लॉकडाउनमध्ये मोठा आर्थिक फटका बसल्याने सूरतमध्ये एका हिरे व्यापाऱ्याने चक्क गुन्ह्याचा मार्ग अवलंबला. मागच्यावर्षी जानेवारी महिन्यात सूरतच्या वाराच्छामधले हिरे व्यापारी उदयवीर तोमर उर्फ पप्पूकडे आपले हिरे पॉलिश करण्यासाठी द्यायचे. उदयवीरसीन तोमरकडे हिरे सोपवताना, त्यांच्या मनात कुठलीही संशयाची भावना नसायची. पण करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले. हिरे व्यवसायालाही त्याचा फटका बसला.

मंदीचा व्यवसायाला इतका फटला बसला की, उदयवीरसीन तोमरने गुन्ह्याचा मार्ग अवलंबला. हिरे पोहोचवणाऱ्या अंगडियांना (खाजगी कुरियर) लक्ष्य करण्यासाठी त्याने सशस्त्र दरोडेखोरांची टोळी बनवली. मंगळवारी एका अंगडियाला लक्ष्य करण्याआधी तोमर आणि त्याच्या टोळीतील साथीदारांना पोलिसांनी अटक केली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

पोलिसांनी या पाच जणांच्या टोळीला पकडले, तेव्हा त्यांच्याकडे देशी पिस्तुल, चाकू, हातोडा, मिरची पूड, नायलॉनची दोरी होती. उदयवीरसीन तोमर मूळचा मध्य प्रदेशचा असून मागच्या ३० वर्षांपासून तो सूरत शहरामध्ये राहत आहे. मागच्या २० वर्षांपासून वारच्छा आणि कापोद्रा येथील वेगवेगळया युनिटसमध्ये त्याने हिरे पॉलिशिंगचे काम केले आहे. बचत केलेल्या पैशामधून त्याने दोन हिरे पॉलिशिंगच्या मशीन विकत घेतल्या व कापोद्रा येथील आपल्या घरामधून त्याने काम सुरु केले.

“तोमरचा बाजारात चांगला संपर्क होता. त्याला बऱ्यापैकी काम मिळायचे. महिन्याकाठी तो ३० हजार रुपये कमवत होता. मागच्यावर्षीच्या सुरुवातीपासून त्याला व्यावसायिक अडथळे येऊ लागले, लॉकडाउनमध्ये त्याचा पूर्ण व्यवसायच बंद पडला” असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.