्कर्ष काढला जातो तो योग्य असतो का?

‘तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठीच काम करावं असं का वाटलं?’ हा प्रश्न आता मला नवीन राहिलेला नाही. मला भेटणारे, आमच्या कामाविषयी जाणून घेण्याची इच्छा असणारे, हा प्रश्न हमखास विचारतातच. अगदी खरं सांगायचं तर मलाही या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. मला आठवतं त्याप्रमाणे मी अशा कामाला सुरुवात केली त्याला आता बरीच वर्ष झाली. मी ज्या इमारतीमध्ये रहात होते ती कर्मचारी निवासाची सोय असलेली दहा मजली शासकीय इमारत होती. एका मजल्यावर दोन फ्लॅटस्. दहा मजल्यांवर मिळून एकूण २० फ्लॅटस्. त्याच कंपाऊडमध्ये आणखी एक तशीच इमारत मिळून ४० फ्लॅट्स आणि कमीत कमी ४० कुटुंबे.

याच इमारतीच्या गच्चीवर, पाण्याच्या टाकीखाली बऱ्यापैकी मोठी, खोलीच जणू काही, अशी जागा. ३०-४० मुले सहज बसतील एवढी जागा. मी त्या वेळेस समाजकार्याचे शिक्षण देणाऱ्या एका महाविद्यालयात शिकवत होते. महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना फिल्डवर्क म्हणून मी या जागेत इमारतीमधल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी एक बालवाडी सुरू करून देण्याचे काम दिले. विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केले, तीन ते सहा वर्षांची किती मुले आहेत याचा आकडा काढला. तिथे त्या मुलांसाठी दोन-तीन तासाची शाळा सुरू केली तर कसे? असे त्यांच्या पालकांना विचारले. त्यासाठी काही शुल्क वगैरे नाही, असेही सांगितले.

आता उरले काम शिक्षक शोधण्याचे. पण आधी आम्हीच मुलांना गोळा करून बघतो असे म्हणून त्यांनी स्वत:च मुलांचा वर्ग घ्यायला सुरुवात केली. वर्ग आठवडय़ात तीन दिवसच असायचा, कारण विद्यार्थ्यांचे फिल्डवर्कचे दिवस तीनच. दरम्यान, शिक्षिका शोधण्याचे आणि शिक्षिकेचे मानधन, मुलांसाठी खेळणी वगैरे शोधण्याचे, जमवण्याचे काम चालूच होते. शिवाय पालकांचा आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मालकांचा प्रतिसाद काय हेसुद्धा बघायचे होते. प्रतिसाद तसा बरा होता. कोणी-कोणी घरातली खेळणी, रंगाचे खडू, पाटय़ा-पेन्सिली वगैरे देऊही केले, पण एक अडचण आली. वर्गाची खोली दहाव्या मजल्याच्या डोक्यावर, म्हणजे लिफ्ट वापरावी लागत होती.

वर्ग भरण्याची वेळ आणि लोकांची कार्यालयाला जाण्याची वेळ एकच येत होती. त्यामुळे कार्यालयाच्या वेळात लिफ्टचा खोळंबा होत होता, ही एक अडचण पुढे आली. मात्र ती सोडवणे तसे कठीण नव्हते. आम्ही वर्गाची वेळ बदलली आणि काम चालू ठेवले. कंपाऊंडमधेही भिंतीलगत गॅरेजेस होती. सर्वच गॅरेजेस भरलेली नव्हती. तेव्हा त्यातील एखादी जागा मिळाली तर पाहावे म्हणून प्रयत्नही केले, पण परवानगी मिळाली नाही. गच्चीवरची बालवाडी मात्र परवानगी न घेताच चालू राहिली. अजूनही चालू आहे. त्यात कोणी अडथळा आणला नाही, उलट मदतच केली. ज्यांनी बालवाडी सुरू केली ते विद्यार्थी सोडून गेले. आम्हीसुद्धा ते घर कधीच सोडले, पण बालवाडी चालू राहिली. ते काम अधिकाऱ्यांच्याच पत्नींपैकी कोणी ना कोणीतरी अंगावर घेत गेले. जागतिक बालवर्षांनिमित्त ‘आयएएस /आयसीएस वाइव्ज असोसिएशन’ने त्या प्रकल्पाची जबाबदारी घेत तो चालू ठेवला. किती मुले त्यातून बाहेर पडली याची गणती नाही. तरी आजूबाजूच्या तशाच इतर शासकीय निवासस्थानी असा प्रकल्प सुरू झाला नाही हेसुद्धा तितकेच खरे.

हे सर्व इतके सविस्तर लिहण्याचे कारण इतकेच, की त्यातून आपण काहींतरी शिकू शकतो. मी ही बालवाडी काढली तेव्हा आम्ही आमची संस्था स्थापन झालेली नव्हती. तशी ती करावी असा विचारही त्यावेळी नव्हता. संस्था १९८८-८९ ला सुरू केली तर बालवाडी १९७८-७९ मध्ये. मध्ये दहा वर्षे गेली. दहा वर्षांत वेगवेगळे अनुभव आले. ज्यातून हळू-हळू आपल्याला काय करायचे आहे ते स्पष्ट होत गेले आणि तरीही हेच काम आपण पुढची ३० वर्षे करत राहू असा विचार एकदाही मनात आला नाही. ‘शिक्षणच का?’ या प्रश्नाचे उत्तर आता माझ्या मनात स्पष्ट झाले आहे. पण या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले तेव्हा तसे नव्हते. इमारतीमध्ये बालवाडी सुरू केली तेव्हाही माझ्या मनात ‘समाजकार्याच्या विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव द्यावा.’ हा विचार प्रामुख्याने होता असे वाटते.

