सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने समन्स जारी केले असून त्यांच्या विरोधात बेकायदेशीर पैशांचा स्रोत लपवल्याच्या प्रकरणी चौकशी सुरू असून त्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.
सूत्रांनी सांगितले की, बेहिशेबी संपत्ती प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांना समन्स जारी करण्यात आले असून वीरभद्र सिंह यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात चौकशीकर्त्यांसमोर व्यक्तिगत उपस्थित राहावे लागणार आहे. जर मुख्यमंत्री येऊ शकत नसतील तर त्यांचा कायदेशीर प्रतिनिधी त्यांच्यावतीने त्यांच्या आर्थिक हिशेबाची व इतर कागदपत्रे सादर करू शकतो. वीरभद्र सिंह यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. सीबीआयने सप्टेंबरमध्ये वीरभद्र सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. संस्थेच्या सूत्रांनी सांगितले की, वीरभद्र सिंह यांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. सक्तवसुली संचालनालयाच्या पथकांनी याबाबत दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल येथे छापे टाकले. सिंह व त्यांच्या कुटुंबीयांनी २००९-११ या काळात ६.१ कोटींची बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. वीरभद्र सिंह हे काही काळ केंद्रात पोलादमंत्री होते. सीबीआयने याबाबत दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह, एलआयसी एजंट आनंद चौहान, चौहान यांचे बंधू सी.एल. चौहान यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये आरोप ठेवले आहेत.