‘ट्राय’च्या आदेशाचा परिणाम
इंटरनेट डेटासाठी भिन्न दरप्रणालीचा प्रस्ताव ‘ट्राय’ने फेटाळल्यानंतर फेसबुकने भारतातील फ्री बेसिक्स अ‍ॅप्स बंद केले आहे. भारतातील जनतेला यापुढे फ्री बेसिक्स अ‍ॅप्स उपलब्ध होणार नाहीत, असे फेसबुकच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
रिलायन्स कम्युनिकेशनसमवेत भागीदारीतून भारतात फ्री बेसिक्स अ‍ॅप्स सुरू करण्यात आले होते, त्यानुसार काही वेबसाइट आणि सेवा उपलब्ध करून दिल्या जात होत्या, त्या आता भारतात बेकायदेशीर ठरणार आहेत. भारतात फेसबुक फ्री बेसिक्सवर दर आकारण्याची रिलायन्सची योजना होती, मात्र फेसबुकच्या निवेदनामुळे या सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे.
फेसबुक फ्री बेसिक्सने आता भारतात निवडक संकेतस्थळांवर विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या स्थळांना अ‍ॅपसाठी पात्र ठरण्यासाठी फेसबुकच्या तांत्रिक अटी मान्य कराव्या लागणार आहेत.
त्यासाठी कोणाकडूनही आकार घेण्यात येणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. फेसबुकने भारतात गरिबांसाठी इंटरनेट अ‍ॅक्सेससाठी फ्री अ‍ॅप बेसिक्स दिल्याचा दावा केला, मात्र ट्राय कार्यकर्त्यांना ते पचनी न पडल्याने त्यांनी विरोध केला.

झकरबर्ग यांच्याकडून वादावर पडदा
नवी दिल्ली- इंटरनेट डेटासाठी भिन्न दरप्रणालीचा प्रस्ताव ट्रायने फेटाळण्याचा निर्णय म्हणजे वसाहतवादविरोधी कल्पना आहे, भारत अद्यापही ब्रिटिश राजवटीखाली असता तर बरे झाले असते, असे वक्तव्य फेसबुक मंडळ सदस्य मार्क अ‍ॅण्ड्रिसन यांनी केल्याने त्यावर समाजमाध्यमांवर जोरदार टीका होत आहे. त्यानंतर फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी या बाबत निवेदन जारी करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मार्क अ‍ॅण्ड्रिसन यांचे वक्तव्य खेदजनक आहे, त्याचा फेसबुकशी संबंध नाही, भारत आपल्यासाठी आणि फेसबुकसाठी महत्त्वाचा देश आहे. आपल्याला या देशात मानवता, मूल्ये यांचा अनुभव आला. जेव्हा सर्वाना आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करता येते तेव्हा संपूर्ण जगाची प्रगती होते या विचारावर शिक्कमोर्तब झाले. भारताने एक कणखर देश म्हणून जी प्रगती केली आहे ती पाहता या देशाशी आपल्याला संपर्क अधिक बळकट करावयाचा आहे, असे झकरबर्ग यांनी म्हटले आहे. समाजमाध्यमांवर अ‍ॅण्ड्रिसन यांच्या वक्तव्याबाबत टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी गुरुवारी सकाळी ट्विटरवरून दिलगिरी व्यक्त केली आहे.