सर्व तांत्रिक दोष दूर

हेलियमच्या टाकीतील दाब कमी झाल्याने गेल्या १५ जुलै रोजी उड्डाणाच्या ५६ मिनिटे आधी रद्द करण्यात आलेले चांद्रयान-२चे उड्डाण आज सोमवारी, दुपारी २.४३ वाजता होत आहे. या उड्डाणाची उलटगणती रविवारी ६.४३ वाजता सुरू करण्यात आली.

‘जीएसएलव्ही मार्क ३’ प्रक्षेपकाच्या हेलियम टाकीतील दाब कमी झाल्याने चांद्रयानाचे उड्डाण १५ जुलै रोजी रद्द करण्यात आले होते. चेन्नई विमानतळावर इस्रोचे अध्यक्ष के. शिवन म्हणाले, की तांत्रिक दोष आढळल्याने चांद्रयान-२चे उड्डाण रद्द केले होते. आता त्यात दुरुस्त्या करण्यात आल्या असून अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात तांत्रिक बिघाडाची शक्यता नाही. उड्डाणानंतर मोहिमेचे १५ टप्पे असून त्यात ४५ दिवसांच्या काळात हे यान चंद्राच्या कक्षेत जाईल. शेवटच्या १५ मिनिटांत चांद्रयान-२ तेथील दक्षिण ध्रुवावर घिरटय़ा घालत राहील व नंतर रोव्हरसह तेथे अलगद अवतरण करील. इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार म्हणाले, की चांद्रयान-२ आता २२ जुलैच्या उड्डाणासाठी सज्ज असून सर्व तांत्रिक बिघाड दूर करण्यात आले आहेत. हे यान ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरेल.

इस्रोचे अध्यक्ष के. शिवन चांद्रयान-२ मोहिमेच्या नियंत्रण कक्षात रविवारीच दाखल झाले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून चांद्रयान-२चे उड्डाण करण्यात येणार आहे.