बिहार विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवणाऱ्या एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांना राजकीय झटका बसण्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या एमआयएमच्या पाच आमदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतल्यानंतर पक्षांतराच्या तर्कविर्तकांना उधाण आलं आहे.
एमआयएमचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अख्तर उल इमाम यांच्यासह मोहम्मद अझहर असफी, शहनवाज आलम, सयद रुकुनूद्दीन आणि अझहर नियामी या पाच आमदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी जदयूचे नेते आणि मंत्री विजय चौधरी हे त्यांच्यासोबत होते. एमआयएम आमदार आणि नितीश कुमार यांच्यामध्ये या भेटीत काय चर्चा झाली? हे स्पष्ट झालं नाही.
आणखी वाचा- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : काँग्रेस व डाव्या पक्षांमध्ये १९३ जागांचा झाला निर्णय
दरम्यान, आपण सीमांचलच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं आमदार आदिल हसन यांनी म्हटलं आहे. एमआयएमचा भाजपासोबत भाजपासोबत वाद आहे, नितीशकुमारांसोबत नाही. असदुद्दीन ओवेसी हे सुद्धा नितीश कुमार यांच्यासोबत हात मिळवण्यास तयार होते, जर त्यांनी भाजपापासून जदयूला दूर केलं असतं तर, असं आदिल यांनी म्हटलं आहे.
“एमआयएमचे आमदार निवडून आलेल्या सीमांचलच्या विकासाबद्दल चर्चा करण्यासाठी नितीश कुमार यांची भेट घेतली. आम्हाला नितीश कुमाराबद्दल समस्या नाही, तर भाजपाबद्दल आहे. जर नीतीश कुमार एनडीएतून बाहेर पडले, तर आम्ही त्यांच्यासोबत हात मिळवण्यास तयार आहोत. आम्ही भविष्यातही नितीश कुमार यांची भेट घेत राहू,” असं आदिल यांनी सांगितलं.
गेल्या आठवड्यातच बसपाचे आमदार जामा खान यांनी अपक्ष आमदार सुमित सिंह यांच्याबरोबर जदयूमध्ये प्रवेश केला. तर लोजपाचे आमदार राज कुमार सिंह यांनीही नितीश कुमार यांची भेट घेतली. त्यातच आता एमआयएमचे पाच आमदारांनी नितीश कुमार यांची भेट घेतल्यानं पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या जदयूची एमआयएमच्या आमदारांवर नजर असल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यामुळे बिहारमध्ये दमदार पाऊल ठेवणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांना राजकीय झटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.