सीबीआयच्या एका पथकाने आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची चौकशी केली. राबडी देवींनी नोटबंदीच्या काळात बिहार अवामी सहकारी बँकेत सुमारे दहा लाख रूपये जमा केल्याप्रकरणी ही चौकशी झाल्याचे सांगण्यात येते. पाटणा येथील १०, सर्क्युलर रस्त्यावरील निवासस्थानी सीबीआयचे पथक पोहोचले. सुमारे २० मिनिटे या पथकाने राबडीदेवींची चौकशी केली. काही दिवसांपूर्वी राबडी देवींना मनी लाँड्रिंगप्रकरणी सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली होती. त्याबाबतच राबडीदेवींची चर्चा झाल्याचे आरजेडीचे राष्ट्रीय सरचिटणीस भोला यादव यांनी सांगितले.

राबडीदेवींनी बँकेत १० लाख रूपये जमा केल्याप्रकरणी चौकशी केली. याप्रकरणी काही कागदपत्रांवरही सीबीआयने त्यांची स्वाक्षरी घेतली. सीबीआयच्या पथकाला राबडीदेवींनी आयकर विवरण पत्रासह इतर आवश्यक दस्तऐवज दाखवल्यामुळे अधिकारी समाधानी दिसले, असेही यादव यांनी सांगितले. या अधिकाऱ्यांनी यादव कुटुंबीयातील एकाही सदस्याशी चर्चा केली नाही. बिहार अवामी बँकेचे अध्यक्ष अन्वर अहमद हे लालूंचे विश्वासू मानले जातात. ते बिहार विधान परिषदेचे सदस्यही आहेत.

लालूप्रसाद यादव हे चारा घोटाळ्यातील अनेक प्रकरणांमध्ये सध्या शिक्षा भागत आहेत. तर दुसरीकडे त्यांची पत्नी राबडीदेवी, मुलगी मिसा भारती आणि लहान मुलगा तेजस्वीप्रसाद यादव यांच्यावर रेल्वेमध्ये हॉटेलच्या बदल्यात भूखंडासह इतर प्रकरणांत सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभागाकडून चौकशी केली जात आहे.