श्रुती तांबे

Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

समाजशास्त्र. इतिहास. राज्यशास्त्र. अर्थशास्त्र.

आपल्यातला जो मागं पडलाय, त्याच्यासाठी थांबणं, त्याला वेळ देणं, काळजी करू लागणं हाच प्राण्यातून मानवी प्रजातीत उन्नयन होण्याचा क्षण होता. सामाजिक अभ्यासाचं हे नीतिशास्त्रीय परिमाण अभ्यासकांनी ओळखलंही. पण प्रश्न असा पडतो की आज आपलं ‘समुदाय-जीवन’ कुठं आहे?

विसाव्या शतकातल्या मानवशास्त्रज्ञ आणि थोर विदुषी मार्गारेट मीड यांना एकदा एका विद्यार्थ्यांनं विचारलं की,  मानवी इतिहासातली,  ज्याला महासंस्कृती किंवा सभ्यता म्हणता येईल त्याची सुरुवात दाखवणारी पहिली खूण कोणती मानता येईल? विद्यार्थ्यांची अपेक्षा होती की, त्या कुठली तरी मातीची भांडी किंवा जात्याविषयी बोलतील. पण मीड म्हणाल्या, मानवी सभ्यतेचं पहिलं चिन्ह म्हणजे माणसाचं तुटलेलं आणि जुळलेलं मांडीचं हाड (फीमर) होतं! त्या म्हणाल्या, प्राणीजगतात समजा तुमचा पाय मोडला की तुम्ही मरता. धोक्यापासून पळून तुम्हाला तुमचा बचाव करता येत नाही. अन्न शोधायला किंवा पाणी प्यायला नदीपर्यंत जाता येत नाही. टपून बसलेल्या प्राण्यांसाठी तुम्ही आयतं भक्ष्य होता. कोणताही प्राणी मोडक्या पायानिशी तो पाय सुधारेपर्यंत जगू शकत नाही.

माणसाचं मांडीचं मोडलेलं हाड सांधलं गेलं, सुधारलं हा याचा पुरावा आहे की, त्याची जखम भरून येईतो तेवढा काळ त्याच्यासोबत कुणी तरी त्याची काळजी घेणारं होतं. श्वापदांपासून, नैसर्गिक संकटांपासून वाचवणारं, त्याला सुरक्षित ठिकाणी नेऊन शुश्रूषा करणारं, त्याला खाऊ-पिऊ घालून बरं व्हायला वेळ देणारं कुणी तरी होतं.

आपल्यातला जो मागं पडलाय, त्याच्यासाठी थांबणं, त्याला वेळ देणं, काळजी करू लागणं हाच प्राण्यातून मानवी प्रजातीत उन्नयन होण्याचा क्षण होता. स्वत:चा जीव धोक्यात घालून, स्वार्थ बाजूला सारून कोणासाठी तरी तुम्ही थांबता. काळजी घेऊन त्या व्यक्तीला बरं करता. हा मानवी संस्कृतीचा आरंभबिंदू मानता येईल.

आर्थिक उन्नती हेच अंतिम उद्दिष्ट ठेवलं तर ते समाज केवळ आर्थिक तर्कशास्त्रामागे फरफटत जातात. अशा समाजातल्या तळातल्या लोकांच्या वाटय़ाला प्रचंड दारिद्रय़, उपासमार, हलाखी, भणंगपणा आणि दादही लागणार नाही असे मृत्यू, कुपोषण असं येतं. वरच्या थरातले बिनदिक्कतपणे सगळंच विकायला काढतात आणि थंडपणे स्वत:पुरतं विकत घेतात. अतिरेक इतका होतो की, पायाखालची जमीनही विकल्यावर उभं राहायलाही जागा उरत नाही. नद्यांची पात्रं बदलली जातात, बुजवलेल्या पात्रांत इमारती उठतात. समुद्राकाठची वाळू विक्रेय झाल्यावर किनारेही उरत नाहीत. मग जेव्हा त्सुनामी किंवा महापुरासारख्या आपत्ती येतात तेव्हा केवळ आर्थिक तर्कशास्त्र श्रीमंत आणि गरीब कोणालाच वाचवू शकत नाही. निसर्गाचं एक गतिशास्त्र आहे, मानवी चेतनेचं एक गतिशास्त्र आहे. त्यात अस्तित्व टिकवण्यासोबत, उत्कर्ष साधण्यासोबत भावनिक, सांस्कृतिक उन्नयन अपेक्षित आहे. म्हणजेच मानवाचं संचित असलेलं एक नीतिशास्त्रीय आणि मूल्यात्मक गतिशास्त्रही आहे.

