परीक्षेत ९ गुणांचा प्रश्न सुटला म्हणून मोहालीमधील करणवीर सिंह या बारावीच्या विद्यार्थ्यांने  टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. भौतिकशास्त्राचा पेपर संपल्यानंतर बुधवारी त्यानं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘तुमच्या इच्छा, तुमची स्वप्नं मी पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे मला माफ करा’ अशी सुसाईड नोटही त्याच्याजवळ कुटुंबियांना सापडली आहे.

करणवीर हा हुशार विद्यार्थी होता. पूर्व परीक्षेत त्याला ९०% गुण मिळाले होते. इतर पेपर चांगले गेल्यानं तो खूपच खूश होता असंही त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं पण भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये त्याचा ९ गुणांचा प्रश्न सुटला होता. यातूनच त्याला नैराश्य आलं असल्याचं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे. घरी आल्यानंतर त्यानं आपल्या वडिलांनाही सांगितलं तेव्हा, यापुढे वेळेत पेपर सोडवण्याचा प्रयत्न केलास तर प्रश्न सुटणार नाही असा सल्ला त्याच्या वडिलांनी त्याला दिला होता. गुण महत्त्वाचे नाही हे जर मी त्याला सांगितलं असतं, तर आज तो जिवंत असता, असं म्हणत त्याचे वडील स्वत:लाच दोष देत होते.

‘मी तुमचं स्वप्नं पूर्ण करू शकलो नाही, यासाठी मला माफ करा. माझं आजी आजोबांवर खूप प्रेम आहे. त्यांची तुम्ही योग्य ती काळजी घ्या’ असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. भौतिक शास्त्राचा पेपर देऊन आल्यानंतर करणवीर खूपच तणावात होता अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी हिंदुस्थान टाइम्सला दिली. घरी अभ्यासात लक्ष लागत नसल्यानं करणवीर आपल्या आजी-आजोबांच्या घरी अभ्यासासाठी येत होता. ९ गुणांचा प्रश्न सुटल्यानं तो तणावाखाली होता. त्यादिवशी आपल्यासाठी काही वस्तू आणण्यासाठी त्यांनी आजी आजोबांना घराबाहेर पाठवले आणि त्यानंतर त्यानं आत्महत्या केल्याचंही त्याच्या नातेवाईकांना सांगितलं.