नागरिकांच्या पत्त्याचा पुरावा म्हणून पासपोर्टची ग्राह्यता रद्द केल्याच्या कारणावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकारचा हा निर्णय त्यांचा भेदभावाची विचारसरणी स्पष्ट करणारा आहे. यामुळे सरकार कामानिमित्त परदेशात स्थलांतरित झालेल्या लोकांना दुय्यम नागरिकाची वागणूक देऊ पाहत आहे. ही बाब कदापि खपवून घेण्यासारखी नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

पासपोर्टचा वापर प्रामुख्याने परदेश प्रवासासाठी होत असला तरी, बऱ्याच पासपोर्टधारकांकडून त्याचा वापर पत्त्याचा पुरावा म्हणून किंवा ओळखीसाठी केला जातो. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच पासपोर्टच्या शेवटच्या पानावर संबंधित व्यक्तीचा पत्ता न छापण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच आपसुकच पासपोर्टची पत्त्याचा (रेसिडेन्शिअल अॅड्रेस) पुरावा म्हणून असणारी वैधता रद्द होईल. पासपोर्टच्या पहिल्या पानावर संबंधिताचा फोटो आणि अन्य जरूरी सूचनांचा समावेश तसाच राहणार आहे. शेवटचे पान वगळण्याबरोबरच पासपोर्टचा रंगही बदलण्यात येणार आहे. सध्या पासपोर्ट पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, लाल रंगाचा पासपोर्ट राजकीय व्यक्तींसाठी तर, निळ्या रंगाचा पासपोर्ट सर्वसामान्यांसाठी वापरला जातो. पासपोर्टची संवेदनशील माहिती गुप्त ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या व्हिसा विभागाचे सचिव सुरेंद्र कुमार यांनी दिली होती.

‘सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद लोकशाहीसाठी दुर्दैवी’

२०१२पासून पासपोर्टवर बारकोड देण्यात येतो. त्यामुळे त्याचे स्कॅनिंग करण्यात येते. बारकोडचे स्कॅनिंग केल्यानंतर संबंधितांची सर्व माहिती उपलब्ध होते. त्यामुळे पासपोर्टवरील पत्त्याची माहिती काढून टाकली तरी संबंधिताची ओळख पटवताना कोणतीही अडचण येणार नसल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

‘मोदींच्या कपड्यांवर किती खर्च होतो?’; RTI अर्जाच्या उत्तरात सरकार म्हणते…