देशभरात एकीकडे सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन वातावरण तापलेलं असताना खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, भारतातील आंदोलकांनी चीनविरोधात रस्त्यावर उतरलेल्या हाँगकाँगमधील आंदोलकांचा मार्ग अवलंबल्याचं दिसतंय. चिनी सरकार आपण काय चॅटिंग करतोय यावर पाळत ठेवत असल्याचं लक्षात आल्यानंतर हाँगकाँगमधील आंदोलकांनी ऑफलाइन मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर केला होता. त्याचप्रमाणे भारतातील आंदोलकांनीही इंटरनेट बंदीवर तोडगा काढला असून इंटरनेटशिवाय चालणाऱ्या ब्रिजफाय, फायर चॅट यांसारख्या अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे.

ब्लू टूथच्या माध्यमातून सक्रिय –
या दोन्ही अ‍ॅपद्वारे कमी अंतरावरील ब्लूटुथ कनेक्शनच्या आधारे संदेश पाठवता येतात. अमेरिकी अ‍ॅप इंटेलिजेंस फर्म ऐपोटॉपियाच्या(Apptopia) आकडेवारीनुसार, १२ डिसेंबर म्हणजे आसाम आणि मेघालयमध्ये इंटरनेटवर बंदी घातल्यानंतर ब्रिजफाय अ‍ॅप डाऊनलोड आणि त्याचा वापर करण्यामध्ये जवळपास ८० टक्के वाढ झाली आहे. या दोन राज्यांबाहेर इंटरनेट बंदीला सुरूवात झाल्यानंतर तेथेही अशाप्रकारचे अ‍ॅप्स डाऊनलोड करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली.

दिल्लीमध्ये 30 टक्के डाऊनलोड –
इंटरनेटवर बंदी घालण्याआधी देशात दररोज सरासरी केवळ २५ जण ब्रिजफाय अ‍ॅप डाऊनलोड करायचे, तर १३ डिसेंबरनंतर यात १०० टक्क्यांनी वाढ झाली आणि आकडा दर दिवशी जवळपास २६०९ डाऊनलोडपार गेला आहे. ब्रिजफाय अ‍ॅपचे सक्रिय युजर्सही तब्बल ६५ पटीने वाढले असून ११ डिसेंबरच्या आधी ब्रिजफाय अ‍ॅप केवळ १८४ जण वापरायचे. तर, १२ डिसेंबरपासून हा आकडा वाढून १२,११८ वर पोहोचला आहे. दिल्लीच्या काही भागांमध्ये इंटरनेटवर बंदी घातल्यानंतर एकट्या दिल्लीत या अ‍ॅपच्या डाऊनलोड आणि वापराचं प्रमाण ३० पटीने वाढल्याचं समोर आलं आहे.