राजधानी एक्स्प्रेमध्ये तरुणीसोबत छेडछाड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली-रांची राजधानी एक्स्प्रेसमधील तिकीट तपासणीस आणि पँट्री स्टाफकडून ही छेडछाड करण्यात आली. रेल्वेने याप्रकरणी चौकशीचा आदेश दिला आहे. दरम्यान तिकीट तपासणीसला निलंबित करण्यात आलं असून, वेटरला कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे.

पीडित तरुणी विद्यार्थी असून तिच्या ओळखीतील एका महिलेने ट्विट करत या घटनेची माहिती दिली. पीडित तरुणीला गुंगीचं औषध देण्यात आलं होतं अशी माहिती त्यांनी दिली आहे. “संबंधित तरुणी विद्यार्थी असून जर कायदेशीर कारवाई करायला गेलो तर आपण त्यात अकडून पडू अशी भीती तिला वाटत आहे”, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी रेल्वे मंत्र्यांसहित काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना टॅग केलं होतं.

पीडित तरुणीने याप्रकरणी पोलीस तक्रार केल्याची माहिती या महिलेने दिली आहे. महिलेच्या ट्विटची दखल घेत रेल्वेने सांगितलं की, “झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. यासंबंधी योग्य ते पाऊल उचलत कारवाई प्रक्रिया सुरु आहे. योग्य ती कारवाई केली जाईल”.