उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन सात कामगार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत चार कामगार होरपळून जखमी झाले आहेत.

गाजियाबादमधील मोदीनगर परिसरात असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात दुपारी अचानक स्फोट झाला. दुपारी कामगार फटाके बनवण्याचे काम करत होते. यावेळी कारखान्यात ३० कामगार काम करत होते. त्याचवेळी अचानक भीषण स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली. यात सात कामगार होरपळून जागीच मरण पावले आहेत, अशी माहिती गाजियाबादचे जिल्हाधिकारी अजय शंकर पांडेय यांनी दिली.

ज्या ठिकाणी हे काम सुरू त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. तर घटनेत जखमी झालेल्यांना ५० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती अजयय शंकर पांडे यांनी दिली.

“घटनास्थळी पोहोचल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की, स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनं दिरंगाई केली. त्यामुळे अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असं पांडेय यांनी सांगितलं.