जेसिका लाल हत्याकांडातील आरोपी मनु शर्माची तिहार तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आहे.
जेसिका लाल हत्याकांड प्रकरणात मनु शर्माला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र चांगल्या वागणुकीमुळे त्याची मुक्तता करण्यात आली आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या मनु शर्माने आपली शिक्षा पूर्ण होण्याआधी आपली सुटका व्हावी असा अर्ज केला होता.

त्यानंतर दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी मनु शर्मासह तिहार जेलमधून १८ जणांची मुक्तता केली आहे. माजी केंद्रीय मंत्री विनोद शर्मा यांचा मुलगा मनु शर्मा ३० एप्रिल १९९९ रोजी एका पार्टीत मॉडेल जेसिका लालची गोळी झाडून हत्या केली होती. त्यानंतर मनु शर्माला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. २०१८ मध्ये जेसिकाची लहान बहीण सबरीना लालनेही मनु शर्माला माफ केल्याचं म्हटलं होतं. तसंच त्याला मुक्त करण्यात आलं तर माझी काही हरकत नाही असंही तिने म्हटलं होतं.

काय आहे जेसिका लाल प्रकरण?

३० एप्रिल १९९९ च्या रात्री दक्षिण दिल्ली टॅमरिंड कोर्ट रेस्तराँ या ठिकाणी असलेल्या एका पार्टीत जेसिका लालची मनु शर्माने गोळी झाडून हत्या केली

३० एप्रिल १९९९ च्या रात्रीच जेसिकाला अपोलो रुग्णालयात आणलं गेलं, मात्र रुग्णालयात आणण्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं

२ मे १९९९ मनु शर्माची टाचा सफारी दिल्ली पोलिसांनी नोएडातून जप्त केली

६ मे १९९९ चंदीगढच्या एका कोर्टासमोर मनु शर्माने सरेंडर केलं

यानंतर उत्तर प्रदेशचे नेते डी.पी. यादव यांचा मुलगा विकास यादवसहीत १० जणांना अटक करण्यात आली

३ ऑगस्ट १९९९ ला आयपीसी च्या विविध कलमान्वये जेसिका लाल हत्याकांड प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आली

३१ जानेवारी २००० मॅजिस्ट्रेट कोर्टाने हे प्रकरण सेशन कोर्टाकडे वर्ग केलं

२३ नोव्हेंबर २००० सेशन कोर्टाने हत्याकांडा प्रकरणात ९ जणांच्या विरोधात आरोप निश्चित केले

२ मे २००१ कोर्टात साक्षी नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली

३ मे २००१ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार श्यान मुंशी याने त्याची जबाब फिरवला, कोर्टात त्याने मनुला ओळखलंच नाही

५ मे २००१ कुतुल कोलोनेडमधल्या एका इलेक्ट्रिशयनसह आणखी एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने साक्ष फिरवली

१६ मे २००१ तिसरा मुख्य साक्षीदार करण राजपूत यानेही त्याची साक्ष फिरवली

६ जुलै २००१ साक्षीदार मालिनी रमानीने मनु शर्माला कोर्टात ओळखलं

१२ ऑक्टोबर २००१ रेस्तराँ आणि बार मालकीण बीना रमानी यांनीही मनुची ओळख कोर्टात पटवली

१७ ऑक्टोबर बीनाचे कॅनडामधले पती जॉर्ज मेलहोत यांनी साक्ष दिली आणि मनु शर्माची ओळखही पटवली

२० जुलै २००४ वादग्रस्त तपास अधिकारी सुरिंदर शर्मा यांनी साक्ष दिली

२१ फेब्रुवारी २००६ लोअर कोर्टाने साक्षच नसल्याने नऊ जणांना निर्दोष मुक्त केलं

१३ मार्च २००६ दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात अर्ज केला

३ ऑक्टोबर २००६ हायकोर्टात करण्यात आलेल्या अर्जानंतर सुनावणी सुरु झाली

२९ नोव्हेंबर २००६ हायकोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला

१८ डिसेंबर २००६ हायकोर्टाने मनु शर्मा, विकास यादव आणि अमरदीप सिंह गिल उर्फ टोनी यांना दोषी ठरवलं. आलोक खन्ना, विकास गिल, हरविंदर चोपडा, राजा चोपडा, श्याम सुंदर शर्मा आणि योगराज सिंह यांना मुक्त करण्यात आलं.

२० डिसेंबर २००६ हायकोर्टाने मनु शर्माला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि ५० हजारांचा दंडही ठोठावला, सहआरोपी असलेल्या अमरदीप सिंह गिल आणि विकास यादव यांना चार वर्षांची शिक्षा आणि तीन हजारांचा दंड ठोठावण्यात आला

२ फेब्रुवरी २००७ मनु शर्माने सुप्रीम कोर्टात अपील केलं

८ मार्च २००७ सुप्रीम कोर्टाने मनु शर्माचा अपील स्वीकारलं

२७ नोव्हेंबर २००७ सुप्रीम कोर्टाने मनु शर्माचा जामीन अर्ज फेटाळला

१२ मे २००८ सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा मनु शर्माचा जामीन अर्ज फेटाळला

१९ एप्रिल २०१० पुन्हा एकदा मनु शर्माची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली