सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) धरणे देणारे आंदोलक व कायद्याला समर्थन देणाऱ्या गटामध्ये सोमवारी जोरदार धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूच्या संतप्त आंदोलकांनी तुफान दगडफेक करत दुकानं, वाहनं पेटवून दिली. यातच एकानं गोळीबारही केला. या संपुर्ण हिंसाचारात एका पोलिसांसह तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून, ईशान्य दिल्लीतील अनेक भागात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे.

दिल्लीतील जाफराबाद मेट्रो स्टेशन परिसरात सीएए विरोधात महिलांनी आंदोलन सुरू केलं होतं. रविवारी दुपारी या परिसरात दगडफेक झाली. त्यांनतर सोमवारी सीएए कायद्याला विरोध करणारे आंदोलक आणि कायद्याचे समर्थन यांनी दगडफेक केली. ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपुरी भागातील हिंसाचाराची झळ आजूबाजूच्या परिसरालाही बसली. या दगडफेकीत जखमी झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यासह नागरिकाचा मृत्यू झाला. या हिंसाचारात एकानं गोळीबार केला. यात अनेकजण जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान,दगडफेक सुरू झाल्यानंतर संतप्त झालेल्या दोन्ही गटातील समाजकंटकांनी परिसरातील दुकानं, वाहनं यांची नासधूस करत पेटवून दिली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधाराच्या नालकांड्या फोडल्या. हिंसाचारामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन दिल्ली मेट्रो प्रशासनानं जाफराबाद, मौजपुरी बाबरपूर, गोकुळपूरी, जोहरी एनक्लेव्ह, शिव विहार, उद्योग भवन, पटेल चौक, केंद्रीय सचिवालय, जनपथ आदीसह नऊ स्टेशन बंद केली होती. यातील चार पुन्हा सुरू केली असून पाच बंद ठेवली आहेत. या स्थानकांवरील मेट्रोचे थांबेही रद्द करण्यात आले आहेत. प्रशासनानं कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचार उफळलेल्या भागात १४४कलम लागू केलं आहे.

दगडफेकीच्या घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि उपराज्यपाल अनिल बैजल, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, असदुद्दीन ओवेसी, भाजपाचे खासदार कपिल मिश्रा यांच्यासह सर्व पक्षांच्या नेत्यांनी शांतता राखण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.