निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आता आरोपी अक्षयने कोर्टात याचिका दाखल केली आहे. निर्भया प्रकरणातील चारही दोषींना ३ मार्च रोजी फाशी दिली जाईल असं डेथ वॉरंट जारी करण्यात आलं. ज्यानंतर शुक्रवारी पवनने तर शनिवारी अक्षय ठाकूरने फाशी टाळण्यासाठीची याचिका दाखल केली. शुक्रवारी पवनने फाशीऐवजी आपल्याला जन्मठेप द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. तर आज अक्षय ठाकूरने दया याचिका दाखल केली आहे. मी याआधी केलेली याचिका फेटाळण्यात आली होती. मात्र त्यावेळी सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं गेलं नाही असं म्हणत अक्षयने पुन्हा याचिका दाखल केली आहे.

आरोपी अक्षयने याचिकेत काय म्हटलं आहे?

गेल्यावेळी मी जो दयेचा अर्ज केला होता तो घाईने केला होता. मला जर फाशी झाली तर त्याचा परिणाम माझ्या कुटुंबावर म्हणजेच माझ्या पत्नीवर आणि किशोरवयीन मुलावर होईल. माझ्या कुटुंबीयांची चूक नसताना सामाजिक जीवनात त्यांना शिक्षा सहन करावी लागते आहे. त्यामुळे माझी फाशी रद्द करण्यात यावी. आधी केलेल्या दया अर्जात त्यामध्ये काही गोष्टी सुटल्या होत्या, काही त्रुटी राहिल्या होत्या. त्या याचिकेत अक्षयची सही, आर्थिक स्थिती, त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड असे मुद्दे नव्हते. आता या अर्जाबाबत काय निर्णय दिला जाणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

निर्भया प्रकरण आहे काय?
दिल्लीत डिसेंबर २०१२ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली निर्भया ही तिच्या मित्रासोबत सिनेमा पाहून घरी परतत होती. नवी दिल्ली येथील मुनीरकापासून द्वारका या ठिकाणी जाण्यासाठी या दोघांनी बस पकडली. या बसमध्ये बसल्यावर फक्त पाच ते सात प्रवासी असल्याचं या दोघांना लक्षात आलं. प्रवास सुरु झाल्यानंतर बसलेल्या इतरांनी निर्भयासोबत छेडछाड केली. यामध्ये तिच्या मित्राने हस्तक्षेप केला तेव्हा त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहारण करण्यात आली. यानंतर सहा आरोपींनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तिचा अमानुषपणे लैंगिक छळही केला. यानंतर विविस्त्र अवस्थेत निर्भया आणि तिच्या मित्राला बसबाहेर फेकून देण्यात आलं.

या सगळ्या प्रकारानंतर निर्भयाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिला पुढील उपचारांसाठी सिंगापूरलाही नेण्यात आलं. मात्र तिथेच २९ डिसेंबर २०१२ ला तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात २०१३ मध्ये आत्महत्या केली. ऑगस्ट २०१३ मध्ये अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. सप्टेंबर २०१३ मध्ये चार मुख्य आरोपींना १३ अपराधांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाने दोषी ठरवलं. १३ सप्टेंबर २०१३ रोजी या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर १३ मार्च २०१४ रोजी फाशीच्या शिक्षेविरोधात आरोपींनी केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायलयात सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयानेही या चारही दोषींची फाशी कायम ठेवली. त्यानंतर हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टातही या चारही जणांची फाशी कायम ठेवण्यात आली. राष्ट्रपतींनीही या चारही जणांचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. याच वर्षात आधी जानेवारी महिन्यात, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आणि मग मार्च महिन्यातील तारीख देणारं डेथ वॉरंट काढण्यात आलं. आता या प्रकरणी पुढे काय होणार त्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.