News Flash

दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत तीन जवान शहीद, दहशतवाद्यांकडून मृतदेहाची विटंबना

माछिल सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सैन्याच्या जवानांमध्ये चकमक झाली.

प्रातिनिधिक छायाचित्र

जम्मू काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. चकमकीनंतर दहशतवाद्यांनी भारताच्या एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याने संताप व्यक्त होत आहे.

माछिल सेक्टरमध्ये मंगळवारी दहशतवादी आणि सैन्याच्या जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन जवान शहीद झाले. पळ काढताना दहशतवाद्यांनी एक जवानाच्या मृतदेहाची विटंबनाही केली. या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला सडेतोड उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रिया सैन्याने दिली आहे. सैन्याच्या अधिका-यांना या घटनेची माहिती संरक्षणमंत्र्यांनाही दिली आहे.

मंगळवारी सकाळी बांदीपुरा येथे चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या दहशतवाद्यांकडून दोन हजार रुपयांच्या नवीन नोटाही जप्त करण्यात आल्या होत्या. तर बीएसएफच्या जवानांनी आरएसपुरा सेक्टरमध्ये एका पाकिस्तानी घुसखोराला टिपले होते. या दोन्ही घटना ताज्या असतानाच माछिल सेक्टरमध्येही दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. सोमवारी राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. या घटनेत सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल राय सिंह हे शहीद झाले होते. तर चार जवान या घटनेत जखमी झाले होते.

२८ ऑक्टोबररोजी माछिल सेक्टरमध्येच पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांशी भारतीय जवानांची चकमक झाली होती. या चकमकीत सैन्याने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. तर सैन्याचा एक जवान यात शहीद झाला. दहशतवाद्यांनी पाकमध्ये पळ काढण्यापूर्वी शहीद झालेल्या जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली. मनदीपसिंह रावत असे शहीद झालेल्या जवानाचे नाव होते.

उरीमध्ये पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी लष्करी छावणीवर हल्ला केला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी  भारताने २९ सप्टेंबररोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. या हल्ल्यात भारताच्या जवानांनी दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. मात्र भारताच्या सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. सीमा रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबाराच्या २८६ घटना घडल्या आहेत. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून यात १४ जवानांचा समावेश आहे. सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानवर वचक निर्माण होईल अशी आशा होती. पण त्यानंतरही पाकिस्तानच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे पाकविरोधात मोदी सरकारचे धोरण फसल्याची टीका विरोधक करत आहेत. भारतावर दबाव टाकण्यासाठी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात सीमारेषेजवळ पाकिस्तानच्या सैन्याने युद्धाचा सरावदेखील केला होता. भारताला सडेतोड उत्तर देऊ अशी धमकीही पाकिस्तानकडून वारंवार दिली जात होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 4:49 pm

Web Title: 3 soldiers killed in an encounter with terrorists in machhal
Next Stories
1 देवभूमी उत्तराखंड सावत्र आईच्या हाती; अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2 नवीन नोटांवर देवनागरी लिपीतील अंक का ? – मद्रास हायकोर्ट
3 मोदींच्या उद्दामपणामुळेच संसदेचे कामकाज ठप्प- सीताराम येचुरी
Just Now!
X