मोदींच्या कर्तृत्वावर शहा यांची स्तुतिसुमने

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या कालखंडाच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. शनिवारी (३० मे रोजी) मोदी सरकारला केंद्रात सत्ता स्थापन करून सहा वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा दशकांतील ऐतिहासिक चुका दुरुस्त करण्याचे मोठे काम केले, अशा शब्दांत शहा यांनी ट्वीट करून मोदींचे कौतुक केले.

साठ वर्षांतील दरी बुजवून देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मोदी कौतुकास पात्र आहेत. मोदींच्या दूरदृष्टी असलेल्या व निर्णायक नेतृत्वाखाली देश निरंतर प्रगती करेल यात कोणतीही शंका नाही. भारताला मोदी आत्मनिर्भर बनवण्याकडे घेऊन जात आहेत. सहा वर्षांत गरिबांचे कल्याण त्याचबरोबर विविध क्षेत्रांतील सुधारणा एकाचवेळी मोदींनी केल्या आहेत. मोदींचे नेतृत्व इमानदार आहे, जनतेसाठी अथक कष्ट करणारे आहे. अशा नेतृत्वावर जनतेचा विश्वास क्वचितच अन्य देशांमध्ये पाहायला मिळतो, असेही शहा म्हणाले.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कालखंडातील वर्षपूर्तीनिमित्त भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही केंद्र सरकारच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांनी धाडसी निर्णय घेतल्याचे नड्डा म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० व ३५-अ रद्द केले, नागरिकत्व दुरुस्ती कायदा केला, तिहेरी तलाकवर बंदी आणून मुस्लीम महिलांना दिलासा दिला, अवैध कृत्ये प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून दहशतवादी ठरवण्याचा अधिकार तपास यंत्रणांना दिला, पॉक्सो कायद्यात अल्पवयीन मुला-मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद केली. राम मंदिर बनवण्यासाठी न्यास स्थापन केला. आर्थिक सुधारणा केल्या. कंपन्यांना दिलासा दिला. करोनाचे संकट धीराने हाताळले. मोदींच्या धाडसी नेतृत्वामुळेच केंद्र सरकारला इतके मोठे यश मिळू शकले, असे नड्डा म्हणाले.

राहुल गांधींना समज कमी- जे.पी. नड्डा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना कुठल्याही विषयाची समज कमी आहे. ते गोंधळलेले असतात, लोकांना गोंधळात टाकणारी विधाने करतात. त्यामुळेच ते कधी टाळेबंदी का लागू केली असे विचारतात, तर कधी टाळेबंदीचा कालावधी का वाढवला जात नाही, असे परस्परविरोधी प्रश्न विचारत असतात, अशी टिप्पणी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. राहुल गांधी करत असलेली विधानेही त्यांच्या राजकारणाचा हिस्सा आहे. राजकीय नेता म्हणून त्यांना जे बोलायचे असेल ते बोलू शकतात, पण त्यातील सत्य काय हे जनतेला माहिती आहे, असेही नड्डा म्हणाले. भाजपने कधीही करोनाच्या मुद्दय़ावर राजकारण केलेले नाही. स्थलांतरित मजुरांना कष्ट झेलावे लागले याचे प्रत्येकाला दु:ख आहे, पण भाजपचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मजुरांच्या मदतीला धावले. त्यांच्या जेवणाखाण्याची, राहण्याची सोय केली गेली, असेही नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अपेक्षाभंगाची सहा वर्षे- काँग्रेस</strong>

गेल्या सहा वर्षांमधील मोदी सरकारचा कारभार म्हणजे अपेक्षाभंग, सर्व क्षेत्रांत व्यवस्थापनाचा अभाव आणि सर्वसामान्यांना यातना भोगावे लागणारा होता, अशी टीका काँग्रेसने केली. मोदी सत्तेवर आले तेव्हा त्यांनी डॉलरच्या तुलनेत रुपया सशक्त करण्याचे आश्वासन दिले होते, पण रुपया ४० ऐवजी ७५ रुपये प्रति डॉलर इतका गडगडलेला आहे. २ कोटी रोजगारनिर्मिती केली जाईल असे मोदी म्हणाले होते, आज २०१७-१८ मध्ये बेरोजगारी ४५ वर्षांत सर्वाधिक होती. करोनानंतर बेरोजगारीचे प्रमाण २८ टक्क्यांनी वाढले आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते वेणुगोपाल यांनी केली. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न हाताळण्यात आलेले अपयश, २० लाख कोटींच्या आर्थिक मदतीतील फसवेपणा आदी मुद्दय़ांवरून काँग्रेसने मोदी सरकारला धारेवर धरले.