– मुंबईमध्ये १२ मार्च १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बहल्ल्याला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत.

– या हल्ल्यात कोणाचे वडिल, कोणाचा मुलगा तर कोणाची पत्नी अशा २५७ जणांचे हकनाक बळी गेले होते. याबरोबरच ७१७ जण जखमी झाले होते.

– हल्ल्यानंतर सीबीआयकडून विविध आरोपाखाली १२३ जणांना अटकही करण्यात आली होती. त्यातील जवळपास १०० जणांना बॉम्बस्फोटातील सहभागाबद्दल शिक्षा सुनावण्यात आली होती. याशिवाय विशेष टाडा न्यायालयाने २३ जणांची निर्दोष सुटकाही केली होती.

– आजपर्यंत या हल्ल्यातील याकूब मेमन या एकमेव दोषीला फाशी देण्यात आली. अभिनेता संजय दत्तसह १०० आरोपींना विविध आरोपांखाली दोषी धरून शिक्षा सुनावली.

– दोषी ठरलेल्या १०० पैकी ६८ आरोपींना कमीत कमी शिक्षा झाली आणि न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या दंडाची रक्कम भरून ते तुरुंगातून बाहेर पडले.

– खटला चालेपर्यंत जे आरोपी तुरुंगात होते आणि न्यायालयाने सुनावलेली शिक्षा त्यांनी खटला सुरू असतानाच भोगली होती, ते आरोपी दंडाची रक्कम भरून खटल्यानंतर लगेचच बाहेर पडले. तर यातील २७ आरोपी फरार आहेत.

– खटल्यातील एक आरोपी एहतेशाम सिद्दीकी याला टाडा न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा व ५० हजारांचा दंड सुनावला होता. परंतु खटला चालेपर्यंतच त्याने शिक्षेचा हा काळ तुरुंगात काढला. त्यामुळे न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तो दंडाची रक्कम भरून बाहेर पडला.

– या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला मुस्तफ्फा दोसाचा काही महिन्यांपूर्वीच हृदयविकाऱ्याच्या झटक्याने मृत्यू झाला तर अबू सालेम हा कारागृहात आहे.