गोवा विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी मावळते अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर यांच्यावर टीका केल्याने सभागृहात मंगळवारी गदारोळ माजला.
भाजपचे आमदार अनंत शेठ यांची मंगळवारी गोवा विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
राजेंद्र आर्लेकर यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली नसल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.
मुख्यमंत्री लक्ष्मीकान्त पार्सेकर आणि विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांच्या भाषणांनंतर सरदेसाई बोलण्यास उभे राहिले. आर्लेकर यांनी आपल्या कारकीर्दीत विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही, असा आरोप सरदेसाई यांनी केला.
विधानसभेचे नवे अध्यक्ष अनंत शेट हे विरोधी पक्षाच्या सदस्यांना म्हणणे मांडण्याची संधी देतील, विरोधकांना सातत्याने जागेवर बसण्याची सूचना करणार नाहीत, अशी अपेक्षा सरदेसाई यांनी व्यक्त केली. गेल्या साडेतीन वर्षांपासून आर्लेकर यांनी विरोधकांवर अन्याय केला, त्यांना सभागृहात बोलण्याची संधीच दिली नाही, असेही ते म्हणाले.
सरदेसाई टीका करीत असल्याने मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. नव्या अध्यक्षांनी अपक्ष आमदारांना माजी अध्यक्षांविरुद्ध बोलण्यापासून परावृत्त करावे आणि नव्या अध्यक्षांचे अभिनंदन करावे, असे पार्सेकर म्हणाले. तेव्हा तुम्ही आम्हाला शिकविण्याची गरज नाही, असे सरदेसाई म्हणाले त्याला सत्तारूढ आमदारांनी जोरदार हरकत घेतली. सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने नव्या अध्यक्षांनी दुपारच्या भोजनापर्यंत कामकाज तहकूब केले.