पंजाबातील अमृतसर रेल्वे अपघात प्रकरणी विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी पत्नीचा बचाव करताना ट्रेनच्या वेगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जोडा रेल्वे फाटकाजवळ ट्रेनचा वेग नेहमीच कमी असतो असं नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे. जोडा रेल्वे फाटकाजवळ ‘रावण दहन’ पाहण्यासाठी जमलेली गर्दी रेल्वे रुळावरही उभी असतानाच या लोहमार्गावरून वेगाने आलेल्या गाडीची धडक बसून ६1 जण मृत्यूमुखी पडले.

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाची तसंच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यास आपण तयार असल्याचं म्हटलं आहे. अपघातानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. ज्या कार्यक्रमात अपघात झाला तिथे त्या मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अपघातानंतर काही वेळातच त्यांनी तेथून काढता पाय घेतला होता.

Amritsar train accident: माणुसकीचा अंत ! अपघातानंतर लोक मदतीऐवजी काढत होते सेल्फी, संताप व्यक्त

विरोधकांनी नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांची पत्नी आयोजक सौरभ याला वाचवत असल्याचाही आरोप केला आहे. सौरभ हा काँग्रेस नेते विजय मदान यांचा मुलगा आहे.

Amritsar train accident : पोलिसांनी मोटरमनला घेतले ताब्यात, चौकशी सुरु

सोमवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सिद्धू यांनी ट्रेन अत्यंत धीम्या गतीने जातानाचा आणि त्याचवेळी लोक ट्रॅक ओलांडत असल्याचा एक व्हिडीओ दाखवला. ‘अशा पद्धतीने ट्रेन तेथून जाते. हे जोडा फाटक आहे’, असं सांगत त्यांनी ट्रेनच्या स्पीडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

‘रेल्वे कोणतीही चौकशी न करता क्लीन चीट कसं काय देऊ शकतं ? ट्रेन इतक्या वेगाने का जात होती ? गेटमॅनने लोक ट्रॅकवर उभी असून ट्रेनचा स्पीड कमी करावा असं ट्रेन चालकाला का नाही कळवलं ?’, असे अनेक प्रश्न सिद्धू यांनी यावेळी उपस्थित केले.

रेल्वेने अपघातासाठी चालक जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. सोबतच चालकाने ट्रेनचा वेग ताशी 91 किमी वरुन 68 वर आणल्याची माहिती देत सिद्धू यांचा दावा फेटाळला आहे.