काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यापासून काँग्रेसची मोर्चेबांधणी कशी करता येईल आणि त्यानुसार पक्षाला बळकटी कशी आणता येईल यावर ते भर देत आहेत. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यांची घरवापसी करता येईल का? याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. काँग्रेस सोडून भाजपा किंवा इतर पक्षांमध्ये गेलेले नाराज लोक जर पुन्हा काँग्रेसमध्ये आले तर त्याचा फायदा पक्षाला २०१९ च्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे होईल असे राहुल गांधी यांना वाटते आहे.
राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना तशा सूचनाच केल्या आहेत. काँग्रेस सोडून जे नेते किंवा कार्यकर्ते भाजपा किंवा इतर पक्षांमध्ये गेले आहेत त्यांना परत पक्षात आणण्यासाठी सगळ्यांनी शक्य असतील तेवढे प्रयत्न करावेत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ‘इंडिया टुडे’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
मंगळवारीच उत्तर प्रदेशात पक्ष सोडून गेलेल्या २४ माजी काँग्रेस आमदारांनी आणि बसपाच्या ७४ नेते कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मागच्या एक महिन्यापासून दिल्लीचे विभाग प्रमुख अजय माकन यांनीही पक्ष बळकटीचे काम हाती घेतले आहे. गेल्याच महिन्यात त्यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, किरण वालिया, अरविंदर सिंग लव्हली यांची भेट घेतली. अरविंदर सिंग यांनी गेल्याच आठवड्यात पुन्हा पक्षात प्रवेश केला.
मी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा मला खूप त्रास झाला. काहीतरी समन्वयाचा अभाव होता असे मला जाणवले. अत्यंत जड अंतःकरणाने मी पक्ष सोडला होता. मात्र राहुल गांधी जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी माझी भेट घेतली त्यानंतर पक्षात परत येण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय माझ्यापुढे नव्हता. असे लव्हली यांनी म्हटले आहे. एकंदरीत या सगळ्या घडामोडी पाहता राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकांची कसून तयारी करत आहेत असेच दिसून येते आहे. नाराज नेत्यांना आपल्याकडे वळवण्यात ते यशस्वी झाले तर त्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकांमध्ये नक्कीच होईल यात शंका नाही.