करोना विषाणूच्या संसर्गाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही भाजपाचे खासदार आणि माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १४ दिवसांसाठी घरात एकांतवासात (क्वारंटाईन) राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभू हे १० मार्च रोजी सौदी अरेबियात शेरपास बैठकीत सहभाग घेऊन परतले आहेत. यापूर्वी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी स्वतःला वेगळं ठेवलं होतं.

थिरुवअनंतपुरम येथील एका डॉक्टरच्या संपर्कात आल्यामुळे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी एकांतवासात राहण्याचा निर्णय घेतला होता. हे डॉक्टर स्पेनवरुन भारतात परतले होते. तसेच त्यांची चाचणी पॉझिटिव्ह येण्याआधी त्यांनी दहा दिवस रुग्णालयात काम केलं होतं. त्यावेळी एका बैठकीदरम्यान मुरलीधरन या डॉक्टरांच्या संपर्कात आले होते. मुरलीधरन यांनी दिल्लीस्थित आपल्या घरातच वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांची करोनाची चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. मुरलीधरन यांनी संसदेपासूनही दूर आहेत तसेच त्यांनी नुकतेच भाजपाच्या संसदीय बैठकीलाही ते गैरहजेर राहिले.

भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४७वर

देशात करोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या १४७वर पोहोचली आहे. तसेच ५७०० पेक्षा अधिक लोकांना वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, सैन्यामध्ये देखील करोनाची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. तर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात मंगळवारी एका ६४ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. देशातला करोनाग्रस्ताचा हा तिसरा मृत्यू आहे.

पुण्यात आणखी एक व्यक्ती करोनाग्रस्त

पुण्यात आणखी एका व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही व्यक्ती फ्रान्स आणि नेदरलँडचा प्रवास करुन आली आहे. त्यामुळे पुण्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १८ वर पोहोचली असून त्यामुळे महाराष्ट्रातील आकडा ४२वर पोहोचला आहे.