आज या सगळ्या अनुभवाकडे मागे वळून पाहताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते, ती म्हणजे, एखादी गोष्ट करताना आपल्याला काय करायचे आहे याचा विचार करताना ते करता येईल किंवा नाही, अडचणी काय येतील, मध्येच बंद पडले तर काय, कोण काय म्हणेल याचा विचार करून पाय मागे घेऊ नये. पुढचा रस्ता स्पष्ट दिसत नसेल तरी दोन पावलं पुढं गेल्यावर तो दिसणारच नाही असे गृहीत धरण्याचे कारण नाही. किंबहुना, आपण जसजसे पुढे पाऊल टाकतो तसतसा पुढचा रस्ता दिसत जातो असाच अनुभव आहे. माझा आणि इतर अनेकांचाही.

आपल्या आजूबाजूला इतकी मुले शिक्षणाशिवाय हिंडतात. त्यांना शिकवावे असे अनेकांना वाटते. अनेक गृहिणी आपल्या घरात काम करणाऱ्या मदतनीसांच्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण बहुतेकांना त्यातून हवे ते समाधान मिळतेच असे नाही. मला भेटणाऱ्या कितीतरी जणी त्यांची ही व्यथा मला अगदी तळमळून सांगतात. ‘‘आम्ही पुष्कळ प्रयत्न केला, पण काही झाले नाही. त्या मुलांना रसच नसतो. वेळेवर येतीलच असे नसते. शिवाय नियमितही नसतात. काही म्हणा अडाणी ते अडाणीच..’’ असं सांगणारेही कमी नाहीत. ते म्हणतात तशी वस्तुस्थिती अगदीच नसते असेही नाही. मात्र त्यावरून आपण जो निष्कर्ष काढतो तो पुन्हा तपासून बघणे गरजेचे असते.

कितीतरी स्वयंसेवकदेखील या कामात उत्साहाने शिरताना दिसतात. ‘‘मला मुलांना शिकवायचे आहे. तुमच्या संस्थेत तशी संधी मिळेल का?’’ अशी विचारणा करणारे दूरध्वनी किंवा ईमेल रोज येतच असतात. शिवाय हे झाले एकेकटय़ाने काम करणाऱ्यांबाबत. पुष्कळ तरुण, महाविद्यालयीन मुले, मुली आपला गट करून रस्त्यावरच्या मुलांना शिकव, कुठल्या तरी अनाथाश्रमात जाऊन तिथल्या मुलांचा अभ्यास घे, असे अनेक प्रयोग करतच असतात.

अशाच काही गटांबरोबर आमचा परिचय आहे. त्यामुळे त्यांची कामाची पद्धत, त्यांची इच्छा आणि इच्छापूर्तीचे मार्ग यात कुठे आणि कसे अंतर पडत जाते आणि त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही हवे तसे समाधान मिळत नाही ते लक्षात येते. उदाहरण म्हणून आपण प्रतीक आणि त्याच्या गटाचा उपक्रम कसा चालतो ते बघू. प्रतीक महाविद्यालयीन विद्यार्थी होता तेव्हापासून रस्त्यावरच्या मुलांना एकत्र करून त्यांना शिकवतो आहे. आता तो एका कंपनीत नोकरी करतो, पण काम चालूच आहे. त्याचे पाच-सहा मित्रही या कामात त्याला मदत करतात. एका बसस्टॉपजवळ लगतच्याच मोकळ्या जागेत आपल्या झोपडय़ा उभारून पाच-सहा कुटुंबे राहतात. त्यांची शाळेच्या वयाची १४-१५ मुले आहेत. वयोगट ६ ते १२-१३. मुले शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीत जाणारी. तशी ती शाळेत नियमित जातात असे नाही. आणि शाळेतही ‘ती न आली तर बरे’ अशीच त्यांच्याविषयीची भावना असते. प्रतीक आणि त्याचे मित्र दर शनिवार-रविवारी मुलांना शिकवण्यासाठी जातात. गेली १-२ वर्ष तरी हा कार्यक्रम चालू आहे. मुलांसाठी कपडे आण, खाऊ दे, शैक्षणिक साहित्य खरेदी कर, जरूर पडेल तर पालकांनाही थोडी फार मदत कर, अशा गोष्टी ते अतिशय मनापासून करतात.

प्रतीक परवाच आम्हाला भेटला. थोडा वैतागलेलाच होता. ‘‘काय, कसं चाललंय?’’ असं विचारल्यावर थोडा उद्विग्न होत बोलू लागला, ‘‘खरं सांगू? हे सर्व सोडून द्यावं असं वाटतं कधी कधी. गेली १-२ वषर्ं आम्ही काय-काय केलं या मुलांसाठी.. पण ही मुलं फारसं शिकली तर नाहीतच, पण परवा चुकून एका मुलाला चापट मारली तर पालक भांडायला की हो आले..’’

आता असं का होतं? मुलं शिकतच का नाहीत? वाचायला-लिहायला शिकवायचे असेल तरी त्याची काय पथ्ये असतात? प्रश्नच प्रश्न! विचार करण्यासारखे. ‘अडाणी ते अडाणीच.’ असं म्हणून सोडून देण्यासारखे हे प्रश्न नक्कीच नाहीत. उलट त्यातून उत्तरांच्या दिशेने कृती करणे गरजेचे आहे.

rajani@doorstepschool.org

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why dont kids learn shikshan sarvansathi rajni paranjape abn

ताज्या बातम्या