चीनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत कार चालवत असलेल्या व्यक्तीने एका महिलेला आणि मुलाला उडवले. अपघात इतका भीषण होता की, महिला आणि मुलगा गंभीर जखमी झाले. परंतु, कार चालक रस्त्यावर तडफडत असलेल्या जखमींना रूग्णालयात नेण्याऐवजी घटनास्थळावरून पसार झाला. सत्य समोर आल्यानंतर मात्र कार चालक धाय मोकलून रडू लागला. कारण त्याने ज्या महिला व मुलाला उडवले होते. ती त्याची पत्नी व मुलगा होता. ही घटना चीनमधील शेडोंग येथे घडली. कार चालकाचे नाव झांग असल्याचे सांगण्यात येते.

झांग रात्री उशिरा दारूच्या नशेत भरधाव वेगात कार चालवत होता. त्याचदरम्यान त्याने स्कूटरवरून जात असलेल्या एका महिला आणि मुलाला उडवले. ही धडक इतकी भीषण होती की, ती महिला आणि मुलगा गंभीर जखमी झाले. हे दोघेही रस्त्यावर तडफडत होते. त्यावेळी झांग त्यांच्या मदतीला येण्याऐवजी पळून गेला. नंतर त्या दोघांना रूग्णालयात नेण्यात आले. पण तत्पूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता. त्याला जर वेळेवर उपचार मिळाले असते तर मुलाचा जीव वाचला असता. महिलेवर रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. झांग घटनास्थळावरून पळून गेल्यामुळे त्याच्यावर वेळेत उपचार करता आले नाही. रूग्णालयात जाईपर्यंत खूप उशीर झाला होता.

त्याचरात्री पोलिसांनी झांगला अटक केली आणि त्याला महिला आणि मुलाला दाखल केलेल्या रूग्णालयात नेले. झांगने जेव्हा त्या महिलेला आणि म़ृत मुलाला पाहिले, तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याला विश्वासच बसत नव्हता की, त्याने ज्या महिलेला आणि मुलाला धडक दिली. ती त्याची पत्नी आणि मुलगाच होता. तो जोरजोरात रडू लागला. पण दुर्दैवाने त्याचा मुलाचा जीव गेला होता तर पत्नी मृत्यूशी झुंज देत होती.

चौकशीत झांगने पोलिसांना सांगितले की, तो आपल्या पत्नी आणि मुलाबरोबर एका नातेवाईकाच्या घरी जेवायला गेला होता. त्यानंतर तो आपल्या कारमध्ये घरी निघाला तर पत्नी आणि मुलगा स्कूटरवर निघाले. तो दारूच्या नशेत होता आणि त्याची अवस्था अत्यंत वाईट होती. त्याच अवस्थेत त्याने आपल्या पत्नी आणि मुलाला धडक दिली.