धर्म-प्रबोधन ते औद्योगिक क्रांती

समाज आणि अर्थव्यवस्थेच्या नात्याविषयी अनेक शास्त्रज्ञांनी अनेक प्रकारे विवेचन केलेलं आहे. मॅक्स वेबर यांच्या ‘प्रोटेस्टंट एथिक अ‍ॅण्ड द स्पिरिट ऑफ कॅपिटॅलिझम’ या ग्रंथातला भांडवलशाहीच्या उदयामागे विचारांचा, कल्पनांचा प्रभाव हे महत्त्वाचं कारण कसं होतं हे सांगणारा सिद्धान्त अतिशय गाजलेला आहे. ‘‘रोमन कॅथॉलिक धर्माविरुद्ध प्रोटेस्टंट पंथाच्या बंडखोरीच्या विचारांत धर्मसुधारणा तर होतीच, परंतु दैनंदिन वर्तनात सुचवलेल्या बदलानं हळूहळू तो पंथ मानणाऱ्या अनुयायांचं भौतिक आयुष्यही सुधारलं. मार्टिन ल्यूथर हा जर्मनीतला सोळाव्या शतकातला महत्त्वाचा धर्मसुधारक आणि त्याच परंपरेतला संत केल्विन यांच्या शिकवणुकीमुळे लोक बदलत गेले. त्यांच्या समजुतीनुसार अप्राप्य असणारा मानवी जन्म मिळाल्यामुळे त्याचं पुरेसं सार्थक करणं महत्त्वाचं. बायबलमध्ये सांगितलेल्या देवाच्या आज्ञा ‘आपण स्वत: वाचून’ समजून घेतल्या तरच अंगीकारता येतील, असं मानल्यामुळे साक्षरता वाढली, पुजाऱ्यांचं महत्त्व कमी झालं. कर्मठ कॅथॉलिक धर्मातल्या धारणांपेक्षा या वेगळ्या धारणा होत्या. देव केवळ धर्मस्थळांमध्ये नाही, काम सोडून, धार्मिक सुट्टय़ा घेऊन चर्चमध्ये जाऊन उपासना करणं म्हणजे धार्मिक व्यक्ती असणं नव्हे.. केल्विन म्हणत असे, अगदी दैनंदिन व्यवहारांतल्या कामातही देव असतो. कष्टानं, सचोटीनं, मनापासून व्यवहार करणं म्हणजेच देवाची प्रार्थना आहे. त्यामुळे भांडणं, व्यसनं इ. गोष्टी त्याज्य ठरल्या. उधळपट्टी टाळणं, इतरांना मदत करणं, सहजपणे दुसऱ्यांच्या उपयोगी पडणं हा केल्विन पंथाचा महत्त्वाचा भाग होता. सदाचरण, साधेपण, सचोटी, कार्यक्षमता आणि उत्तम व्यवसायकौशल्य अशी सामूहिक वैशिष्टय़ं बनली. सामूहिक वर्तनात बदल घडल्यानं त्या समूहांमध्ये मूलगामी सामाजिक, सांस्कृतिक आणि भौतिक बदल घडतात.’’ असा त्याचा सारांश.

‘‘त्याच काळात युरोपभर औद्योगिकीकरण आणि भांडवलदारी यायला सुरुवात झाली होती. बचत मोठय़ा उद्योग-व्यवसायात गंतवून उत्पादन वाढवणं अशी अर्थव्यवस्थेची धाटणी बनली. केल्विन पंथियांचे विचार या स्थित्यंतराला प्रेरक ठरले,’’ असं वेबरचं मत आहे. भांडवलदारी आणि यंत्राधारित औद्योगिक व्यवस्थेत पंथ, वंश, धर्म यापेक्षा कार्यक्षमता, विज्ञानावर आधारलेली आर्थिक तार्किकता अधिक महत्त्वाची होती. मालकांमध्ये साधेपणा, नेमकेपणा आणि कामगारांमध्ये सचोटी, वेळ पाळणं, कामावर निष्ठा ठेवणं, कामाची गुणवत्ता चांगली राखण्याची तळमळ असणं आवश्यक होतं. केल्विन पंथियांच्या शिकवणुकीमुळे भांडवलदारीला उपयुक्त आणि औद्योगिक क्रांतीचा वेग आणि विस्तार वाढवणारे कामगार तयार झाले. थोडक्यात भांडवलदारी व्यवस्थेच्या गरजा आणि वैशिष्टय़े आणि केल्विन पंथियांची शिकवण या गोष्टी मिळत्याजुळत्या होत्या. त्यामुळे भांडवलदारीचा विस्तार जर्मनीत वेगानं झाला.

,,, आणि नोकरशाही!

