अब्रूनुकसानीच्या खटल्यात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शनिवारी विवेक डोवाल यांची माफी मागितली. विवेक डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा मुलगा आहे. २०१९ सालातील हा अब्रूनुकसानीचा खटला आहे. विवेक डोवाल यांनी जयराम रमेश यांचा माफीनामा स्वीकारला आहे. २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख आणि बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी विवेक डोवाल यांनी जयराम रमेश आणि मॅगझिन विरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता.

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी सचिन गुप्ता यांनी आज या प्रकरणात सुनावणी घेतली. “निवडणुकीची वेळ होती, त्या वातावरणात मी विवेक डोवाल यांच्या विरोधात वक्तव्य केली. त्यांच्यावर आरोप केले” असे जयराम रमेश यांनी माफीनाम्यात म्हटले आहे. लेखाच्या आधारावर मी ही वक्तव्य केली होती. मला आधी त्याची शहानिशा करायला पाहिजे होती असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

“जयराम रमेश यांचा माफीनाम स्वीकारला आहे. पण मॅगझिन विरोधात अब्रूनुकसानीची खटला सुरुच राहिल” असे विवेक डोवाल यांनी स्पष्ट केले. जयराम रमेश यांच्याविरोधातील खटला आता अधिकृतपणे बंद झाला आहे. पण दुसऱ्या न्यायाधीशासमोर आता खटल्याची सुनावणी सुरु राहिल. जानेवारी २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखा विरोधात विवेक डोवाल यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये खटला दाखल केला होता.