केदारनाथ मंदिराचे द्वार बंद होण्याआधीच तिथे बर्फवृष्टी झाल्यामुळे केदारनाथ मंदिरात दर्शनाठी पोहचलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अडकून पडण्याची वेळ आली आहे. ८.३० वाजता केदारनाथचे द्वार बंद होताच दोन्ही मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरने बद्रिनाथ गाठायचे होते. पण बर्फवृष्टी झाल्यामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण शक्य नसल्यामुळे या दोघांपुढे बर्फवृष्टी थांबण्याची वाट पाहण्याखेरीज काहीही मार्ग उरला नाही.

बर्फाची दुलई केदारनाथ मंदिर आणि परिसरावर पसरल्याचे चित्र आहे. थंडीचा कडाकाही या भागात वाढला आहे. मोठय़ा प्रमाणावर बर्फवृष्टी गंगोत्री धाममध्येही झाली आहे. गंगोत्री धामचे द्वार बंद होताच वातावरणात बदल झाला आणि बर्फवृष्टी सुरू झाली. थंडीचा कडाका भारतातील पर्वतरांगा असलेल्या भागात वाढल्याचे दिसून येत आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान या राज्यांमध्ये झालेल्या पावसामुळे हवा जास्त थंड झाली आहे. बर्फवृष्टीमुळे उंचसखल भागात राहणाऱ्या स्थानिकांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी कमी होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हिमालयातल्या चार धाम तीर्थापैकी एक असलेले केदारनाथ मंदिर हिवाळ्यात भाविकांसाठी बंद होते. साधारण दिवाळीच्या सुमारास पूर्वनियोजित तारखेनुसार मंदिरात महापूजा होते आणि मंदिराची कवाडे बंद होतात. यावेळी केदारनाथ परिसरात दमदार बर्फवृष्टी आधीपासूनच सुरू झाली आहे. आज सोमवारी सकाळी केदारनाथाची दारे बंद होणार होती. त्यापूर्वी तिथे दर्शनासाठी पोहोचलेल्या दोन मुख्यमंत्र्यांना या हिमवृष्टीतच अडकावे लागले.

बिहारमधल्या यशानंतर योगींनी केदारनाथाचे दर्शन घ्यायचे ठरवले होते. मंदिर हिवाळ्यासाठी बंद होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तिथे पोहोचले. पहाटे ३ वाजल्यापासूनच मंदिर बंद होण्यापूर्वीची पूजा अर्चा सुरू होती. त्यानंतर आदित्यनाथ बद्रिनाथ इथे एका कार्यक्रमासाठी पोहोचणे अपेक्षित होते. पण हेलिकॉप्टर उड्डाणासाठी योग्य वातावरण नसल्याने त्यांना केदारनाथहून वेळेत निघता आले नाही. बद्रिनाथ इथे उत्तर प्रदेश सरकारतर्फे ४० खोल्यांचे पर्यटक निवास बांधण्यात येत आहे. त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या हस्ते होणार होते.