देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असल्याने राज्यांनी आता अनलॉकच्या दिशेने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही लॉकडाउनमधील काही नियमांत शिथिलता आणण्यात आली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दिल्लीत लॉकडाउन लावण्यात आला होता. सहावेळा लॉकडाउनचा अवधी वाढवण्यात आला होता. मात्र सातव्यांदा लॉकडाउनचा अवधी वाढवत असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. दिल्लीत सम-विषम फॉर्म्युल्याने बाजार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर मेट्रो ट्रेन सुरु करण्यासही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

दिल्लीत १४ जूनपर्यंत लॉकडाउन असला तरी अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दिल्लीत सम विषम या योजनेनुसार दुकानं सुरु करण्याची परवानगी दिली आहे. सरकारी कार्यालयात ‘अ’ गटातील कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असेल. खासगी कार्यालयं ५० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेट्रो ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास सांगितलं आहे. या आठवड्यातील करोना रुग्णवाढीच्या दरावर पुढे काय सवलती द्यायचं हे अवलंबून असेल असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

तिसऱ्या लाटेसाठी दिल्ली सरकार सज्ज

तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधून दिल्ली सरकारने तयारी सुरु केली आहे. दिल्लीत प्रतिदिन ३७ हजार रुग्णसंख्या वाढेल असा अंदाज समोर ठेवून रणनिती आखण्यात आली आहे. बेड, ऑक्सिजन, औषधं आणि आयसीयू याची तयारी केली जात आहे. लहान मुलांना करोनाची बाधा होईल असं तज्ज्ञांनी सांगितल्याने मुलांसाठी आयूसीयू बेडचं प्रयोजन केलं जात आहे. त्याचबरोबर ४२० टन ऑक्सिजनसाठी स्टोरेज तयार करण्यात येत आहे.

राज्य सरकारचा शासन आदेश मराठीत का नाही?; संजय राऊतांच्या ‘त्या’ Retweet मुळे चर्चा

दिल्लीतील करोना स्थिती

दिल्लीत करोना रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. मागच्या २४ तासात जवळपास ४०० करोना रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णवाढीचा दर ०.५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे दिल्लीत अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात एक लाख २० हजार ५२९ नव्या करोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १५ लाख ५५ हजार २४८ वर पोहोचली आहे. तर देशात काल दिवसभरात एक लाख ९७ हजार ८९४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता दोन कोटी ६७ लाख ९५ हजार ५४९ वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९३.३८ टक्के झाला आहे.