हाच वेबर आर्थिक तार्किकता टोकाला गेल्यावरचे दुष्परिणामही सांगतो. त्यातला एक म्हणजे, नोकरशाही (ब्यूरोक्रसी) व्यवस्थेचा विस्तार. यंत्राधारित कारखान्यांमध्ये कामगार ते व्यवस्थापक-मालक अशी अधिकारांची, कर्तव्यांची आणि मेहनतान्याची उतरंड निर्माण झाली. उत्पादक कामांचा वेग वाढवते म्हणून नोकरशाही शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र अशा सर्व क्षेत्रांत आली. राज्यव्यवस्थेत-करवसुली आणि संरक्षणात- ती आधीपासून होती. आता नियमांवर आधारित काटेकोर चौकट, अधिकारांची स्पष्ट उतरंड आली.

यावरचा एक अ‍ॅनिमेशनपट आठवतो. त्यात ‘अमक्याची सही आणलीस तर प्रवासाची परवानगी देऊ, कारण तू आमचा नागरिक नाहीस,’ असं नायकाला सांगतात. सहीसाठी कुठं जाऊ असं विचारल्यावर सरकारी कचेरी हे उत्तर मिळतं. मग अनेक मजले, अनेक दारं, खिडक्या आणि अनेक टेबलांआड बसलेली माणसं आणि सह्यंसाठी गोंधळून फिरणारे शेकडो लोकांचे घोळके अशी दृश्यं दिसतात. टेबलांवरची निम्मी माणसं जागेवर नसतात. उद्या या- परवा या, सकाळी या, दुपारी या, इथला शिक्का, तिथली सही असं करता-करता कळून चुकतं की हवा तो सही-शिक्का जगाच्या अंतापर्यंत मिळू शकणार नाही. याच परिस्थितीला उद्देशून वेबरनं ‘गॉड्स हॅव फ्लेड द वर्ल्ड’ हे सुप्रसिद्ध वाक्य लिहिलं. नियमांवर बोट ठेवणाऱ्या या कोरडय़ा व्यवस्थेत मानवी करुणा, सहानुभूती, परस्परांच्या अडचणी जाणून मदत करण्याची सहज वृत्ती हे हरवलं. माणसातलं भलेपण, विश्वास, परस्परांना सोबत घेऊन पुढे जाण्याची वृत्तीच नष्ट होत गेली, असं वेबर म्हणतो.

माणसासकट सर्वच प्रजातींना ‘पोट भरणं’ ही तगण्याची पूर्वअट आहेच. परंतु केवळ पैसा, अधिक पैसा यासाठी माणसं जगतात का? पूर्वापारपासून भौतिक सुखाच्या कल्पना, आर्थिक ध्येयं महत्त्वाची मानली गेली; परंतु त्यांना सामूहिक कल्याणाच्या, सामूहिक नीतिशास्त्रीय कल्पनांनी त्या त्या समाजातल्या मूल्यांनी भागलं जात असे. अर्थात अमर्याद सत्ताकांक्षा, शत्रुत्व आणि आक्रमण या वेळी या चौकटी आणि मर्यादा बिनदिक्कतपणे गुंडाळून ठेवल्या जात.

 

भांडवलशाहीच्या विस्फोटानंतर टॉलस्टॉय, चेकॉव्ह, गांधी, आइन्स्टाइन यांनी बेलगाम आर्थिक तार्किकतेविषयी धोक्याचे कंदील दाखवले. जगातल्या संस्कृतींनी पंचतंत्र, हितोपदेश, इसापच्या कथांसारख्या लोककथा/ नीतिकथांनी मानवी शहाणिवेतून मिळालेल्या चौकटीतून असेच धोके दाखवलेले होते. आर्थिक तार्किकता आणि वैज्ञानिक कार्यक्षमतेच्या चरमबिंदूवर आइन्स्टाइन गांधींची भेट घेतात, याला एक अर्थ आहे. मात्र एकविसाव्या शतकात समुदाय-जीवन विखंडित झालेलं असताना शेअर मार्केट आणि अमर्याद नफा हीच आपल्या ‘सामूहिक आर्थिक प्रगती’ची मानकं झाली आहेत.

आता या टप्प्यावर एकच पंथ, जात-धर्मावर आधारलेली नीतिमत्ता अर्थातच औचित्यपूर्ण नाही. समन्यायी वाटप, मानवी प्रतिष्ठा, सहभाव आणि करुणा यावर आधारलेली नवी नीतिशास्त्रीय चौकट निर्माण करण्याचं आव्हान आहे.

जिथं पाणी, खनिजं, हवादेखील पैशांनी विकत घेण्यापर्यंत सौदेबाजी संपूर्ण जगात भांडवलशाहीच्या या टप्प्यावर टोकाला गेली आहे अशा वेळी तो सभ्यतेचा विलयबिंदू आला आहे का? आपल्याच समाजातल्या विविध समुदायांचं फीमर मोडलं तर आपण काय करणार आहोत?

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त समाजशास्त्राचे अध्यापन करतात. लेखातील मते वैयक्तिक.

ईमेल : shruti.tambe@gmail.com