नोएडा आणि दक्षिण दिल्लीला जोडणाऱ्या मजेंटा लाइन मेट्रोचा मंगळवारी ट्रायल रन घेताना अपघात झाला. मेट्रो कालिंदी कुंज डेपोजवळ भिंत भेदून स्थानकाबाहेर आली. ही दिल्लीतील पहिली विनाचालक मेट्रो आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. मेट्रोतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक कारणामुळे ब्रेक लागले नाही आणि मेट्रो भिंत भेदून स्थानकाबाहेर गेली. या घटनेची चौकशी केली जाईल, असे मेट्रोतील अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोत प्रवासी नसल्याने जीवितहानी झाली नाही. पण स्थानकाचे मोठे नुकसान झाले.

उल्लेखनीय म्हणजे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९३ व्या जन्मदिनी म्हणजे २५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बॉटनिकल गार्डन मेट्रो स्थानकातून या लाइनवरील मेट्रोचा शुभारंभ करणार आहेत. १३ किमी मार्ग असलेल्या मेट्रो लाइनच्या उद्घाटन सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही सहभागी होण्याची शक्यता आहे.